गाढव व्हा, पण खेचर होऊ नका,
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 22/8/2026 :
गाढव व्हा, पण खेचर होऊ नका, हे वाक्य थोडंसं विचित्र वाटतंय? शक्य आहे. पण खेचर होऊ नका म्हणजे नेमकं काय? आजच्या भाषेत सांगायचं तर “म्यूल” होऊ नका.
आणि म्यूल म्हणजे काय? जाणतेपणी किंवा अजाणतेपणी दुसऱ्याच्या बेकायदेशीर पैशांची वाहतूक करणारी व्यक्ती. म्हणजेच, गुन्हेगारांच्या पैशांच्या व्यवहारातलं एक प्यादं. हे समजून घेण्यासाठी आधी थोडा इतिहास पाहू या
सत्तर-ऐंशीच्या दशकात भारतात एक भन्नाट स्कीम चालायची. “दुबई बघायचं आहे? चला, आम्ही तुम्हाला फुकट नेतो” त्या काळात विमानप्रवास आणि दुबई पाहणं हेच मोठं अप्रूप होतं. त्यामुळे अशी ऑफर आली की अनेकांना ती स्वप्नवत वाटायची.
तुमचा पासपोर्ट काढून दिला जायचा. विमानाचं तिकीट. दुबईची ३-४ दिवसांची सफर. आणि तेही जवळजवळ फुकट, पण लक्षात ठेवा फुकटात काहीही मिळत नसतं. या फुकटच्या दुबई ट्रिपच्या बदल्यात एक छोटंसं काम करायचं असायचं,
परतताना काही सोनं घेऊन यायचं. व्यवहाराच्या दृष्टीने ते अर्धवट कायदेशीर आणि अर्धवट बेकायदेशीर अशा सीमारेषेवरचं काम असायचं. कस्टममधून सुखरूप बाहेर पडलात तर ठीक. पण पकडले गेलात तर? गेले कामातून खरं तर तुम्ही सोन्याच्या तस्करीच्या धंद्यातलं एक प्यादं बनलेले असायचात. अशा व्यक्तीला त्या काळात कॅरियर म्हटलं जायचं.
आज काळ बदलला आहे. सोन्याच्या ऐवजी पैसा आहे. सूटकेसच्या ऐवजी बँक अकाउंट आहे. आणि कॅरियरचं आधुनिक नाव आहे.
MULE म्यूल, म्हणजेच खेचर. खेचर स्वतःचा माल घेऊन जात नाही. दुसऱ्याने दिलेला भार वाहतं. आणि Money Mule? दुसऱ्याचा बेकायदेशीर पैसा स्वतःच्या खात्यातून वाहून नेतो. फरक एवढाच, पूर्वी तुमच्या हातात सोनं दिलं जायचं. आज तुमच्या हातात तुमचंच बँक अकाउंट दिलं जातं.
सध्या अनेक तरुण आणि घरी बसून सतत सोशल मिडियाच्या पोस्ट वाचून वेळ घालवणारे प्रौढ लोक, या जाळ्यात सापडलेले आहेत. म्हणून आज बोभाटाच्या या लेखातून मनी म्युल म्हणजे काय ते समजून घ्या.
मनी म्युल म्हणजे दुसऱ्या व्यक्तीच्या वतीने बेकायदेशीरपणे मिळवलेला पैसा स्वीकारणारी, जमा करणारी किंवा एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पाठवणारी व्यक्ती.
मनी म्युलच्या व्यवहारात एखाद्या व्यक्तीला तिच्या बँक खात्याचा वापर करण्यासाठी प्रवृत्त केले जाते. तिच्या खात्यात रोख रक्कम जमा केली जाते, चेक जमा करण्यास किंवा वायर ट्रान्सफर करण्यास सांगितले जाते. त्यानंतर ठरावीक कमिशन वजा करून उर्वरित पैसा दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात किंवा इतर व्यक्तींकडे पाठवला जातो.
*मनी म्युलचे दोन प्रकार आहेत :*
*१. Willing Mules :* जाणीवपूर्वक सहभागी होणारे .हे लोक गुन्हेगारी कारवायांमध्ये जाणीवपूर्वक सहभागी असतात. मनी लाँडरिंग करणाऱ्या टोळ्यांसाठी ते स्वतःच्या नावाने बँक खाती किंवा विविध आर्थिक सुविधा उघडतात आणि बेकायदेशीर पैशांच्या व्यवहारात सक्रियपणे मदत करतात.
