कामाठीपुरा प्रकरण 1️⃣9️⃣
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 5/8/2026 :
*गालावर पडलेला बापाचा लाफा चिनूच्या संयमाच्या सगळ्या सीमा पार करून गेला.*
‘ये आयझवाड्या झोप ना गपचूप' च्या डरकाळीत त्याची लाथ बापाच्या पोटात बसली. बाप खाली कोसळला. चिन्याला शिव्या घालत बाप उठण्याचा प्रयत्न करू लागला. आता चिनू बापावर तुटून पडलेला.
बऱ्याच वर्षांचा हिशोब त्याच्याकडून अजाणतेपणे चुकता होत होता.
दारू प्यायलेल्या माणसाला मारण्यात त्याला काहीच स्वारस्य नव्हतं. किंबहुना असल्या मर्दानगीचा त्याला तिटकारा होता. पण वर्षानुवर्षे आईला मारहाण करणाऱ्या बापाच्या पाया पडून आर्जव करून थकलेला तो. आता इलाज नव्हता.
आता तो बापाला कुत्र्यासारखा बडवत होता.
बाप ताटावर पडला, ताटातली कालवणाची वाटी उडून बहिणीच्या तोंडावर आदळली. ती विव्हळली. बापाचं प्रचंड धूड जमिनीवर आदळलं
सारं शांत...
चिनूला अरुण आणि चंग्याने घट्ट धरलंय.
बाप गुरगुरत उठण्याचा प्रयत्न करत चिन्याला शिव्या देत कॉटवर धाडकन आडवा झाला.... क्षणात घोरायला लागला.
आई नेहमीप्रमाणे बारदान शोधतेय सगळं पुसायला.
बहिणी रडताहेत. चिन्याच्या मागची सरू उठली. ती आवारावर करायला मदत करू लागली. माईच्या रडवेल्या डोळ्यात झोप पेंगत होती. बाप घोरतोय. आऱ्या, चंग्या घरी गेलेत.
चिनू भिंतीला डोकं टेकवून बसलाय. डोळ्यातून अश्रूंचा झरा वाहतोय. अंधारात पण त्याला आई उठून बसलेली दिसतेय. पाहतेय ती त्याच्याकडे. चिनू देहाचं मुटकुळं करून झोपी जाण्याचा प्रयत्न करतोय.
बापाचं अजस्त्र घोरणं त्याची अवस्था चिघळवतंय...
पहाटेचे पाच वाजलेत. त्याची आई उठलेय कशीबशी पाणी भरायला. अंग ठसासतंय तिचं कालच्या मारहाणीनं.
चिन्याला जाग आलीय. चाळीतल्या नळावर बायकांची गर्दी जमलेय. बायकांची आपापसात कुजबुज चालु आहे. नळाच्या मोरीत लावलेल्या अंधुकशा बल्बच्या प्रकाशात चिनूला आईचा चेहरा दिसतो.
काळजात धस्स होतं त्याच्या. कालच्या मारहाणीत तिचा चेहरा प्रचंड सुजलाय.
इतकं सोसुन पण चिनुची आई नळावर गेली असताना दुरपद आयचं लक्ष गेलंय तिच्याकडे.
'बाय तू जा घरी. ठेव ते हांडे तिथंच. मी भरते. चार ठावकीच तर भरायची आहेत ना, जा लेकी, बघ चिनू पण आलाय, जा झोप' दुरपत आय म्हणाली.
आईचे सुजलेले डोळे पुन्हा पाझरू लागतात. सुजल्या तोंडानिशी ती खोलीकडे वळते.
चिनू आईने आणलेला हंडा पाण्याने भरून तिच्या मागोमाग निघतो. घरातल्या मोरीच्या कठड्यावर ठेवलेल्या स्टीलच्या टाकीत तो हंडा रिकामा करतो. पाच हंड्यांची ती टाकी असते. पुन्हा तीन चकरा चिनू मारतो. पाचवा हंडा मोठी आई आणून देते.
'बस कर लेका, तुला पण अभ्यास करायचा आसंल, तू बस, सुश्याबाय भरल बाकीची ठावकी' म्हणत मोठी आई त्याच्या हातातला हंडा काढून घेते.
'आईक, पूनम, जरा वाईच हालद फटकी उगालून ठेव... बा, पूनम हालद फटकीचा लेप करीन तो मंग मी येऊन लावते हा, आयच्या चेऱ्याला... त्याचं हात झडलं... त्याचा निकाल लागला... गुराढोरावानी मारतो लेकीला' तिनं चिन्याच्या बापाच्या नावाने बोटं कडाकडा मोडली.
