संत सावता माळी महाराज : कर्म, कष्ट आणि विठ्ठलभक्तीचा संगम

 


संत सावता माळी महाराज : कर्म, कष्ट आणि विठ्ठलभक्तीचा संगम  

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 12/8/2026 :

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेवांचे समकालीन असलेले संत सावता माळी महाराज हे तेराव्या शतकातील महान संतकवी होते. त्यांचा कालखंड साधारण इ.स. १२५० ते १२९५ असा मानला जातो. त्यांचे जन्मगाव अरण, ता. माढा, जि. सोलापूर हे आहे.

संत सावता महाराजांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी भक्ती आणि कर्म यांची सुंदर सांगड घातली. माळी समाजात जन्मलेले सावता महाराज शेती आणि मळ्यातील काम करत असतानाच विठ्ठलभक्तीत रमले.

त्यांच्या अभंगातील प्रसिद्ध ओळ

“कांदा मुळा भाजी । अवघी विठाई माझी ॥”

या एका ओळीत त्यांचे जीवनदर्शन सामावलेले आहे. कांदा, मुळा, भाजी, शेत आणि मळा—या रोजच्या कामामध्येच त्यांना विठ्ठलाचे दर्शन होत होते.

म्हणजेच आपले कर्म सोडून देव शोधण्याची गरज नाही; आपले काम प्रामाणिकपणे आणि निष्ठेने करणे हीसुद्धा भक्तीच आहे.

आजच्या काळात हा विचार विशेष महत्त्वाचा आहे. शेतकरी असो, शिक्षक असो, विद्यार्थी असो, वैज्ञानिक असो किंवा कोणतेही काम करणारी व्यक्ती असो—आपल्या कामाशी प्रामाणिक राहणे आणि त्यातून समाजासाठी चांगले योगदान देणे, हीच खरी कर्मभक्ती आहे.

आपण आज सहज म्हणतो, “Work is Worship.”

पण संत सावता महाराजांनी हा विचार शेकडो वर्षांपूर्वी आपल्या आचरणातून दाखवून दिला.

त्यांच्या स्वतःच्या अभंगात शके १२१७, आषाढ कृष्ण चतुर्दशी असा समाधीकालाचा उल्लेख आढळतो. अरण येथे त्यांच्या समाधीस्थानी आजही पुण्यतिथीचा सोहळा साजरा केला जातो.

म्हणून आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त केवळ समाधीला वंदन न करता, त्यांच्या विचारांना आपल्या जीवनात उतरवूया

 कष्टाला प्रतिष्ठा देऊया. कामात निष्ठा ठेवूया. कर्मातच विठ्ठल पाहण्याचा प्रयत्न करूया.

संत सावता माळी महाराजांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन! 

आपल्या सर्वांना संत सावता माळी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!

— डॉ. अनिल एच. गोरे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या