*२. Duped Mules :* फसवले गेलेले मनी म्युल.या व्यक्तींना आपण एखाद्या कायदेशीर आर्थिक व्यवहारात सहभागी आहोत, असे वाटत असते. काही वेळा एखाद्या व्यक्तीला आपत्कालीन परिस्थितीत मदत करत असल्याचेही त्यांना सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र त्यांचा वापर गुन्हेगारी पैशांच्या हस्तांतरणासाठी केला जात असतो.
मनी म्युलच्या व्यवहारातील सध्याचे ट्रेंड असे आहेत,
तंत्रज्ञानातील प्रगती आणि डिजिटल पेमेंट्सच्या वाढीमुळे Money Muling आता अधिकाधिक जागतिक स्वरूपाचे झाले आहे.
*भारत :* विविध बँकांमधील सुमारे ४.५ लाख मनी म्युल खाती गेल्या वर्षी गोठवण्यात आली.
*ऑस्ट्रेलिया :* बेकायदेशीर पैसा फिरवण्यासाठी १ लाखांहून अधिक बँक खाती वापरली गेली. त्यापैकी १३,००० पेक्षा कमी खाती बँकांनी बंद केली. गुन्हेगार विशेषतः विद्यार्थी आणि व्हिसाधारकांना लक्ष्य करतात.
*युनायटेड किंगडम :* Santander UK च्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२३ ते सप्टेंबर २०२४ या काळात २५-३४ वयोगटातील तरुणांमधील मनी म्युल प्रकरणांमध्ये ३२% वाढ झाली.
*अमेरिका :* एका अहवालानुसार, २०२४ मध्ये जवळपास २० लाख मनी म्युल खाती होती. मनी म्युल फसवणुकीत ८ कोटी डॉलरपेक्षा जास्त नुकसान झालेले आहे.
*मनी म्युलची भरती कशी केली जाते?*
Professional Money Launderers (PML) म्हणजे व्यावसायिक पद्धतीने मनी लाँडरिंग करणारे लोक. ते प्रामुख्याने परदेशात किंवा इतर देशांत राहणाऱ्या समुदायांमधून,तरुणांमधून, विशिष्ट सामाजिक किंवा जातीय समुदायांमधून मनी म्युल शोधतात.
त्यासाठी ते विविध मार्गांचा वापर करतात, Spam Emails, नोकरीच्या वेबसाइटवरील जाहिराती, सोशल मीडिया, Instant Messaging आणि वर्तमानपत्रातील जाहिराती.
अनेकदा मनी म्युलच्या व्यवहारांचा संबंध Phishing, Malware, Credit Card Fraud आणि Business Email Compromise यांसारख्या सायबर गुन्ह्यांशी असतो.
महत्त्वाचे म्हणजे, अनेक मनी म्युलना आपण गुन्हेगारी कारवाईला मदत करत आहोत याची कल्पनाच नसते. काही संघटित गुन्हेगारी टोळ्या मनी म्युलचा वापर बनावट चेक वटवण्यासाठी किंवा चोरीच्या क्रेडिट कार्डचा वापर करून वस्तू खरेदी करण्यासाठी देखील करतात.
*मनी म्युल ओळखायचा कसा?*
बँका आणि वित्तीय संस्थांनी काही Red Flags (संशयास्पद संकेत) लक्षात घेतल्यास मनी म्युलच्या व्यवहारांना लवकर ओळखता येते.
*उदाहरणार्थ :* ग्राहक विद्यार्थी, बेरोजगार किंवा निवृत्त आहे. ग्राहकाच्या खात्यात तिसऱ्या व्यक्तीकडून किंवा संशयास्पद खात्यातून पैसे येतात. ग्राहकाच्या खात्यातून उच्च-जोखीम असलेल्या परदेशी देशांकडे पेमेंट केले जाते.
ग्राहक देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणच्या ATM मधून रोख रक्कम जमा करून ती एका खात्यात पाठवतो. ग्राहकाच्या खात्यात अल्प कालावधीत वेगवेगळ्या ठिकाणांहून वारंवार रोख रक्कम जमा होते.
थोडक्यात, मनी म्युल म्हणजे गुन्हेगार आणि बेकायदेशीर पैशाच्या अंतिम लाभार्थ्यामधील एक मानवी दुवा. त्याचे स्वतःचे बँक खाते वापरून पैसा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरवला जातो. काही म्युलना हे माहीत असते, तर काही जण नोकरी, प्रेमसंबंध किंवा मदतीच्या नावाखाली नकळत या जाळ्यात अडकतात.आणि म्हणूनच लक्षात ठेवा गाढव व्हा, पण खेचर होऊ नका.
रामदास
🖊️संकलन : प्रविण सरवदे, कराड
संदर्भ : बोभाटा,

0 टिप्पण्या