"प्रेमभावना रंध्रारंध्रात भरून येतात तेव्हा कविता निर्माण होते" - देवीदास फुलारी
वृत्त एकसत्ता न्यूज
नांदेड /प्रतिनिधी दि. 28 :
प्रेम ही संकल्पना स्त्री-पुरुष यांच्यापुरतीच मर्यादित नाही. ती व्यापक आहे. आणि जेव्हा प्रेमभावना रंध्रारंध्रात भरून येतात तेव्हा कविता निर्माण होते असे प्रतिपादन अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य देवीदास फुलारी यांनी केले.
मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेड व इसाप प्रकाशनातर्फे आयोजित कवयित्री अंजली कानिंदे यांच्या 'समरगंध' या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. वृषालीताई किन्हाळकर, प्रमुख उपस्थिती ॲड. मुक्तेश्वरराव धोंडगे, प्रा. डॉ. पृथ्वीराज तौर यांची होती तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. राजेंद्र गोणारकर, श्रीनिवास मस्के तर डॉ. रेणूराव कानिंदे, सौ. चंद्रप्रभा कानिंदे हे उपस्थित होते.
प्रारंभी छत्रपती शिवाजीमहाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. मान्यवरांच्या स्वागतानंतर इसाप प्रकाशनाचे प्रकाशक दत्ता डांगे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. वृषालीताई किन्हाळकर आणि डॉ. रेणूराव कानिंदे व चंद्रप्रभा कानिंदे यांच्या हस्ते 'समरगंध'चे प्रकाशन झाले. मनोगतात कवयित्री अंजली कानिंदे यांनी काही कविता मनातच राहिल्या. काही कविता कागदावर उतरल्या त्या पुस्तकरूपाने आल्या आहेत असे सांगून 'समरगंध'चा प्रवास हा प्रेमापासून प्रेमापर्यंतचा आहे असे म्हटले.
देवीदास फुलारी पुढे म्हणाले की, नवीन पिढीतील कवयित्री ताकदीने लिहीत आहेत. अंजली कानिंदे यांची कविता प्रेम आणि दुःखाच्याही पलीकडे जाते. स्त्रियांची दुःखं या कवयित्रीचा अंतःस्वर आहे. या कविता आपल्याला अधिक विचारप्रवण करतात असेही त्यांनी म्हटले.
डॉ. वृषालीताई किन्हाळकर यांनी आपले विचार मांडताना म्हटले की, अंजली कानिंदे यांची कविता आशावादाने भरलेली आहे. स्त्रीमनाचे अनेक हेलकावे यात आहेत. या पुस्तकातून कवयित्रीला समजून घेता घेता आपण आपल्यालाच समजून घेत जातो. प्रेमाकडून अद्वैताकडे जाणारी ही कविता आहे.. सुंदर कल्पना, सुंदर आशय व सुंदर लेखन म्हणजे 'समरगंध' होय असेही त्यांनी म्हटले. प्रा. डॉ. पृथ्वीराज तौर यांनी म्हटले की, 'समरगंध'मधील कविता वाचल्यानंतर त्या आठवतील अशा आहेत. अशा कविता कधीतरी अनुभवायलाही मिळतात. या कवितांच्या मुळापर्यंत जाता येते. माणसं हजारो पानं लिहितात पण लक्षात राहण्यासारखे काही लिहीत नाहीत. या धर्तीवर अंजली कानिंदे यांच्या कविता लक्षात राहण्यासारख्या आहेत. यावेळी मुक्तेश्वरभाऊ धोंडगे, प्रा. डॉ. राजेंद्र गोणारकर आणि प्रा. श्रीनिवास मस्के यांनीही आपले विचार मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. धाराशिव शिराळे यांनी केले तर आभार कवयित्री निशा डांगे यांनी मानले. कार्यक्रमास शंकर वाडेवाले, प्रा. महेश मोरे, ॲड. विजयकुमार भोपी, दिगंबर गं. कदम, आनंद पुपलवाड, शिवाजी आंबुलगेकर, अशोक कुबडे, रोहिणी पांडे, रुचिरा बेटकर, लक्ष्मी पुरणशेट्टीवार आदी साहित्यिक व रसिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ॲड. मनोज मुनेश्वर, सतीश कानिंदे व इंजि. कुणाल मुनेश्वर यांनी परिश्रम घेतले.

0 टिप्पण्या