आता नजर मद्य उत्पादक अन् विक्रेत्यांवर; तुकाराम मुंढेंच्या इशाऱ्याने मद्य विक्रेत्यांचे धाबे दणाणले
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 9/8/2026 :
दूध, पनीर, खाद्यतेल आणि भेसळयुक्त व निकृष्ट अन्न पदार्थांवरील कारवायांनंतर आता मद्य आणि चायनीज खाद्यपदार्थांची गुणवत्ता अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) रडारवर आली आहे. सर्वच अल्कोहोलयुक्त आणि अल्कोहोल नसलेली पेय ‘एफडीए’च्या अखत्यारित येत असल्याने आगामी काळात विशेष तपासणी मोहीम राबवून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी (दि. ८) पुण्यात बोलताना स्पष्ट केले. तुकाराम मुंढे यांची कार्यपद्धती व कारवायांचा धडाका लक्षात घेता त्यांच्या या इशाऱ्यामुळे मद्य विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित ‘भविष्य वेध’ या संवाद कार्यक्रमात तुकाराम मुंढे बोलत होते. माय जनसेवक आणि पुणे लोकल यांच्यावतीने मुंढे यांच्या विशेष मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लेखक अरविंद जगताप आणि प्रशांत आहेर यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
काही दिवसांपूर्वी पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गावठी मद्यामुळे २० नागरिकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात चुकीच्या रसायनांचा वापर झाल्याचे प्राथमिक तपासातून निदर्शनास आले. त्यामुळे मद्याच्या गुणवत्तेचा गंभीर6 विषय समोर आल्याने त्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. इतर शीतपेयांबरोबर मद्याची गुणवत्ता, उत्पादन आणि त्यावरील लेबलिंग आदी माहिती तपासणे अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अधिकारात येतात. मद्याबाबतही तक्रारीही येत असल्याने आता मद्याच्या गुणवत्तेवर काम करणे गरजेचे असल्याचे मुंढे यांनी सांगितले.
मुंढे म्हणाले, अन्नसुरक्षा हा प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय आहे. त्यामुळे दूध, पनीर आणि तेल यांसारख्या रोजच्या वापरातील वस्तूंच्या गुणवत्तेला प्राधान्य दिले जात आहे. पूर्वी संसर्गजन्य आजारांचे प्रमाण अधिक होते; मात्र आता उच्च रक्तदाब आणि मधुमेहासारख्या असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना भेसळमुक्त आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळणे आवश्यक आहे. सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले. अमित रुके आणि वीरेश आंधळकर यांनी प्रास्ताविक केले.
खाद्यपदार्थातील घटकांची माहिती घ्या
बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक पदार्थांमध्ये चरबी, साखर आणि मिठाचे प्रमाण अधिक असते. अशा पदार्थांना ‘एचएफएसएस’ अर्थात हाय फॅट, शुगर अँड सॉल्ट उत्पादने म्हटले जाते. त्यांच्या नियमित सेवनाचा शरीरासह मानसिक आणि बौद्धिक क्षमतेवरही विपरीत परिणाम होऊ शकतो. नागरिकांनी खाद्यपदार्थ खरेदी करताना केवळ किंमत आणि मुदत समाप्तीची तारीख पाहू नये. उत्पादनामध्ये वापरलेले घटक, साखर, कर्बोदके, पोषकद्रव्ये आणि अतिरिक्त रासायनिक घटकांची माहितीही वाचावी. आपण नेमके काय खात आहोत, ते आरोग्यासाठी सुरक्षित आहे का? असा प्रश्न प्रत्येक ग्राहकाने विचारला पाहिजे, असे मुंढे यांनी नमूद केले.
योग्य गोष्टींच्या प्रेमात पडा स्वतःचे अस्तित्व निर्माण करा
अधिकारी येतील आणि जातील; मात्र प्रशासनाने सातत्याने चांगले काम केले पाहिजे. परिस्थिती किंवा मनुष्यबळाच्या कमतरतेला दोष देत बसण्यापेक्षा त्यावर मात करून काम करणे आवश्यक आहे. तरुणांनी सोशल मीडियाचा वापर करताना स्वत:ची विचार करण्याची क्षमता जपावी. सोशल मीडिया वापरणे चुकीचे नाही; मात्र त्याचा वापर किती आणि कसा करायचा? हे महत्त्वाचे आहे. तरुणांनी योग्य गोष्टींच्या प्रेमात पडून जीव ओतून काम करावे आणि स्वतःचे अस्तित्व स्वत: निर्माण करावे, असे आवाहनही मुंढे यांनी केले.

0 टिप्पण्या