कामाठीपुरा प्रकरण 1️⃣8️⃣

 


कामाठीपुरा प्रकरण 1️⃣8️⃣ 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 5/8/2026 :

 *हनुमान जयंती जवळ येत चाललेली. बॉडी बिल्डिगच्या पोजिंग कॉम्पिटेशनमध्ये भाग घ्यायचा होता त्याला. रोहिदास सरांची पण त्याच्याकडून अपेक्षा होती. ह्याची साईज नसली तरी मसल्स, कट्स, पॅक्स चांगले होते. कमी वजनाच्या गटात तो आरामात नंबर मारून जाणार होता. रोहिदास सर खास त्याच्यावर लक्ष देत होते. परिस्थितीने गरीब पण बॉडी बिल्डिंगची आवड असलेला आणि त्या क्षेत्रात पुढे जाण्याची उर्मी बाळगून असलेला चिनू त्यांना खूप भावला होता. म्हणूनच त्यांनी किंवा पक्याने त्याला फी विषयी कधीच विचारले नव्हते. अट फक्त एकच नियमित व्यायामाला यायचं, शरीर कमवायचं, स्पर्धा मारायच्या नि कामाठीपुऱ्याचं नाव रोशन करायचं.*

चिन्या ट्रान्समधून बाहेर आला. मोठ्या हुरुपाने तो जिममध्ये शिरला. आज तो खूप उत्साही दिसत होता. अशोक दाढी नुकताच आलेला.

'चला रे आज शोल्डर आणि बेंच प्रेस घेऊ' सरांनी दोघांना हुकूम सोडला. 

चिनूने आज मजबूत व्यायाम केला. 

तीन दिवस झाले चिनू गल्लीत फिल्डिंग लावत होता. त्याचं टायमिंग पण परफेक्ट जमायचं. बाकीच्या जाताना झोपडीच्या पत्र्याला आकसून उभा राहिलेला चिनू नेमकी राधा आल्यावर आपलं अंग सैल करी. तिच्या अंगाचा स्पर्श, तिनं लावलेल्या 'टाल्कम' चा धुंद गंध हृदयात साठवण्याची केविलवाणी धडपड करायचा तो.

चौथ्या दिवशीही सक्सेस झाला चिन्या. चिनू आता जस्ट हवेत असायचा. व्यायामशाळेत जाऊन भन्नाट व्यायाम करायचा तो. रोहिदास सर आणि बाकीचे त्याचे सहकारी अचंबित व्हायचे.

पाच दिवस झालेले. आता त्याला राधा सोडून पाचही जणी स्माईल देऊ लागलेल्या एकीने तर त्याच्या गुड मॉर्निंगला हसून व्हेरी गुड मॉर्निंग असा रिप्लाय पण दिला. चिनूची आता भीड चेपायला सुरुवात झालेली.

उद्या फिल्डिंगचा सहावा दिवस उद्या चिन् तिला 'राधा... कैसी हो... अब तक गुस्सा हो क्या?’ म्हणायच्या निर्धारात होता.

उजाडलं एकदाचं. नेहमीप्रमाणे सारं पटापट आटोपून चिनू स्पॉटवर हजर. आज 'करो या मरो' या तत्वावर राधाला बोलतं करायचंच, अजिबात बघत नाय म्हणजे काय यार, पार वाट लावलेय हिनं झोपेची. अभ्यासाची पण काशी केलीय. इतका मी कुणात गुंतलो नव्हतो. मनाशीच काहीबाही बरळत चिनू निश्चयाने फील्डवर हजर राहिला.

नेहमीप्रमाणे ठरल्या वेळेवर त्याने अरुंद रस्त्याकडे जाण्याचा स्टार्ट घेतला. अरुंद गल्ली येताच त्याला काही कुजबूज जाणवली. चिनू खुश झाला. ठरल्याप्रमाणे त्याने त्या गल्लीला लागून असलेल्या झोपडीच्या पत्र्याला टेकून आकसून उभं राहण्याचा अभिनयाला सुरुवात केली.

एक पाचवी - सहावीचा जत्था निघून गेला, जो नेहमी जातो. पुन्हा कसलीशी चाहूल. दोन, तीन मुलं दप्तर बडवीत गेली.

येस्स... आत्ता येतील. आत्ता येतील... ह्याचं दिल जोरात धडकतंय. काय बोलायचं ते माहीत आहे, कसं बोलायचं तोच लफडा हाय आणि काही बोलली तर काय बोलायचं, वगैरे वगैरे संवादाची उजळणी चालूच होती.

