■ अभिनेत्री विमी...* ■ एक करुण शोकांतिका !

 


■  अभिनेत्री विमी...*

■  एक करुण शोकांतिका !

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 22/8/2026 :

आज २२ ऑगस्ट. अभिनेत्री विमी चा स्मृतिदिन. चित्रपट स्टार झाल्या नंतर १० वर्षांत रुग्णालयाच्या जनरल वॉर्ड मध्ये तिने अखेरचा श्वास घेतला. तिचे पार्थिव हातगाडीवरुन नेण्यात आले. बॉलिवूड मध्ये अनेक असे स्टार्स झाले आहेत, ज्यांनी जीवनातील शेवटचा काळ आर्थिक तंगीत घालवला आहे. अ‍ॅक्ट्रेस विमीची कथाही काहीशी अशीच नि एक करुण शोकांतिका आहे. 

सुनील दत्त आणि शशी कपूर सारख्या स्टार्स सोबत काम केलेली ही अ‍ॅक्ट्रेस दारुच्या व्यसनापायी वाया गेली, असे म्हटले जाते. एवढेच नाही तर अखेरच्या दिवसात तिची परिस्थिती एवढी हलाखीची होती की, हातगाडीवर लोटत तिचे पार्थिव स्मशानात नेले. १९६७ मध्ये रिलीज झालेल्या 'हमराज' चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण करणाऱ्या आणि पहिल्याच चित्रपटातून स्टार झालेल्या अभिनेत्री म्हणजे विमी. 

'हमराज' या चित्रपटात सुनील दत्त सोबत विमीने काम केले. चित्रपटातील गाणी हिट झाली. पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर तिला १० चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. पण तिचा अखेरचा काळ अतिशय वेदनादायी होता. लहानपणा पासून अ‍ॅक्टिंगचा छंद असलेल्या विमीने शिक्षण पूर्ण होताच कोलकात्यातील बिझनेसमन शिव अग्रवाल सोबत लग्न केले. विमीचे आईवडील या लग्नाच्या विरोधात होते. विमी ही एका मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणी होती, तर शिव यांचे कुटुंब श्रीमंत व्यावसायिक होते. त्यामुळे विमीच्या कुटुंबीयांचा या लग्नाला विरोध होता.

विमीचे अ‍ॅक्ट्रेस बनण्याचे संपूर्ण श्रेय म्युझिक डायरेक्टर रवी यांना जाते. विमी आणि रवी यांची भेट कोलकाताच्या एका पार्टीत झाली. रवीने विमी आणि तिचा पति शिवला मुंबई येथे आमंत्रित केले. त्यावेळी विमी दोन मुलांची आई होती. विमी मुंबईला पोहोचल्या नंतर रवीने तिची भेट डायरेक्टर बी.आर. चोपडा सोबत घालून दिली. चोपडा यांनी तिला 'हमराज' चित्रपटात लीड अ‍ॅक्ट्रेस म्हणून साइन केले. या फिल्म मध्ये राजकुमार, सुनील दत्त, मुमताज सुध्दा प्रमुख भूमिकेत होते. 'हमराज' सुपरहिट ठरला आणि आणि विमी एका रात्रीत सुपरस्टार झाली. नंतर विमीने अशोक कुमार, निरुपा रॉय सोबत 'आबरु', पृथ्वीराज कपूर आणि आय.एस. जौहर सोबत 'नानक नाम जाहज है', शशि कपूर सोबत 'पतंगा' आणि 'वचन' सारख्या चित्रपटात काम केले. जया बच्चन आणि धर्मेंद्र स्टारर 'गुड्डी' मध्ये विमीचा कॅमियो होता.

विमी बॉलिवूडच्या हिट अ‍ॅक्ट्रेसेसच्या लिस्ट मध्ये आली होती. तिचे सासरचे लोक मात्र अभिनय करण्याच्या निर्णयामुळे खुश नव्हते. विमीच्या सासू सासऱ्यांनी तिच्या पतिला संपत्ती मधून बेदखल केले. दोन्ही मुलांना कोलकाता मध्ये सोडून विमी आणि शिव मुंबईत शिफ्ट झाले. आता विमी कुटुंबात एकटीच कमावणारी होती. त्या काळात तिच्या दारात प्रोड्यूसर्सची लाइन लागत होती आणि ती एका फिल्मसाठी ३ लाख रुपये घेत होती.

नंतर विमीचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले आणि तिच्याकडे पैशाची कमतरता जाणवू लागली. आर्थिक चणचणीमुळे तिला जुहू येथील बंगला सोडावा लागला. मुंबईच्या सर्वसामान्य भागात ती राहायला लागली. विमीचे पति खुप दारु प्यायला लागले. एवढेच नाही तर पैशांसाठी विमीवर छोट्या प्रोड्यूसर्स सोबत काम करण्याचा दबाव ते आणत होते. हळू-हळू विमी आणि शिवच्या नात्यात दुरावा येऊ लागला आणि त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

पति पासून वेगळी झाल्या नंतर विमी टेंशन मध्ये राहू लागली. त्याचा परिणाम तिच्या करिअरवर झाला.  त्या काळात तिला जे चित्रपट मिळाले ते सर्व फ्लॉप ठरले आणि हळूहळू विमी वरील कर्ज वाढत गेले. पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफ उध्वस्त झाल्याचे दुःख तिला सहन झाले नाही आणि तिने दारु पिण्यास सुरुवात केली. त्या काळात तिच्यकडे दारु प्यायला पैसे नसल्याने ती पैशासाठी वेश्या व्यवसायात ओढली गेली, असेही सांगितले जाते. पैसे नसल्याने नाइलाजाने विमी स्वस्त मिळणारी दारु प्यायला लागली.  

स्वस्त दारु प्यायल्याने विमीचे लिव्हर पुर्णपणे खराब झाले. उपचारासाठी तिच्याकडे पैसे नव्हते.  जीवनातील अखेरच्या काळात ती मुंबईच्या नानावटी हॉस्पिटल मध्ये अ‍ॅडमिट होती. पैसे नसल्याने तिला जनरल वॉर्ड मध्ये ठेवले. २२ ऑगस्ट १९७७ रोजी हॉस्पिटल मध्येच तिचे निधन झाले. पण अखेरच्या समयी मात्र तिच्या जवळचे कोणीही नव्हते. 

वयाच्या अवघ्या ३४व्या वर्षी विमीचे निधन झाले. त्यावेळी तिला खांदा द्यायला कुणीही नव्हते. निर्माता तेजनाथ जार यांनी सांगितले की, तिचे पार्थिव एका हातगाडीवर ठेऊन स्मशानभूमी पर्यंत पोहचवण्यात आले. तिच्या अंत्यविधीला फक्त ९ जण उपस्थित होते. यापैकी दोन फिल्म इंडस्ट्रीतून होते. एक स्वतः तेजनाथ आणि दुसरे एस.डी. नारंगचे भाऊ. विमीचे पती आणि मुले तिच्या अंत्य संस्काराला सुध्दा आले नव्हते.  

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या