कामाठीपुरा प्रकरण 3️⃣0️⃣
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 10/8/2026 :
*तिच्या जवळ जवळ जात त्या घोळक्याने तिला गिळंकृत केले.*
*बसलेल्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. सीन संपलेला. साळुंखे पुढे गेले त्यांनी त्या मुलीला काही सूचना दिल्या.*
*दुसरा सीन सुरू करायला सांगितलं.*
*इकडे हे सगळे बसलेले अवाक् झाले. थोड्या वेळात ह्यांची चलबिचल होऊ लागली. ह्यांची बसायची वेळ झालेली.*
चिनू स्वामी अण्णाच्या कानात कुजबुजला.
'बाबू थांब' म्हणत दुसरा सीन घेण्याच्या तयारीत असणाऱ्या साळुंखेला अण्णाने थांबवलं.
हे सगळे जण जाण्यासाठी उभे राहिलेले.
‘निघतो का’ साळुंखेने चिनूला विचारले.
‘हो निघतो आम्ही. थोडं काम करायचंय' चिनू म्हणाला.
'येत जा रे बिनधास्त तालीम बघायला... आणि हा मी काय म्हणालेलो ते लक्षात ठेव. गेम प्लानिंग सुमडीत करायचे. काय? हाहाहा.' चिनूच्या पाठीवर थाप मारीत अण्णा हसला.
चिनूपण हसला. हे सगळे पटापट बाहेर पडले.
चिनूची नजर त्या दम देणाऱ्या मुलीवर गेली. ती त्याच्याकडेच पहात होती. तो गुस्सा अजून कायम होता तिच्या नजरेत.
स्वामी अण्णाने ते पाहिलं. त्याने चिनूकडे बघून डोळे मिचकावले.
स्वामी अण्णा. कायम गळ्याला एम्ब्रॉयडरी असलेला पांढराशुभ्र लखनवी कुडता आणि बेल बॉटम पँट, पायात कोल्हापुरी चकाकत्या वहाणा असल्या वेशात असायचा. खांद्यापर्यंत रुळणारे चंदेरी केस, गोरा रंग, गुबगुबीत गाल, तेजतर्रार नाक असली कलात्मक पर्सनालीटी लाभलेला स्वामी अण्णा बघताच क्षणी नजरेत भरायचा.
त्याने जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये कमर्शिअल आर्टिस्टचा डिप्लोमा केलेला. स्केचेस आणि कॅलीग्राफी ह्या विषयात तो माहीर.
सुरुवातीला तो जाहिरात कंपनीत नोकरीला होता. पण त्याला नाटकात काम करायला वेळ मिळेना म्हणून नोकरी सोडून तो फ्रीलान्सिंग करू लागलेला. तिथे त्याचं आणि वेळेचं जमू नाही शकलं म्हणून त्याने फ्रीलान्सिंग पण सोडली. कारण एकच नाटक. नाटकावर, रंगभूमीवर त्याचं भयानक प्रेम. नाटकात रोल करत असताना सुद्धा बॅकस्टेजची सगळी कामं करायचा अण्णा. अगदी सेटची उभारणी ते सेट उतरवण्यापर्यंत ते ट्रकमध्ये टाकेपर्यंत ह्याचा सहभाग असायचा.
त्याला फ्रीलान्सिंग पण नाही जमलं; मग त्याने बॅनर, दुकानाचे बोर्ड, वॉल पेंटिंग, होर्डिंग वगैरे पेंटिंग करण्याच्या कामाला सुरुवात केली. ही सगळी कामं रात्री होत.
रात्रीची वेळ त्याला सुटेबल होती. तालीम संपली, दारू आणि जेवण झालं की अण्णा आणि त्याचा असिस्टंट केंद्रातच बॅनर पेंट करायला घेत. दुकानाच्या बोडींची आणि बॅनरची त्याला भरपूर कामं मिळू लागली. निवडणुका आल्या म्हणजे सर्व राजकीय पक्षांची 'ही' गर्दी व्हायची त्याच्याकडे. रात्रीच्या पोटात दहा-बारा बॅनर आणि बोर्ड उडवीत असे. मग अण्णा सकाळी अकरा वाजेपर्यंत झोप घ्यायचा. सकाळी अकरा ते रात्री बाराची त्याची वेळ स्ट्रिक्टली नाटकासाठी होती.
त्याच्या ब्रशचे स्ट्रोक आणि लेटरिंगची क्वालिटी बघून त्याला भरपूर कामं मिळू लागली. नोकरीपेक्षा जास्त पैसे कमवू लागलेला स्वामी अण्णा. कामाठीपुरा आणि आजूबाजूच्या इलाख्यात तो 'स्वामी पेंटर' म्हणून प्रसिद्ध होता.