आत्ता येतील. आता यायलाच हव्यात. त्याने घड्याळात पाहिलं. अरे शाळेची तर वेळ झाली. अजून कशा आल्या नाहीत ह्या? तिकडे सर पण वाट बघत असतील. चिन्याची घालमेल सुरु झाली. इतक्यात शाळा भरल्याची कर्कश बेल वाजली. शाळेतून राष्ट्रगीताचा आवाजही येऊ लागला.

बापरे सगळ्याच कशा गैरहजर? एक तरी यायला हवी होती ना? काही गडबड तर झाली नसावी? चिनू स्वतःशीच गणित मांडू लागला. तिरमिरीत तो पाचवी, सहावी, सातवी गल्लीच्या नाक्यावरही राउंड मारून आला. कोणच नव्हतं. काय झालं असेल यार... पावणे आठ झालेले. आता जिममध्ये जाण्यात काही पॉइंट नव्हता. अभ्यास पण करायचाय.

निराश मनाने चिनू घराकडे वळला. अरुणच्या घराकडे जाऊन त्याने शिट्टी घातली. शिट्टीसरशी आऱ्या बाहेर आला.

‘काय रे लवकर आलास जिमवरनं' आऱ्या.

अरुण, चिन्याचा बालमित्र. अगदी घट्ट फेफ्टी, अरुण, चंग्या आणि काळ्या मोहन एकाच वयाचे. चिनू ह्यांच्यापेक्षा दोन, तीन वर्षानी लहान. फेफ्टी, अरुण, चंग्या, काळ्या मोहन यांनी आठवी-नववीला शाळेला रामराम ठोकलेला. मोहन स्मॉल स्केल इंडस्ट्रीजमध्ये कामाला, फेफ्टी बेकार, अरुण एअर कंडीशन आणि रेफ्रिजरेटरचा कोर्स करायचा. चंग्याची पण शाळेच्या नावाने बोंब होती. त्याच्या वडिलांच्या प्रिंटींगच्या ब्लॉक मेकींगचा धंदा होता. तिथे तो दादांना मदत करायचा. चंग्याचा भाऊ सांभा उत्तम आणि नावाजलेला ड्रमसेट वादक होता. त्याला असिस्ट करता करता चंग्याही मग ड्रमसेट, ढोलक वाजवायला शिकलेला. ब्लॉक मेकिंगचा धंदा बंद झाला आणि चंग्या मग फुलटाईम वादक झाला. कला होती चंग्याच्या अंगात. त्याच्या हातात जादू होती. ढोलक वाजवताना मंत्रमुग्ध करायचा तो.

फेफ्टी थोडा घसरलेला. तो शाळेतील आवारातल्या फेरीवाल्यांकडून हफ्ता वसूल करायचा. संध्याकाळी ताडी - माडी ढोसायचा. भाई व्हायचं होतं त्याला. झटपट श्रीमंत होण्यासाठी काहीही करण्याची तयारी होती.

‘यार ती आली नाही रे' चिन्या, अरुणला सकाळचं प्रकरण सांगतोय. 

'आजारी बिजारी असेल.'

‘सगळ्याच कशा आजारी असू शकतात?'

'काय झालं असेल रे चिन्या... भांचोद पोलीस कम्प्लेट बिम्प्लेट तर केली नसेल ना रे?'

‘हाड... आयघाल्या मग इतक्यात डब्बा येऊन मला उचलून घेऊन गेला असता.' 'हम्म्म्म... शाळेत जा लवड्या... नंतर बोलू वखारीत.. एक काम करतो. मी झाडी ठेवतो शाळा सुटल्यावर.'

अरुणने चिनूला पिटाळलं.

शाळेतून आल्यावर अरुणची भेट नाही झाली. ते सगळे कामाला जात. रात्री प्यायला वखारीत जमत. चिनू पण डिस्पेंसरीत निघून गेला. डोळ्यासमोर त्याला फक्त ती दिसत होती.

रात्री दवाखाना लॉक करून चिनू वखारीकडे निघाला.

हिरामण दादा, चंग्या, मोहन, फेफ्टी, अरुण, म्हाद्या, अशोक, किशोर गायवाला सगळे आपापला माल घेऊन बसलेले.

'ये ये...' वखारीतल्या बल्बच्या मंद प्रकाशात चिनू दिसताच अरुणने आवाज दिला.

‘बियर मारेगा क्या?' म्हणत किशोरने लंडन पिल्सनरची बाटली त्याच्या समोर धरली. तिला बाजूला सारत त्याने अरुणला प्रश्न केला. 

‘आऱ्या काय झालं?'