दुरपद आई. संत्याची आय. द्रौपदी जाधव नाव मोठ्या आईचं. म्युनिसिपालीटीत कामाला होती... सगळे तिला 'मोठी आय' म्हणून हाक मारायचे. चाळीत ती सगळ्यात सिनियर स्पष्ट बोलणारी आणि फटकळ म्हणून प्रसिद्ध होती. भारी प्रेमळ, अंतरी फणसासारखी मऊ अन रसाळ अडीअडचणीला पहिली धावून येणारी.
गैरवर्तन करणाऱ्या बाप्याची कॉलर डायरेक्ट पकडणारी. लग्न असो, मयीत असो, जयंती असो नाहीतर दंगल असो, मोठी आई काष्ठी खोचून पहिली धावत येणार. चाळीला तिचा मोठा आधार. तशी ती चिनुची चुलतीच. संत्या झाला आणि तात्या वारले. म्युनिसिपालीटीत नवऱ्याच्या जागी नोकरीला लागून मुलाचे संगोपन केलं. खुप दुःख झेललं मोठ्या आईनं.
चिन्याच्या घरची भांडणं सोडवायला नेहमी यायची ती.
चिन्या जेव्हा लहान होता तेव्हा शेजारीपाजारी भांडण सोडवायला येतात म्हणून चिनूचा बाप दाराला आतून कडी लावून आईला मारहाण करी.
एक-दोनदा पोलिसात तक्रारही केलेली. पण काहीच फरक पडला नव्हता. पोलीस दमदाटी करून बापाला सकाळी सोडून द्यायचे, तो दारू पिऊन येऊन पुन्हा मारहाण करायचा.
फार्मात होता साला. बरं आईची घरची स्थिती पण गरिबीची. पाच पोरं पदरात जाऊन जाणार कुठं?
हळूहळू मुलं मोठी होतील नि होईल सगळं नीट. कधी ना कधी तर सुधरेल नवरा. कसाही असला तरी कुकवाला आधार तर आहे. देतो ना वर्षाला साडीचोळी, मुलाबाळांचं शिक्षण पण करतोय. खायला दोन घास पण मिळतात. चिन्याची आई समजूत घालायची स्वताची.
एक चिनू सोडला तर चारही मुलीच. असुरक्षितता भेडसावायची तिला. चिन्या तग धरेल, मुलींचं काय? कसं होईल त्यांचं, मरो... मारतोच ना... खाऊया मार पण करू मुलांना मोठं... आता जन्म दिलाय तर... पुढचं पुढं बघू म्हणत ती चिन्याच्या बारक्या बहिणीला घट्ट आवळून झोपी जायची. अर्थात प्रचंड मार खाल्ल्यावर भयानक झोपेच्या अधीन व्हायची ती. ती झोप नव्हतीच मुळी... तो फक्त तेव्हाचा एक एपिसोड संपलेला असायचा.
खतरनाक जिंदगी होती.
सकाळचे आठ वाजलेत. चिनूचा बाप पटेरी चड्डीत बोडक्या अंगाने पाणी भरलेलं चिम्पाट घेऊन हागायला निघालाय.
बारा पंधरा खोल्या पार केल्यावर सार्वजनीक संडास आहेत. त्या खोल्या पार करून संडास येतो. कमरेला टॉवेल, अंगात गन्जीफ्रॉक किंवा कमरेला टॉवेल, अंग उघडं किंवा कट अंडरवेयर घालून शौचाला जाण्याचा शिरस्ता.
सकाळ झालीय. बाप उठला. विडी शिलगावली त्यानं बाहेर पाण्यानं भरलेलं टमरेल उचललं, विडीचं बंडल आणि माचीस कमरेत खोचलं नि उघड्या अंगानं बेणं निघालं हगायला. जणू काल रात्री काहीच घडलं नाही या आविर्भावात.
घरात सगळी चिडीचूप. बाप हागून आला. मोरीत शिरला. आईनं सुजल्या चेहऱ्यानं स्टोव्हवरचं गरम पाणी बादलीत ओतून दिलं. इस्वान टाकलं. आईने त्याची चड्डी नि टॉवेल मोरीच्या टाकीवर ठेवली. आंघोळ झाली बापाची. अंग पुसत तो बाहेर आला.
'काल काय झालेलं तुम्हाला?' चिन्यानं सवाल केला.
‘कुठं काय?’ बाप गुश्यात.