रामचंद्र साळुंखे स्वामी अण्णाचा घट्ट मैतर केंद्रातली राज्य नाट्य स्पर्धेची आणि महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्राच्या राज्यस्तरीय नाटकाचं किंवा इतर एकांकिका वगैरेंचे दिग्दर्शन साळुंखेच करायचा. साळुंखेला अण्णा, बाबू म्हणून हाक मारायचा. दोघं एकमेकांचे जिगरी यार.
पाच फूट पाच इंच उंचीचा, काळ्या रंगाचा, जाड अंगाचा, फताड्या पांढऱ्या शुभ्र दातांचा आणि अण्णा सारखाच दिलदार. हसऱ्या वृत्तीचा रामचंद्र साळुंखे ऊर्फ बाबू.
अण्णा नि बाबू कामाठीपुरा कामगार कल्याण केंद्राची शान होते. नाट्य स्पर्धेत ह्यांनी सादर केलेल्या नाटकाला हमखास पारितोषिक मिळायचं.
कामाठीपुऱ्यातील कित्येक बिथरलेली पोरं ह्या नाट्य संस्थेच्या आणि कामगार कल्याण केंद्राच्या आश्रयाला येऊन शांततेचं आणि आनंदाचं जीवन जगत होती.
बाबू म्युनिसिपालिटीच्या घनकचरा खात्यात मुकादम होता. पगारा व्यतिरिक्त बाहेरची कमाई बऱ्यापैकी होती.
संध्याकाळ झाली, नाटकाची रिहर्सल नसली की दोघे बाहेर पडत.
स्वामी अण्णा कडक इस्त्री केलेला, गळ्याशी वेलबुट्ट्या असलेला झब्बा, पायजम्याऐवजी पँट, पायात कोल्हापुरी चपला.
बाबू कडक इस्त्रीचे पांढरे शर्ट, काळी पँट, बाटाच्या सँण्डल असल्या दमदार वेशात दोघेही संथ चालीने अकराव्या गल्लीच्या दिशेने चालू लागत.
त्यांचा पहिला थांबा पंडितच्या चणे-शेंगदाण्याच्या ठेल्यावर होई. तिथून चणे शेंगदाण्याच्या पुड्या घेऊन ते पुढे सरकत.
दहाव्या गल्लीच्या नाक्यावर भटाच्या हॉटेलातून भजी, सेव पापडी असले चाखणे घेऊन ते समोर येणाऱ्या प्रत्येकाची सलामी स्वीकारत, समोरच्याला हाल हवाल विचारत मार्गक्रमण करीत अकरावी गल्लीतल्या चेनव्वा अक्काच्या अड्ड्यावर पोहचत.
मासोळ्या डोळ्यात काजळ घातलेली, आंबाड्यात अनंताची पांढरी शुभ्र फुलं खोचलेली, करकचून काष्टी नेसलेली चेनव्वा आक्का आपल्या गुबदार छातीची घळ दाखवत दोघांचं स्वागत करी.
दोघांना अक्का तिच्या स्पेशल खोलीत बसवी. तशा तिच्या तीन खोल्या होत्या. एक संसाराची, दुसरी मोठी जनरल गि-हाईकांसाठी तिथे बसणाऱ्यांना सर्व्हिस द्यायला काळूण्णा असायचा. तिसरी थोडीशी छोटी पण व्यवस्थित, तिथं अक्का दारूचा पांढरा फुगा फोडून त्यात पाणी टाकून माल बनवायची.
तिसऱ्या खोलीत बसायला कुणाला परवानगी नसायची. हफ्ता घ्यायला येणाऱ्या पोलिसांना अक्का चिरीमिरी देऊन बिल्डिंगच्या दरवाजातूनच पिटाळून लावायची.
त्या पेशल कमऱ्यात अण्णा नि साळुंखे प्यायला बसत.
काम करत करत अक्का स्वामी अण्णा बरोबर तेलुगु भाषेत गप्पा मारी. अण्णाला तेलुगु चांगलं कळे आणि तो बोलेही. बाबुला तेलुगु कळत नसे पण अक्काच्या डोळ्यांची बोली त्याला चांगलीच अवगत होती.
जांभळाच्या पिव्वरचा अख्ख्या बाटलीचा स्टीलचा तांब्या दोघांच्या पुढ्यात ठेवून अक्का ओपनर घेऊन स्वतः सोड्याची बाटली ओपन करी.
सोडा बॉटल ओपन करताना अक्काच्या अंगाची ची लयबद्ध हालचाल होई किंवा ती हालचाल जी अक्का जाणूनबुजून करे, हाय रे हाय, बाबूला मदिरा तिथेच चढायची.
