■ भारत कोणत्या देशांना वीज पुरवठा करतो ?
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 30/8/2026 :
भारताकडे मोठी वीज निर्मिती क्षमता आणि शेजारी देशांशी जोडलेली प्रसारण व्यवस्था असल्याने सीमापार वीज व्यापार हा दक्षिण आशियातील ऊर्जा सुरक्षेचा महत्त्वाचा भाग आहे. एका देशात वीज निर्मिती जास्त झाली तर ती शेजारी देशाला विकता येते आणि दुसऱ्या देशात मागणी वाढल्यास त्याला वीजपुरवठा करता येतो. त्यामुळे संसाधनांचा अधिक कार्यक्षम वापर होण्या सोबतच भारताची प्रादेशिक ऊर्जा क्षेत्रातील भूमिका महत्वाची आहे.
१) बांगलादेश : हा देश भारताचा मोठा वीज ग्राहक आहे. अदानी पॉवरच्या झारखंड मधील गोड्डा प्रकल्पातून १,४९६ मेगावॅट वीज बांगलादेशला पुरवण्यासाठी दीर्घकालीन करार आहे. याशिवाय Sembcorp Energy, Damodar Valley Corporation आणि NTPC च्या प्रकल्पा मधून वीज पुरवठा होतो.
२) नेपाळ : भारत नेपाळ मध्ये द्विपक्षीय वीज व्यापार सुरू आहे. हा व्यापार एकाच दिशेने होत नाही. हिवाळ्यात नेपाळ मधील जलसाठा आणि जलविद्युत निर्मिती कमी झाल्यावर भारताकडून नेपाळला वीजपुरवठा केला जातो. तर पावसाळ्यात नेपाळ मधील जलविद्युत प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती झाल्यास नेपाळ भारताला अतिरिक्त वीज विकतो.
३) भूतान : भूतान हा जलविद्युत निर्मितीसाठी प्रसिद्ध असून, पावसाळ्यात नद्यांमधील पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात वीज तयार होते. या काळात भूतान आपल्या गरजेपेक्षा जास्त वीज भारताला विकतो. तर हिवाळ्यात जलविद्युत निर्मिती कमी झाल्यास परिस्थितीनुसार भारताकडून भूतानला वीजपुरवठा केला जातो. भारत सरकारच्या आकडेवारीत भूतान सोबत आयात निर्यात दोन्ही प्रकारचा वीज व्यापार नोंदवला आहे.
४) म्यानमार : भारत आपल्या सीमावर्ती भागातील ग्रिड कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून म्यानमारला मर्यादित प्रमाणात वीज निर्यात करतो. मात्र भारताकडून म्यानमारला होणारी वीज निर्यात इतर शेजारी देशांच्या तुलनेत कमी आहे.
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

0 टिप्पण्या