‘मालवणकर मास्तरांच्या अंगणात मुतलात. इथं घरात येऊन तमाशा केलात, बेदम मारलंत आईला. बघा तिचा चेहरा कसला सुजलाय. अरे गू खाऊन येता पण इथे घरादाराला का त्रास देता?' हळूहळू चिनूचा पारा चढू लागला. 'काय घोडं मारलंय आम्ही तुमचं.. अरे तुम्ही तुमची प्या ना आणि मरा.'
'ये गप सकाळी सकाळी बारवू नकोस' बाप.
‘अरे मग तू रात्री पिऊन येतोस, स्वता मजा मारतोस पण आमच्या आयुष्याची का वाट लावतोस?' चिन्या एकेरीवर घसरलेला बापावर. 'हे बघ... हे बघ. बघ हिचा चेहरा, एवढं बेदम मारतात ?' चिन्यानं आईचा हात धरून तीला बापासमोर उभं केलं.
आई फतकन् खाली बसली.
'अरे तुझ्या पाया पडतो. थांबव आता हे सगळं. अरे नेमकी परीक्षा जवळ आली असताना तुला मस्ती चढते. काही कारण नसताना नुसती मारहाण भेंचोत' चिनू भडकत चाललाय.
‘ये आयझवाड्या गप्प’ चिन्याचा बाप खेकसला. 'तुला माहीत आहे काय हिची किती जणांबरोबर लफडी आहेत ती?'
'अरे कुठली लफडी?', 'कसली लफडी?', 'कुणाबरोबर?' नाव सांग ना त्याचं आणि तुला हे जो कोण सांगतो त्याचं पण नाव सांग. मी विचारतो त्याला. लफडी... आणि असतील लफडी तर ती तुझ्या गांडूपणामुळे. छक्का झाला आहेस तू दारू पिऊन पिऊन. मर्दानगी दाखवायला संशय घेऊन मारहाण करतो ते पण मूत पिऊन. अरे चुत्या शुद्धीत बोल ना आता सोक्षमोक्ष करून टाकतो. बाईवर हात उचलतो हिजडा साला' चिनू संतापला.
‘ये मादरचोत’ म्हणत बापाने चिन्याच्या कानाखाली ठेवून दिली. 'मला हिजडा म्हणतोस? तुला झवून मी काढलाय मी.' चिन्याच्या पोटात जोरदार लाथ पडली. चिन्या कोसळला. तिरमिरत उठला. दाराबाहेर आला. कपडे वाळत घालायची जाड काठी सापडली त्याला. आत घुसला नि बापावर सटासट सुरू झाला.
‘हे घे... हे घे.. हे घे भेंचोद... लहानपणापासूनचं हे घे' म्हणत त्याने बापावर सटासट दोन्ही हातांनी काठी चालवायला सुरुवात केली. बाप आडवा झाला. चिनूला थांबवायला आई पुढे सरसावली. चिन्याने ढकललं तिला. त्याला आज सगळा हिसाब चुकता करायचा होता. चिन्या बापाच्या पायावर, पाठीवर, हातावर, बोच्यावर मिळेल त्या अवयवावर प्रहार करत सुटलेला.
काठीऐवजी चिन्याच्या हातात कोयता मिळाला असता तर बापाचे इतके तुकडे झाले असते की मोजता येणं कठीण होतं.
चिनू घरातल्या आई आणि बहिणीला आवरता येणं कठीण होता. त्याचा रूद्रावतार बघून आई ‘धावा धावा' म्हणत घराबाहेर आली. घराबाहेर तोबा गर्दी. तेवढ्यात फेफ्टी नि अरुण धावत आले. त्यांनी चिनूला धरलं. दोघांनाही तो जुमानत नव्हता. तेवढ्यात आणखी दोघे आले तेव्हा कुठे चिनूच्या हातातली काठी निसटली.
रग्गड पडलेली बापाला. विव्हळत होता. त्याची लाळ गळत होती. शरीरावर काठीचे वळ उठायला सुरुवात झालेली.
बाप खुन्नशीत विव्हळत बसता झाला. 'माझ्यावर हात उचललास? मला मारलंस? बघ तुझी आता आय झवतो की नाय ते. इथंच थांब. आत्ता तुझे हातपाय तोडायला लावतो.' बापाने पँट शर्ट चढवले. चप्पल घातली नि लंगडत निघून गेला.
गर्दी पांगली. फेफ्टी नि आया चिन्याला घेऊन गेले. आई घाबरलेली. चारही बहिणी आईला बिलगल्या.