सोबत आणलेली भज्जी नि सेव पापडी अण्णा अक्काच्या हातात देऊन वजडी आणि रक्ती ऑर्डर करी.
शंकर अण्णा. अक्काचा नोकरी सोडून घरी बसलेला, शंभर किलो वजनाचा, प्रचंड पोटाचा नवरा फुल्टू अवस्थेत मध्येच येऊन स्वामी अण्णाला 'शणार्थी' नमस्कार घालून, अक्काकडून क्वार्टर आणि एक्स्ट्रा पैसे घेऊन बाजूच्या मैदानात चाललेल्या जुगाराच्या मैफिलीत सामील होण्यासाठी पळ काढी.
अन् मग बैठकीतली लावणी गाणाऱ्या लावणी सम्राज्ञीच्या दिमाखात चेनव्वा अक्का आडवी मांडी घालून एक हात जमिनीला टेकवून ह्या दोघांच्या पुढ्यात बसे.
मैफिलीला सुरुवात होई. प्रत्येक प्याल्यागणिक रंग चढे. दारू ओतताना, चखणा वाढताना बाबू आणि अक्काचा एकमेकांना हस्तस्पर्श होई. लाजऱ्या हास्याची देवाण घेवाण होई, आंखमिचौली घडे.
कामाठीपुऱ्यातल्या प्रत्येक गल्लीत दोन तरी हातभट्टीच्या दारूचे धंदे असत. स्थानिक लोकच करीत ते. त्यात आघाडीवर असत त्या बायका.
पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी पुरुष बायकांना पुढे करीत. बेचनवर म्हणजे दारू वाढायला पण बायकाच असत.
ग्लासात कट मारायला आणि उधारीवर दारू प्यायला येणाऱ्यांना नकार द्यायला बायकांना चांगलं जमे.
पुढे पुढे धंद्यात जम बसून बऱ्यापैकी कमाई होऊ लागे मग नोकरी करणारे पुरुष कामावर न जाता ऐयाशीत रमत. घरातल्या लेकराबाळांना छानछौकीची सवय लागे आणि मग दारूचा धंदा हाच एकमेव कमाईचं साधन होई.
छोटी खोली, तिथेच मुलं अभ्यास करताहेत, तिथंच गिऱ्हाईकं प्यायला बसलेत, तिथंच घरातली म्हातारी जेवतेय असा सगळा कारभार असायचा.
चलती असलेल्या पैश्यामुळे कामाला न जाणाऱ्या नवऱ्याची नोकरी गेल्यामुळे गृहिणीवर दारूचा धंदा करण्याची पाळी येई मग त्यात तिचा शाळा शिकणारा मुलगा किंवा मुलगी तिच्या मदतीला येई. तो किंवा ती गिऱ्हाईकांना दारू वाटण्याची, चाखणा, सिगारेट, विडी आणण्याची कामं करी.
एखाद्या बिल्डिंगच्या खाली अंडेवाला, चणेवाला, वजडी, रक्तीवाला अशी टोपं घेऊन बसलेली माणसं किंवा बाया दिसल्या की हमखास समजावं की इथे दारूचा अड्डा आहे.
इथे घरात प्यायला येणारी माणसं मात्र सभ्य असत. आजूबाजूला राहणारी किंवा शेजारच्या गल्लीतली ओळखीची अशी सगळी मंडळी असत. बहुतेक कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये कढीयाकाम करणारे कामाठी लोक असत किंवा विड्या वळणारे कामगार असत. मराठी चाकरमनी पण होते.
अगदी घरातल्या मेंबरसारखे हे लोक त्या घरात मस्त दारूची बैठक जमवत. घरातल्या बाईकडे कुणी वाईट नजरेने पाहिले किंवा चाळे केले की तो फुटलाच म्हणून समजा.
दारूचा धंदा असलेल्या प्रत्येक बिल्डिंगखाली दारूच्या धंद्याचा शेठ किंवा त्याची म्हातारी नाहीतर म्हातारा येणाऱ्या जाण्याच्यावर झाडी मारायला उभे असायचे. प्रत्येकाला आपल्या आपल्या गिऱ्हाईकाची खास ओळख. तो बिल्डिंग ओलांडून दुसऱ्या बिल्डिंगच्या दारूच्या अड्यात घुसण्याची कुणाची काय बिशाद! आपला कस्टमर आपल्या अड्ड्यात यावा म्हणून ही पाळत ठेवली जायची.
अक्काचं पण काहीसं असंच.