'अरे सॉरी यार चिनू मला झाडी नाही मारता आली. बारा वाजता थॉमस आला नी मला एका कामासाठी घेऊन गेला.' अरुण कान पकडून म्हणाला. चिनू नाराज झाला.

'अच्छा सून ना किशोर, अपना फेफ्टी क्या बोल रहा है... प्यार में गिरा है वो बोले किसी लडकी के' अशोक जरीवाल्याने मध्येच पुडी सोडली.

'क्या बात कर रैला है... कौन है वो लडकी?... कहा की है बोलना चंद्या भाय' किशोरने आश्चर्याने विचारले.

कामाठीपुऱ्यातले हे सगळे सोंडके होते. हे सगळे जण खरं तर नितांतसुंदर होते. पण ह्यांच्या राडेबाज आणि व्यसनी स्वभावामुळे ह्यांच्या प्रेमात पडायला कुठलीच मुलगी धजावली नव्हती. त्यामुळे आपला मित्र प्रेमात पडलाय हे कळल्यावर सगळे खुश व्हायचे आणि मुलीने मित्राच्या प्रेमाला फाटा दिल्यावर तर आणखी खुश व्हायचे. मग 'ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं सुरु व्हायचं आणि एकतर्फी प्रेमात असफल झालेल्या मित्राचा गम सेलिब्रेट केला जायचा. पण एक होतं 'तू अगर मुझको ना चाहो तो कोई बात नही, तू किसी गैर को चाहोगी तो मुश्कील होगी' हा प्रकार अजिबात नव्हता. लव ब्रेक मोठ्या खिलाडू वृत्तीने स्वीकारायचे हे लोक. कुठेही अमानुषपणा नव्हता. रिवेंज दि बदला वगैरे नव्हता.

'अरे स्कूल की ही है यार, नाम मालूम नही लेकीन आयटम है' फेफ्टी तंदुरी तोडत म्हणाला.

'ले गांडू.. ये चुत्या किसी लडकी के प्यार में पडेला है और उसको आयटम बोलता है... कब सुधरोगे यार तुम लोग' म्हाद्याने ग्यान पाजळलं. अक्ख्या ग्रुपमध्ये म्हाद्या ग्यानी म्हणून प्रसिद्ध होता. साला बोलायचा पण खरी.

'अरे सच में बहोत प्यार करता हुं मैं उससे वो जबान फिसल जाती है बावा सॉरी' चंद्याने कानाला हात न लावताच पुढ्यातला कबाब उचलला नि तोंडात कोंबला.

‘अबे छोड ना.. ये फेफ्टी आये दिन किसीके भी प्यार में पड़ता है. उस दिन एक हिजडे के पीछे लगा था... सांगू काय?' चंग्याने भांडा फोडला. सगळे हसायला लागले.

चिनू गप्प होता.

'चिन्या तू का बे गप? काय टेन्शन हाय का? सांग ना बावा. आपण कश्यासाठी बसलोय' हिरामण पहिल्यापासून चिनूवर नजर ठेवून होता. त्याला काहीतरी शंका आलेली.

'अरे नाय दा काही नाही असंच आपलं' चिनू उगाचच हसत बोलला.

‘काय नाय दादा, आपला चिन्या पण एका मुलीच्या प्रेमात पडलाय. ती पण शाळेतलीच हाय.' अरुण पचकला. त्याला चढलेली. चिनूने रागाने पाहिलं तसं त्याला आणखी हसू फुटलं.

‘क्या बात है यार, लगता है स्कूल में रापचिक आयटम भरे पडे है, आना पडेगा एक दिन' किशोर गायवाला.

आता किशोरला झालेली.

'क्यू... क्यू आयेगा बे तू चालीमें? लडकी पे लाईन मारने को, गांडू वहां बच्चे पढने के लिए आते है, तेरे जैसे चिंधीचोर को देखने के लिए नै' काळ्या मोहन गरजला. असं पण त्याचं आणि गायवाल्याचं पटायचं नाही. 

'क्या उखाड लेगा बे तू?'

'तू आके तो दिखा चालीमें, गांडू तेरे हात-पैर नही तोडे तो नाम का काल्या नै' म्हणत मोहनने बियरची रिकामी बाटली हातात घेतली.

काळ्या मोहन मुलींचा खूप रिस्पेक्ट करायचा. अगदी अस्सल प्रेम करायचा एखाद्या मुलीवर.

दिसायला कुरूप. कपड्याचं भान नाही. बरं साला त्याला मुली आवडायच्या त्या पण एकदम हाय-फाय.

