चमचागिरीचा रोग : स्वाभिमानाच्या मृत्यूची घंटा..!
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 16/8/2026 :
चमचागिरी-हा शब्द उच्चारला तरी मनात तिरस्काराची भावना निर्माण होते. पण विडंबन असे की, आजच्या समाजात हाच रोग मोठ्या अभिमानाने जोपासला जात आहे. ही केवळ एक सवय नाही, तर व्यक्तिमत्त्वाला पोखरणारी घातक वृत्ती आहे. *जिथे स्वाभिमान विकला जातो, तिथे चमचागिरी जन्म घेते. आणि जिथे चमचागिरी वाढते, तिथे व्यक्तिमत्त्वाचा अंत निश्चित असतो.*
आज अनेकांना वाटते की, मोठ्या लोकांच्या जवळ राहणे म्हणजे यशाचा शॉर्टकट आहे. *पण हा शॉर्टकट नसून आत्मसन्मानाच्या खड्ड्यात उडी आहे*, हे लक्षात येत नाही. चापलुसी करून, खुशामत करून, खोट्या स्तुतीचा पाऊस पाडून काही काळ एखाद्याच्या जवळ जाता येईलही; पण त्या जवळिकीला किंमत नसते- *कारण ती तुमच्या कर्तृत्वावर नव्हे, तर तुमच्या लाचारपणावर उभी असते.*
चमचागिरी करणारा माणूस हळूहळू स्वतःला विसरतो. त्याचे विचार, त्याचे निर्णय, त्याची ओळख- *सगळे दुसऱ्यांच्या पायाशी गहाण ठेवलेले असतात*. तो स्वतःचे अस्तित्वच गमावतो. त्याची भाषा बदलते, त्याची वृत्ती बदलते, आणि शेवटी तो स्वतःच्या सावलीलाही ओळखू शकत नाही. हा केवळ व्यक्तीचा नाही, तर संपूर्ण समाजाचा पराभव असतो.
कडवट सत्य असे आहे की, चमचागिरी कधीच यश देत नाही- ती फक्त तात्पुरता आधार देते. *खऱ्या यशाचा पाया हा कष्ट, प्रामाणिकपणा आणि कर्तृत्व यावर उभा असतो.* जो स्वतःच्या ताकदीवर उभा राहतो, त्यालाच समाज मान देतो. बाकीच्यांना फक्त उपयोग संपेपर्यंत सहन केले जाते आणि नंतर विसरले जाते.
आज गरज आहे ती या मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडण्याची. स्वतःच्या किमतीची जाणीव होण्याची. *‘होयबा’ बनण्यापेक्षा ‘स्वतःचा माणूस’ बनणे अधिक महत्त्वाचे आहे.* कोणाच्या पायाशी बसून मोठं होण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभं राहून छोटं असणं हजारपट चांगलं आहे.
चमचागिरी म्हणजे केवळ दुसऱ्याची स्तुती नव्हे, तर स्वतःच्या आत्म्याशी केलेला विश्वासघात आहे. आणि जो स्वतःशीच प्रामाणिक नाही, तो आयुष्यात कुणाचाही होऊ शकत नाही.
म्हणूनच, या क्षणापासून एक ठाम निर्णय घेवूया- *चमचागिरीला नकार द्या, स्वाभिमानाला स्वीकारा.* कारण यशाची खरी ओळख ही दुसऱ्यांच्या सावलीत नाही, तर स्वतःच्या प्रकाशात उभी राहण्यात आहे.
ही गोष्ट कडू आहे, जळजळीत आहे-पण तीच खरी आहे!
✍️ सु-भाष्य
9421721063
(सुभाष पाटील)

0 टिप्पण्या