११ ऑगस्टला संत नामदेव समाधी सोहळा

 


११ ऑगस्टला संत नामदेव समाधी सोहळा

वृत्त एक सत्ता न्यूज

पंढरपूर | प्रतिनिधी

संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ६७६ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथील संत नामदेव मंदिर (जन्मस्थान) येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आषाढ वद्य ते श्रावण शुद्ध कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह, भजन, कीर्तन, प्रवचन, हरिपाठ आणि जागर असे विविध धार्मिक उपक्रम पार पडणार असल्याची माहिती संत नामदेव महाराजांचे वंशज ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज नामदास यांनी दिली.

उत्सवाचा मुख्य दिवस मंगळवार, ११ ऑगस्ट रोजी असून सकाळी संत नामदेव महाराज, संत जनाबाई महाराज आणि संत सावता माळी यांच्या संजीवन समाधी सोहळ्यावर आधारित कीर्तन होणार आहे. त्यानंतर पुष्पवृष्टी, आरती, नैवेद्य आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. संत नामदेव शिंपी समाजाच्या वतीने भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.

यापूर्वी ९ ऑगस्ट रोजी दिंडीची नगर प्रदक्षिणा, तर १० ऑगस्ट रोजी क्षीरापतीचा कार्यक्रम होईल. १२ ऑगस्ट रोजी काल्याचे कीर्तन आणि पालखीसह दिंडीची नगर प्रदक्षिणा आयोजित करण्यात आली आहे. या धार्मिक सोहळ्यास संत नामदेव महाराज भक्त परिवार, समस्त शिंपी समाज आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज नामदास यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या