अरुणच्या घरासमोर त्याची झोपडी. घरची परिस्थिती अत्यंत बिकट आई भाजीपाला विकायची. त्याचे बाबा खूप डेंजरस भर मैफिलीतून त्याची इज्जत काढून त्याला घरी आणायचे. पण तो जेव्हा बसायला लागला मित्रांसोबत तेव्हा त्याच्या बाबांची हिम्मत झाली नाही ती बात वेगळी.

त्याला प्रचंड सुंदर आणि श्रीमंत मुली आवडायच्या. त्याच्या प्रेमाचा क्रायटेरिया वेगळाच होता. माहीत होतं ही मुलगी नाही पटणार... तरी पण दिवसरात्र तिच्या बिल्डींग खाली तिला येता-जाता एक्सोबिस मावा चघळत न्याहाळायचा. एकदा कहर झालेला. दहाव्या गल्लीतल्या एका श्रीमंत मुलीला हा 'आय लव यु' बोलला नि प्रकरण अंगाशी आलेलं. कसंतरी मिटलं ते. पण हा साला ऑलवेज प्रेमात पडायचा. खऱ्या प्रेमात. मनापासून अगदी. म्हणून तो मुलींचा खूप रिस्पेक्ट करायचा.

आडदांड किशोर नि तेवढ्याच ताकदीचा मोहन एकमेकांना भिडणार इतक्यात हिरामण दादाने हस्तक्षेप करून मॅटर मिटवलं. दोघांची गळाभेट घडवून आणली. 

चिनूला हे नेहमीचंच होतं. हे लोक दारू प्यायला बसायचे. दंगे करायचे. एकमेकांच्या गळ्यात गळा घालून रडायचे. एकमेकांची आई - बहीण काढायचे नि साले पुन्हा बाटल्या घेऊन संध्याकाळचे वखारीत जमायचे.

चिन्याने तिथून काढता पाय घेतला. आऱ्या त्याच्या मागोमाग निघाला. अरुण निघाला बघून, चंग्या नि मोहन पण आपापले ग्लास अर्धवट सोडून निघाले.

रस्त्यात संत्यानं चिनूला गाठलं. 'भाऊ कुठे होतास, कधीपासनं तुला शोधतोय. बाबा बघ कसा काकूला मारतोय. पिसाटलाय भयानक. धाव लवकर'

चिन्या घराकडं धावत सुटला.

बघतोय तर ...

घरात जेवणाचं ताट अस्ताव्यस्त पडलंय. बाप लाथा-बुक्क्यांनी आईला हाणतोय. त्याच्या तोंडातून सांडणारा लाळसदृश द्रव आणि नाकातून येणारं फुरफुरणं..सोबत शिव्यांची सरबत्ती.. सगळं ओकारी आणणारं.

उघडाबंब, अगडबंब, चड्डीची पण होश नसलेला बाप... बापाच्या पायाशी लगडलेल्या आईला मारू नका म्हणून गयावया करणाऱ्या त्याच्या इवल्याशा नाजूक दोन बहिणी.

'बाबा तुमच्या पाया पडतो, आईला मारू नका' म्हणत आईला मरेपर्यंत मारणाऱ्या बापाचा पाय पकडून रडत विनवणी करणाऱ्या बहिणीला त्याने मागे सारून आईला मारणाऱ्या बापाचा हात जोरात रोखला.

'ये सोड मादरचोद मधी पडू नकोस' बापाला चिनूने पकडलेला हात सोडवेना. मार खाल्लेली आई सावरतेय स्वत:ला.

‘अरे का मारतोस? काय झालं?' चिनूने बापाला प्रश्न केला. त्याच बरोबर बापाची चिनूच्या कानशिलात पडली.

...हळूहळू बापाचं पिणं वाढलेलं... ऑफिसातून डायरेक्ट चौदाव्या गल्लीतला देशीचा अड्डा. घरी येऊन रोज आईला कुठल्या ना कुठल्या कारणांवरून मारहाण करायचा. बहिणींची अवस्था त्याच्याच्याने बघवायची नाही. रोज रात्री घरात तमाशा चालायचा. शिवीगाळ आणि मारहाण. रात्र अतिशय भयानक असायची. रात्र उगवू नये. चंद्र येऊ नये आभाळात अन घरात बाप येऊ नये असं रात्री बापाच्या येण्याची वाट बघत घराच्या बाकड्यावर बसून काळ्या आभाळाकडे बघत चिनू मनात म्हणायचा. नेमकं हे सगळं परीक्षा तोंडावर असताना आणि सणसूद असताना घडायचं.

✍️ सुधीर जाधव

💠 क्रमश पुढे..... प्रकरण १९

 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या