झाडांमध्ये पाणी वर कसं चढंत?
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 5/8/2026 :
गुरुत्वाकर्षण डावलून पाणी वरच्या दिशेने प्रवास करताना आपण कधी पाहिलं आहे?
आपण एखाद्या पेयामध्ये जेव्हा ‘स्ट्रॉ’ घालतो, तेव्हा स्ट्रॉमध्ये वरच्या टोकापर्यंत पेय येण्यासाठी, आपल्याला तोंडाने स्ट्रॉमधली हवा शोषून घ्यावी लागते. स्ट्रॉमध्ये असलेली हवा निघून गेल्यावर तिथे होणारी रिकामी जागा भरून काढण्यासाठी पेय आपोआपच स्ट्रॉमध्ये वरच्या दिशेने खेचलं जातं. मग झाडांमध्ये पाणी मुळांपासून वरच्या दिशेने कसं प्रवास करतं?
अतिशय उंच झाडांच्या अगदी शेंड्याकडच्या पानांपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी, झाड अनेक वैज्ञानिक तत्त्वं वापरत असतं. झाडाच्या जमिनीत पसरलेल्या मुळांवर केसांसारखे अनेक बारीक मूलकेश असतात. मातीत असलेलं पाणी या मूलकेशांमध्ये शोषलं जातं. याला परासरण क्रिया कारणीभूत असते. मूलकेश आजूबाजूच्या मातीच्या तुलनेत थोडे कोरडे असतात, म्हणून ओल्या जमिनीतलं पाणी, कोरड्या मुळांमध्ये शोषलं जातं. झाडांमध्ये पाणी वाहून नेण्यासाठी झायलेम नावाच्या अतिशय बारीक व्यासाच्या जलवाहिन्या असतात. मूलकेशांनी शोषलेलं पाणी या जलवाहिन्यांमध्ये दाखल होतं.
झाडाच्या शेंड्याच्या पानांमध्ये असलेलं पाणी, पानांना असलेल्या छिद्रांतून वाफ होऊन बाहेर हवेत सोडलं जातं. याला आपण बाष्पोत्सर्जन असं म्हणतो. हे पाणी बाहेर निघून गेल्यामुळे, झाडाच्या जलवाहिन्यांमध्ये पोकळी निर्माण होते. जशी आपण स्ट्रॉमधून हवा शोषून घेतल्यावर होते तशी! साहजिकच जलवाहिन्यांमधलं पाणी वर खेचलं जातं.
पाण्याच्या दोन रेणूंमध्ये संसंजन बल असतं. संसंजन बल म्हणजे पाण्याच्या दोन रेणूंना एकमेकांबद्दल असलेलं आकर्षण, संसंजनामुळे पाण्याचे थेंब एकमेकांना धरून ठेवतात. त्यामुळे जसजसे पाण्याचे वरचे थेंब खेचले जातात, तसतसे ते आपल्या मागे असलेल्या थेंबांनाही वर खेचतात. शिवाय पाण्यामध्ये आसंजन बलही कार्यरत असतं. म्हणजेच पाण्याला दुसर्या पदार्थांच्या रेणूंबद्दलही आकर्षण असतं. जेव्हा आपण पेल्यातून पाणी पितो तेव्हा पाणी प्यायलेला पेला पूर्णपणे कोरडा कधीच होत नाही, कारण ज्या पदार्थाने तो पेला बनलेला असतो त्या पदार्थाबद्दल पाण्याला असलेलं आसंजन, जलवाहिन्यांबद्दल पाण्याला असलेलं आसंजन बल आणि पाण्याच्या रेणूंना एकमेकांबद्दल असलेलं संसंजन बल, या दोन्हींमुळे जल नलिकांमध्ये पाण्याच्या थेंबांची साखळी वर चढू लागते.
शिवाय मुळांमध्ये काही प्रमाणात मूलदाब ही असतो. म्हणजे जमिनीतून शोषलेलं पाणी, मुळं थोड्या प्रमाणात जलवाहिन्यां मधून वरच्या दिशेने ढकलत असतात. अर्थात हा दाब क्षीण असतो, पण तो काही अंशी, पाणी वर चढण्याला कारणीभूत होतो.
अशा प्रकारे नैसर्गिकरीत्याच झाड स्वत:चा पंप तयार करतं. माणसासारखी इतर कोणत्याही यांत्रिक पंपांची गरज त्याला भासत नाही.
✍️ डॉ. मानसी राजाध्यक्ष
दिपक तरवडे, रूपाली तरवडे, नाशिक
✍️ प्रसारक : प्रविण सरवदे, कराड
मराठी विज्ञान परिषद
====================
0 टिप्पण्या