रविवारचा लेख
✒️सरकारी शाळेतील शिक्षक
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 16/8/2026 :
“सरकारी शाळेतील मुलांसाठी गुरुजी हे केवळ शिक्षक नसून त्यांच्या स्वप्नांना दिशा देणारा आधार असतात”
गुरुजी… या मुलांच्या स्वप्नांचा एकमेव आधार!
शाळेच्या वर्गात रोज अनेक चेहरे दिसतात. काही चेहऱ्यांवर आत्मविश्वास असतो, काहींच्या डोळ्यांत मोठी स्वप्ने असतात; तर काही डोळ्यांत परिस्थितीशी झुंज देण्याची शांत तयारी असते. सरकारी शाळेतील ही मुले अनेकदा अत्यंत साध्या परिस्थितीतून शाळेत येतात. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची असते. अभ्यासासाठी स्वतंत्र खोली नसते, महागडी पुस्तके नसतात, खासगी शिकवणीची सोय नसते आणि प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करणारे कुणी घरात असेलच असे नाही.
पण तरीही त्यांच्या डोळ्यांत स्वप्न असते…
“मला शिकायचे आहे… मोठे व्हायचे आहे… आई-बाबांचे कष्ट कमी करायचे आहेत!”
या स्वप्नांना आकार देणारा एक हात असतो-
तो म्हणजे गुरुजींचा!
खरं तर सरकारी शाळेतील शिक्षकाचे काम केवळ वर्गात धडा शिकवण्यापुरते मर्यादित नसते. एखाद्या विद्यार्थ्याने गृहपाठ केला नाही तर त्यामागचे कारण समजून घेणे, एखादा विद्यार्थी शांत का आहे हे जाणून घेणे, अभ्यासात मागे असलेल्या मुलाला पुन्हा उभे करणे, शाळेत नियमित येत नसलेल्या विद्यार्थ्याला प्रेमाने शाळेत आणणे आणि एखाद्या मुलाच्या मनात दडलेली प्रतिभा ओळखून तिला योग्य दिशा देणे—हेही गुरुजींचेच काम असते.
खासगी शाळेत शिकणाऱ्या मुलाला अभ्यासासाठी घरी पालकांचे मार्गदर्शन मिळू शकते. अनेकदा खासगी शिकवणीची सोय असते. विविध शैक्षणिक साधने उपलब्ध असतात. पण सरकारी शाळेतील प्रत्येक मुलाच्या नशिबी ही परिस्थिती असेलच असे नाही.
काही मुलांचे आई-वडील दिवसभर कष्ट करतात. कोणाचे वडील मजुरी करतात, कोणाची आई शेतात काम करते, तर कोणाच्या घरची जबाबदारीच एवढी मोठी असते की मुलाच्या अभ्यासासाठी वेळ देणे पालकांना शक्य होत नाही.
अशा वेळी मुलाच्या हातात पुस्तक असते आणि समोर असतो—
गुरुजींचा विश्वास!
“तू करू शकतोस…”
“पुन्हा प्रयत्न कर…”
“चूक झाली तरी काही हरकत नाही…”
“तुझ्यात क्षमता आहे…”
गुरुजींचे हे चार शब्द कधी कधी एखाद्या मुलाच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून टाकतात.
कारण शिक्षक मुलाला केवळ अक्षरज्ञान देत नाही; तो त्याला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवतो.
आज एखादा विद्यार्थी वर्गात शांत बसलेला दिसतो. तो प्रश्नांची उत्तरे देत नाही. कदाचित त्याला घरी अभ्यासासाठी मदत करणारे कोणी नसेल. कदाचित त्याच्याकडे आवश्यक शैक्षणिक साहित्य नसेल. कदाचित घरच्या परिस्थितीमुळे त्याचे मन अभ्यासात लागत नसेल.
पण गुरुजी जर त्याचा हात धरून म्हणाले,
“चल, आपण दोघे मिळून शिकूया…”
तर त्या एका वाक्यात त्या मुलासाठी संपूर्ण जग उभे राहू शकते.
सरकारी शाळेतील शिक्षक म्हणून काम करताना अनेकदा आपल्याला आपल्या कामाचे तात्काळ फळ दिसत नाही. आज शिकवलेला धडा उद्या एखादा विद्यार्थी विसरू शकतो. आज दिलेले मार्गदर्शन काही दिवसांनी त्याला आठवणारही नाही. पण वर्षानुवर्षांनी तोच विद्यार्थी मोठा होऊन भेटतो आणि म्हणतो—
“गुरुजी, तुम्ही त्या वेळी माझ्यावर विश्वास ठेवला नसता तर मी आज इथे नसतो!”
त्या एका वाक्यासाठी शिक्षकाने केलेले आयुष्यभराचे कष्ट सार्थकी लागतात.
म्हणूनच सरकारी शाळेतील शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्याने प्रत्येक विद्यार्थ्याकडे केवळ ‘एक विद्यार्थी’ म्हणून पाहू नये; तर एका संभाव्य डॉक्टरकडे, शिक्षकाकडे, अधिकाऱ्याकडे, कलाकाराकडे, शास्त्रज्ञाकडे किंवा उद्याच्या जबाबदार नागरिकाकडे म्हणून पाहिले पाहिजे.
कारण परिस्थिती गरीब असू शकते;
पण स्वप्ने कधीही गरीब नसतात!
ज्या मुलाकडे आज अभ्यासासाठी पुरेशी साधने नाहीत, त्याच्याकडे उद्या समाज बदलण्याची ताकद असू शकते. गरज आहे ती फक्त त्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याची.
सरकारी शाळेतील शिक्षक हा त्या मुलाचा केवळ विषय शिक्षक नसतो. अनेकदा तो त्याचा मार्गदर्शक, प्रेरणादाता, समुपदेशक, आधारवड आणि स्वप्नांचा पहारेकरी असतो.
म्हणून सरकारी शाळेतील प्रत्येक गुरुजींनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी.
आपल्या वर्गातील एखाद्या मुलाच्या हातात आज साधे पुस्तक असेल; पण त्याच पुस्तकातून उद्याचा इतिहास लिहिला जाऊ शकतो.
आणि त्या इतिहासाच्या पहिल्या पानावर कदाचित एका गुरुजींचे नाव असेल…
“ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला!”
म्हणूनच सरकारी शाळेतील शिक्षकांनी निराश होऊ नये. साधनांची कमतरता असली तरी कल्पकतेची कमतरता नसावी. परिस्थिती कठीण असली तरी प्रयत्न थांबू नयेत.
कारण या मुलांना कदाचित अनेक गोष्टींचा आधार मिळणार नाही;
पण गुरुजींचा विश्वास मिळाला, तर ते आयुष्याची मोठी शिखरे गाठू शकतात.
शेवटी एवढेच
सरकारी शाळेतील मुलांना कदाचित महागडी शिकवणी मिळणार नाही,
प्रत्येक वेळी घरी अभ्यासाचे मार्गदर्शन मिळणार नाही,
अनेक सुविधा मिळणार नाहीत;
पण त्यांना एक समर्पित गुरुजी मिळाला,
तर त्यांच्या स्वप्नांना आकाशाची मर्यादा उरत नाही!
कारण गुरुजी फक्त शिकवत नाहीत…
गुरुजी भविष्य घडवतात!
नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769

0 टिप्पण्या