भरपेट नाश्ता केला तरी भूकभूक होते, काहीतरी खावंसं वाटतं असं का? ५ कारणं, पोटाचं म्हणणं ऐका..

 🩺हेल्थ मंत्रा | आरोग्य मंत्र | 🩺

भरपेट नाश्ता केला तरी भूकभूक होते, काहीतरी खावंसं वाटतं असं का? ५ कारणं, पोटाचं म्हणणं ऐका.. 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 22/8/2026 :

मी तर सकाळी व्यवस्थित नाश्ता केला होता, पोटही भरलं होतं… तरीही ११ वाजल्यानंतर पुन्हा भूक का लागते?” हा प्रश्न अनेकांना पडतो. नाश्ता केल्यानंतर दोन-तीन तासांतच काहीतरी गोड, कुरकुरीत किंवा चटपटीत खाण्याची तीव्र इच्छा होणं, हा अनेकांचा रोजचा अनुभव आहे.

 विशेषतः पोट भरलेलं असतानाही चहा-बिस्किटं किंवा एखादा स्नॅक्स खावासा वाटतो. मग खरंच आपल्याला भूक लागलेली असते की शरीराला काही वेगळंच हवं असतं?

पोट भरलेलं असणं आणि शरीराला दीर्घकाळ तृप्ती मिळणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. नाश्त्याचं प्रमाण जास्त असलं तरी त्यात प्रथिने, फायबर आणि शरीराला आवश्यक पोषक घटक कमी असतील, तर पोट भरल्यासारखं वाटूनही काही वेळाने पुन्हा खाण्याची इच्छा होऊ शकते.(difference between hunger and food cravings) याविरुद्ध योग्य प्रमाणात प्रथिने, फायबर आणि पौष्टिक चरबी असलेला नाश्ता जास्त काळ तृप्त ठेवण्यास मदत करतो.

त्यामुळे सकाळी ९ वाजता नाश्ता केल्यानंतर ११ वाजताच वारंवार भूक लागत असेल, तर केवळ नाश्त्याचं प्रमाण वाढवण्यापेक्षा त्या नाश्त्यात नेमकं काय आहे, याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. मग नाश्ता करूनही ११ वाजता भूक का लागते? पोट भरलेलं असतानाही गोड किंवा कुरकुरीत पदार्थ खाण्याची इच्छा का होते? आणि सकाळच्या नाश्त्यात नेमके कोणते पदार्थ असावेत, ज्यामुळे दुपारपर्यंत पोट आणि मन दोन्ही तृप्त राहतील? यामागची कारणं आणि सोपे उपाय पाहूया. 

1. आपल्याकडे सहसा नाश्त्याला पोहे, उपमा, शिरा, इडली किंवा ब्रेड- बटर खाण्याची सवय असते. या पदार्थांमध्ये साधे कार्बोहायड्रेट्स जास्त असतात. हे पदार्थ खाल्ल्यावर रक्तातील साखर अचानक वाढते आणि इन्सुलिनच्या प्रभावामुळे ११ वाजेपर्यंत ती सहज खाली येते. साखर अचानक कमी झाल्यामुळे आपल्याला पुन्हा भूक लागते. 

2. फायबर आणि हेल्दी फॅट्स उदा. साजूक तूप, बदाम, अक्रोड, बिया पचायला वेळ लागतो. जर नाश्त्यात फायबर नसेल, तर अन्न लगेच पचते. त्यामुळे पुन्हा पोटात जागा तयार होते आणि आपल्याला कडकडून भूक लागते. 

3. अनेकदा जास्त प्रमाणात खाल्ल्याने पोट फुगून भरल्यासारखे वाटते. पण शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्त्वे, प्रथिने आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये मिळाली नाहीत, तर मेंदूतील लेप्टिन हे हार्मोन्स सक्रिय होत नाही. त्यामुळे पोट भरलेले असूनही मनाची तृप्ती होत नाही आणि काहीतरी खावेसे वाटते.

4. बरेचदा आपल्या शरीराला पाण्याची तहान लागलेली असते, पण आपला मेंदू तहान आणि भूक यातील फरक ओळखू शकत नाही. ११ वाजता लागलेली भूक अनेकदा डिहायड्रेशनचे लक्षण असते. 

5. रात्री झोप पूर्ण झालेली नसेल किंवा सकाळी कामाचा ताण जास्त असेल, तर शरीरात कोर्टिसोल आणि ग्रेलीन नावाचा हार्मोन्स वेगाने वाढते. यामुळे पोट भरलेले असतानाही हाय- कॅलरी किंवा गोड खाण्याची इच्छा आपल्याला होते. 

6. यासाठी आपल्या सकाळच्या नाश्त्यामध्ये अंडी, मोड आलेले कडधान्ये, पनीर किंवा बेसनाचे धिरडे खा. आहारात फायबरचे प्रमाण वाढवा. सकाळी पोहे किंवा उपमा करताना त्यात भरपूर भाज्या घाला. नाश्त्यासोबत ४ ते ५ भिजवलेले बदाम, अक्रोड किंवा १ चमचा साजूक तूप घ्या, यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते. नाश्त्याच्या अर्धा तास आधी आणि १ तासानंतर व्यवस्थित पाणी प्या. नाश्त्यासोबत साखरेचा चहा किंवा कॉफी पिणे टाळा, त्यामुळे इन्सुलिन स्पाइक होतो.

♻️

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या