🍀 रानभाजी - चिवळ 🍀
*स्थानिक* : चिवळ
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 16/8/2026 :
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 16/8/2026 :
चिवळ वनस्पतीचे बारीक तुकडे ज्वारीच्या पिठात मिसळून त्याचे कोंबडी खाद्य म्हणून लहान गोळे बनवितात. म्हणूनच या वनस्पतीला इंग्रजीत 'चिकन वीड' म्हणतात. ही वनस्पती ओलसर, पाणथळ जागेत, शेतात व बागेत तण म्हणून वाढते. ही वर्षायू वनस्पती जमिनीवर पसरत वाढते. ही अगदी नाजूक असून खोडांचा, फांद्यांचा व पानांचा आकार लहान असतो.
*खोड*- नाजूक, मांसल, पसरणारे, बारीक केसांचे वलय, पेरांपासून तंतूमय मुळे फुटतात.
*फांद्या*- अनेक, जमिनीवर सर्वत्र पसरणाऱ्या, मांसल पण नाजूक.
*पाने*- साधी, समोरासमोर, लंबगोलाकार, मांसल जाडसर. देठ लहान, फुले पिवळ्या रंगाची, फांद्यांच्या टोकांवर येतात.
*फुले*- फुलांच्या सभोवताली चार पाने. फुलांचे देठ लहान. पाकळ्या चार.
*फळे*- लहान, लांब, कोनाकृती. बिया असंख्य, लहान, गोलाकार, काळसर तपकिरी रंगाच्या, खडबडीत. नोव्हेंबर डिसेंबर या कालावधीत फुले येतात.
*औषधी गुणधर्म*
# चिवळ या वनस्पतीच्या बिया मूत्रपिंड आणि बस्ती रोगात वापरतात.
# चिवळीच्या बिया स्नेहन आणि मूत्रजनन गुणधर्माच्या आहेत. बियांच्या फांटामुळे लघवीचे प्रमाण वाढते.
# दातांतून, कफातून तसेच लघवीतून रक्त जात असल्यास ते बंद करण्यास चिवळीचा रस देतात.
# मार लागल्यास, ठेच लागल्यास दाह आणि सूज कमी करण्यासाठी ही वनस्पती वाटून त्यावर बांधतात.
# चिवळ मूळव्याधीवर गुणकारी आहे.
# चिवळची भाजी शीतल, ग्राही, शोथहर आणि रक्तशुद्धी करणारी आहे.
# रक्तपित्तात ही भाजी प्रशस्त तर ज्वरात पथ्यकर आहे.
# चिवळीची भाजी शरीरातील उष्णता कमी करणारी व लघवी साफ होण्यासाठी उपयुक्त आहे.
# लघवीची, हातापायांची व डोळ्यांची होणारी जळजळ चिघळच्या भाजीने कमी होते.
# चिवळी मध्ये मज्जासंस्थेवर प्रभावी कार्य करणारे; तसेच कर्करोग प्रतिबंधक गुणधर्म असतात.
*पाककृती*
# साहित्य- चिवळीची भाजी, डाळीचे पीठ, तेल, फोडणीचे साहित्य, मीठ, लसूण, हिरव्या मिरच्या.
# कृती- भाजी स्वच्छ निवडून, धुऊन, बारीक चिरून घ्यावी. कढईत तेल गरम करून फोडणी करून घ्यावी. मिरच्यांचे तुकडे करून फोडणीतच टाकावेत. नंतर त्यात चिरलेली भाजी घालावी. चवीपुरते मीठ घालून दोन मिनिटे परतून घ्यावी. ही भाजी पटकन शिजते. नंतर त्यावर डाळीचे पीठ हळूहळू भुरभुरत एकीकडे हलवत गुठळ्या न होता पेरावे. ही भाजी पटकन शिजून हलकी व मोकळी होते. काही वेळा फोडणीत लसणाच्या पाकळ्या ठेचून घालाव्यात. यामुळे भाजीला चांगला स्वाद येतो.
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
स्त्रोत : अग्रोवन/डॉ. मधुकर बाचुळकर

0 टिप्पण्या