📖✒️आरपार दिसणारं मन..!✍️

 


📖✒️आरपार दिसणारं मन..!✍️

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 22/8/2026 :

आपल्या घराच्या भिंती विटा-मातीच्या असतात, ज्या बाहेरच्या जगापासून आपलं संरक्षण करतात. पण मनाच्या भिंती मात्र आपण स्वतःच उभारतो. काही लोक या भिंती इतक्या उंच आणि अपारदर्शक बांधतात की आत नक्की काय चाललंय हे बाहेरच्याला कधीच कळत नाही. पण ज्यांचं मन पारदर्शक असतं, त्यांच्या बाबतीत मात्र चित्र अगदी वेगळं असतं.

​माझ्या घराच्या भिंती पारदर्शक आहेत आणि माझं मनही अगदी असंच आरपार दिसणारं आहे, मनात जे आहे तेच ओठांवर; कुठलाही छुपा हेतू नाही, कसलाही कपट-कारस्थान नाही आणि भावनांचा बनावट खेळ नाही. वाहत्या झऱ्याचं पाणी जसं इतकं स्वच्छ असतं की तळाशी असलेला लहानसा खडाही स्पष्ट दिसतो, अगदी तसंच पारदर्शक मन असलेल्या माणसाचं असतं. त्यांच्या सहवासात राहताना समोरच्याला कधीही 'या माणसाच्या मनात नक्की काय शिजतंय?' असा संशय घ्यावा लागत नाही.

​पण आयुष्याच्या अनुभवाने एक गोष्ट नक्की शिकवली आहे, पारदर्शक असणे जितके सोपे वाटते, तितके ते नसते. कारण आपण पारदर्शक असून चालत नाही, समोरच्याची दृष्टी सुद्धा तशीच असावी लागते. फक्त एकच अटकळ आहे, बघणाऱ्याचे मनही तळ दिसणाऱ्या निर्झरासारखे नितळ, शांत आणि सर्वसमावेशक हवे.

​जर पाहणाऱ्याच्या डोळ्यांवर संशयाचा चष्मा असेल, तर त्याला स्वच्छ पाण्यातही शेवाळच दिसेल. एका शुद्ध मनाचे मूल्य फक्त तेच जाणू शकतात, ज्यांचे स्वतःचे मन समंजस आणि प्रामाणिक आहे.

जेव्हा अशी दोन पारदर्शक मने एकत्र येतात, तिथे संशयाला अजिबात वाव उरत नाही. तिथे शब्दांपेक्षा भावना पटकन पोहोचतात. अशी माणसं जेव्हा जोडली जातात, तेव्हा त्यांची नाती आणि दोस्ती पारदर्शक भिंतीसारखी पक्की आणि लखलखीत होते, ज्यात कुठलीही गुपिते नसतात, असतो फक्त अथांग विश्वास.

जगाने काहीही म्हटले, तरी मनाची ही पारदर्शकता कधीही गमावू नये. कारण हीच ती गोष्ट आहे जी आपल्याला आतून शांत आणि समाधानी ठेवते.

 ©️श्रद्धा धनेश

🖊️संकलन ; प्रविण सरवदे, कराड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या