'इतकं मारतो काय कुणी बापाला?' अरुण
‘अरे सोड. ह्याला बाप बोलतोस?... तुमचा बाप मारतो काय तुमच्या आयला' चिनू आऱ्याचा हात झटकून उठला. त्याला आता घरी जाणं खूप गरजेचं होतं. हा माणूस धमकी देऊन गेलाय.
ह्या साऱ्या गदारोळात तो राधेला विसरलेला. त्याला राधा आठवली. हसू आलं त्याला सोबत रडू पण... 'छ्या साला आपण प्रेमात पडलोय आणि आपल्या घरात ढोरबाजार चालू आहे. काय चिन्या, समजा आलीच राधा तुझ्या घरी तुझी होऊन तर सहन होईल हे सगळं तिला? दारू, शिवीगाळ, मारहाण... हाहाहाहाहा सोड ना यार, पळून जाईल ती दोन दिवसात' मनात म्हणत तो स्वत:शीच हसला.
त्याने घड्याळात पाहिले. बारा वाजत आलेले. आज त्याला शाळेला जाणं जमणार नव्हतं कारण बाप ऑफिसला गेला नव्हता. संत्याने खबर आणलेली. बाप चौदावी गल्लीच्या पांडुशेटच्या अड्यावर पीत बसलाय. येऊन तो पुन्हा राडा करील ह्याची खात्री होती.
आज त्याला राधा आहे की नाही, ती शाळेला येते की नाही, त्या सहाजणी त्या दिवशी का दिसल्या नाहीत, हे सगळं जाणून घेण्याची मुळीच इच्छा नव्हती. तो बेगी बेगी घरी पोहोचला. घरचे सगळे सुतकातच बसलेले. बाप अजून घरी आलेला नव्हता.
शाळा सुटण्याची कर्कश बेल ऐकू आली. चिन्याला घरातून बाहेर पडावेसे वाटेना. तो हातात अभ्यासाचं पुस्तक घेऊन बसला. त्याचं वाचनात लक्ष लागेना. दुपारची शाळा भरण्याची बेल झाली.
एक वाजलेला. आईनं ताट वाढलं. डाळं, भात, लसणाची चटणी. त्याने आईकडे पाहिलं, तिच्या चेहऱ्यावरची सूज थोडी कमी झालेली. हळद फटकी लावल्यामुळे आई काल लग्नातली हळद खेळून आल्यागत भासली त्याला.
'तुम्ही जेवलात सगळे?' सगळ्यांनी हो च्या साईनीत माना डोलावल्या.
चिनूने वाढलेलं भराभर खाऊन घेतलं. हात धुतले नि बाकड्यावर बसला.
टळटळीत दुपार. शाळा भरलेली. फेरीवाले निघून गेलेले.
सन्नाटा.
समोरच्या बिल्डींगमधली फरीदा दारावरचा पडदा सारून त्याच्याकडे चोरून बघतेय. ह्याने तिकडे दुर्लक्ष केलं. उजवीकडे पाहिलं, त्याची लंबी बैठीचाळ एखाद्या ट्रेन सारखी दिसत होती.
लहानपणी जेव्हा पहिल्यांदा त्याने ट्रेन पाहिलेली तेव्हा तो सारखा विचार करायचा की आपल्या चाळीला चाकं असती तर किती बेस्ट ना, आपण कधीपण, कुठंपण, मनाला वाटेल तिथे गेले असतो आणि कुठंही थांबता आलं असतं... कूऊऊउ... त्याच्या कानात ट्रेनचा भोंगा घुमला. तेवढ्यात त्याची तंद्री भंग पावली. हलत येणाऱ्या धूसर आकृतीवर त्याचं फोकसिंग झालं.
त्याचा बाप झोकांडत येत होता.
बाप जवळ आला. चिन्याने त्याच्याकडे भेदक नजरेने पाहिले. आज जो काय होणारा हिशोब त्याला अंगणातच निपटवायचा होता. बापाने गपगुमान पायरी चढून दार गाठलं. कपडे उतरवत, जमिनीवर फतकल मारून त्याने ऑर्डर सोडली ‘ऐ... काय आसंल ते वाढ.'
माई उठली तिनं ताट त्याच्या पुढ्यात ठेवलं.
ताटातलं खाऊन. ताटातच हात धुवून. मोरीत मुतून बाप दाणकन कॉटवर आडवा झाला. त्याच्या मुताचा उग्र दर्प जिवघेणा होता. तो झोपला हे महत्वाचं होतं. त्याच्या पोटावर, पायावर उठलेले वळ पाहून चिन्या कळवळला.
✍️ सुधीर जाधव
💠 क्रमश पुढे..... प्रकरण २०
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

0 टिप्पण्या