तिच्या ठरलेल्या गिऱ्हाईकांत स्वामी अण्णा, बाबू साळुंखे खास टापटीप कपड्यात येणारे, शिकलेले. ह्यांच्या तोंडात कधी शिवी नसे. बैठकीत मराठी, हिंदी सिनेमांची आणि नट-नट्यांची चर्चा... त्यामुळे हे दोघे चेनव्वालाच नव्हे तर तिच्या अख्ख्या घराला आवडायचे.
हे दोघं येताना चॉकलेट, भज्जी, बिस्कीट चेनव्वाच्या मुलीला खाऊ म्हणून घेऊन यायचे. तेव्हा मुलांचेही ह्यांच्यावर फार प्रेम. मुख्य म्हणजे हे दोघे जण उधारी ठेवत नसत. रोकडा व्यवहार असे ह्यांचा. त्यामुळे चेनव्वाच्या दारूच्या अड्याचे दरवाजे ह्यांच्यासाठी रात्री-अपरात्री खुलायचे. अगदी शिवाजी मंदिरला नाटकाचा शेवटचा 'शो' बघून आले तरी हे दोघे प्यायला कामाठीपुऱ्यांत अक्काकडेच येत. एक-दीड वाजता दाराची कडी खटखटवून अक्काला उठवत आणि अक्काही न करवादता ह्यांना दारू सर्व्ह करी. मग ह्यांचे त्या नाटकावर तीन-साडे तीन वाजेपर्यंत चर्चासत्र घडे.
अक्का लख्ख जागी असायची. हे दोघे झिंगेपर्यंत
दारूचा धंदा आता पोटापाण्याचा व्यवसाय झाल्यामुळे चेनव्वालाही गिऱ्हाईकांची सरबराई करणं भाग होतं.
कामाठीपुऱ्यात अहोरात्र चालणारे पस्तिस - एक तरी दारूचे धंदे असतील.
अक्काचा नवरा हातभट्टीच्या दारूच्या धंद्याच्या जीवावर इंग्लिश दारू प्यायचा. जुगार खेळायचा, दिल्ली दरबारची बिर्याणी नाहीतर बच्चूभाय वाडीतला सिग पराठा त्याला रोजच्या जेवणाला लागायचा. धंद्यातल्या मोडीचे पैसे वापरायचा तो. नाही दिले तर चेनव्वाला मारहाण व्हायची.
घरात दारूचा धंदा असणाऱ्यांच्या नशिबी हीच कुत्तरओढ होती. मुलाचं शिक्षण आणि इतर खर्च होतेच.
तर शराब आणि शबाब चा मस्त लुत्फ घेऊन हि अण्णा- बाबूची जोडगोळी आक्काच्या गुत्त्यातून बाहेर पडे.
बाहेर पडल्यावर रोजच्या प्रमाणे ह्या दोघांत ह्या वर्षी कामगार राज्य नाट्य स्पर्धेत सादर करण्यात येणाऱ्या नाटकावर चर्चा घडे. एकमत, दुमत होता होता बाबूचं हातातल्या घड्याळाकडे लक्ष जाई आणि मग त्याचं घरी निघायचं पक्कं होई.
दोघंही आलेल्या रस्त्याकडून माघारी न वळता उलट्या दिशेने चालू लागत. मदमस्त गतीनं चालता चालता एक-दोनदा जर्क घेऊन रस्त्यातच पुन्हा छोटुसं चर्चासत्र घडे; मग फायनली अकराव्या गल्लीच्या नाक्यावरून बाबू डावीकडे बाप्टी रोडच्या दिशेने रवाना होई आणि स्वामी अण्णा उजव्या बाजूच्या तेरावी गल्लीच्या नाक्यावर असलेल्या नंबरवाल्या बंगल्याच्या दिशेने चालू लागे... कांचीकडे.
अण्णाने गल्लीच्या तोंडावर असलेल्या राम नारायणच्या पानपट्टी वरून एकसो बीस, हरी पत्ती, इलायची, किवाम मारके, कत्री पक्की सुपारीचं पान घेतलं. पान तोंडात घालण्याआधी नेहमीच्या स्टाईलने अण्णाने पानाच्या एका बाजूचा छोटासा कोपरा दाताने तोडून जीभेने फेकला अन् पान मुखात अलगद सरकवलं.
दोन्ही हात एकमेकांवर झटकले. झब्ब्यातून नोट काढून पानवाल्याला दिली. अजून दोन पानांचे पार्सल आणि बाकीचे पैसे त्याने कुर्त्याच्या खिशात लोटले अन् चालू लागला बंगला नंबर पाचशे पंचावन्न दिशेने.
✍️ सुधीर जाधव
💠 क्रमश.. पुढे... प्रकरण ३१
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

0 टिप्पण्या