भारतातील सर्वात उंच धबधबा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 15/8/2026 :
भारतातील सर्वात उंच धबधबा, पावसाळ्यात इतका सुंदर कोसळतो की बघण्यासाठी भारतातून पर्यटकांची गर्दी होते. फोटोग्राफीसाठी तर हे एकदम बेस्ट ठिकाण आहे. पावसाळा सुरू होताच मेघालय मधील दऱ्या-खोऱ्यात पुन्हा धबधबे सुरु होतात. हिरवाईने नटलेले डोंगर, धुक्याची चादर आणि मुसळधार पावसामुळे ओसंडून वाहणारे धबधबे पर्यटकांना भुरळ घालतात. यात नोहकालिकाई धबधबा हा सर्वाधिक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो.
भारतातील सर्वात उंच प्लंज वॉटरफॉल म्हणून ओळखला जाणारा हा धबधबा सुमारे ३४० मीटर (१,११५ फूट) उंचीवरून कोणत्याही खडकावर न अडता थेट खाली कोसळतो. या धबधब्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा पाण्याचा मुख्य स्रोत मेघालयातील मुसळधार पाऊस आहे. त्यामुळे पावसाळ्यात त्याचे रौद्र आणि तितकेच मोहक रूप पाहायला मिळते. उंचावरून कोसळणारी शुभ्र जलधारा, सभोवतालची दाट हिरवाई, धुक्याने वेढलेले डोंगर आणि खाली तयार होणारे निळसर हिरवे नैसर्गिक तळे हे दृश्य पर्यटक आणि फोटोग्राफरसाठी खास पर्वणी ठरते.
नोहकालिकाई धबधब्याशी एक हृदयद्रावक लोककथा जोडलेली आहे. 'का लिकाई' नावाच्या महिलेच्या आयुष्यात घडलेल्या दुःखद घटनेच्या स्मरणार्थ या धबधब्याला 'नोहकालिकाई' म्हणजेच 'लिकाईची उडी' असे नाव देण्यात आले. पावसाळ्यात येथे थंडगार वारे, दऱ्यांवर तरंगणारे ढग आणि सतत कोसळणाऱ्या धबधब्याचा नयनरम्य देखावा अनुभवायला मिळतो. येथील व्ह्यू पॉइंटवरून धबधब्याचे अप्रतिम दर्शन घेता येते. सकाळच्या वेळेत गर्दी कमी असल्याने आणि प्रकाश अनुकूल असल्याने येथे फोटो देखील खूप खास येतात.
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
सौजन्य : TV9 मराठी

0 टिप्पण्या