ॲनालॉग पनीर म्हणजे काय?
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 22/8/2026 :
ॲनालॉग पनीर म्हणजे दुधाचा वापर न करता किंवा दुधाऐवजी स्वस्त वनस्पती तेल (पाम तेल), स्टार्च (पिष्टमय पदार्थ), मिल्क पावडर आणि विविध रासायनिक घटकांचा वापर करून तयार केलेले कृत्रिम किंवा नकली पनीर. हे दिसायला आणि चवीला खऱ्या पनीर सारखेच भासते.
खरे पनीर हे केवळ शुद्ध आणि ताज्या दुधापासून बनवले जाते; तर ॲनालॉग पनीर हे वनस्पती तेल, पाम ऑइल, स्टार्च, स्किम मिल्क पावडर आणि इमल्सीफायर्स पासून तयार होते. पोषण मूल्यांच्या बाबतीत विचार केला तर; खरे पनीर हे उच्च दर्जाचे प्रोटीन, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वांनी समृद्ध असते; तर ॲनालॉग पनीर मध्ये संपृक्त चरबी आणि स्टार्चचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे त्यातील पौष्टिक मूल्य कमी होते. किंमतीच्या दृष्टिकोनातून, खरे पनीर हे दुधाच्या किमतीमुळे महाग असते; तर ॲनालॉग पनीर हे अत्यंत स्वस्त आणि किफायतशीर असते, ज्यामुळे अनेकदा हॉटेल्स किंवा रेस्टॉरंट्स मध्ये याचा पुरेपूर वापर केला जातो. ॲनालॉग पनीर मधील पाम तेल नि निकृष्ट वनस्पती तेलांमुळे शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल वाढू शकते आणि हृदयविकाराचा धोका बळावतो.
पनीरच्या नावाखाली ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरच्या उत्पादन, साठवणूक आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास १ लाख रुपया पर्यंतचा दंड आणि ६ महिन्या पर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
संदर्भ : इंटरनेट

0 टिप्पण्या