कामाठीपुरा प्रकरण1️⃣7️⃣

 


कामाठीपुरा प्रकरण1️⃣7️⃣ 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 5/8/2026 :

*नववीपर्यंत प्रकर्षानं चिनूने प्रेमात पडायला टाळलं होतं. मुली काही कमी नव्हत्या, अख्खा मोहल्ला जीव टाकायचा त्याच्यावर. पावश्यांची नीलिमा त्याच्या वाटेवरच असायची. दहाव्या गल्लीतल्या विजू टाकळेची शेवटची बहीण शाली त्याला बघण्यासाठी लांबड्या चाळीतून रोज राउंड मारी.* गडद मिसरुडीचा, कुरळ्या केसांचा, पिळदार शरीराचा, सहा फूट उंचीचा, गोरा-गोमटा चिनू कुणाच्याच नजरेतून सुटायचा नाही. पण लफड्यात पडणं टाळायचा. तसा त्याला वेळही नसायचा.

सकाळी जिम, थोडा अभ्यास नंतर शाळा. शाळेतून आल्यावर चहा - चपाती खाऊन तो बाप्टी रोड जवळच्या, पिलाहाऊसच्या निशात थेटरला लागून असलेल्या मिर्झा डॉक्टरच्या डिस्पेन्सरीत कम्पाउंडरची ड्युटी करायला निघून जायचा. त्याच्या मित्राने त्याला हा पार्ट टाइम जॉब मिळवून दिला होता. दारूच्या बेचनवर मटक्याच्या अड्ड्यावर रायटरचा पार्ट टाईम जॉब करून कंटाळलेला चिन्या संध्याकाळी सात ते दहा डॉक्टर मिर्झाकडे कम्पाउंडरचं काम करत असे. साडे दहाला घरी येऊन बारा वाजेपर्यंत अभ्यास करून तो झोपी जाई ते पण बापाने धिंगाणा घातला नसेल तर.

या कामामुळे चार पैसे त्याच्या खिशात येत. त्यात तो स्वत:चा खर्च भागवी. एखादं टी शर्ट किंवा जीन्स व्यायामानंतर भय्याकडे मलाई मारलेलं दूध इत्यादीची सोय करून तो काही पैसे आईच्या हातात ठेवी. ह्या नोकरीमुळे आता त्याच्या परिस्थितीत बराच बदल घडून आलेला. सुधारण्याकडे त्याचा कल होता. तो मित्रांनाही सुधारण्याचे सल्ले द्यायचा. परिपक्व होत होता चिनू.

नववी पास झाल्यावर त्याने दहावीच्या वर्गात पहिल्याच दिवशी बॉस्कीचं पांढरं शुभ्र शर्ट, भारीतल्या विमलच्या कापडाची खाकी लांब बेल बॉटम पँट आणि पायात कॅनव्हासच्या पांढऱ्या शूज सकट वर्गात कडक एन्ट्री मारली तेव्हा जोशी टीचर पण आ वासून त्याच्याकडे बघत राहिल्या.

आज.. आज आज चिन्याचा काही व्यायामात मूड लागेना.

रोहिदास सरांनी त्याच्याकडे पाहिलं 'इथे कुणी फालतू बसायचं न्हाय. ज्यांना व्यायाम करायचा न्हाय त्यांनी चालते व्हा इथून'. मनोज वऱ्हाडे बैठका मारताना डोळ्यांनी चिनुला ‘ये लवकर' म्हणून खुणावतोय. चिनुने त्याला मानेने येतो म्हणून होकार दिला.

चिनू गुपचूप उठला. चेंजिंग रूममध्ये जाऊन त्याने व्यायामाचे कपडे घातले. शिरस्त्याप्रमाणे हनुमानाच्या मूर्तीला नमस्कार करून पहिले पुलअप्स मारले आणि सूर्यनमस्कार करायला वाकला.

‘चिन्या गाढवा काय चाललंय. जोर, बेन्चप्रेस सकट छातीचा व्यायाम कालच झालाय नव्हं. आरं मंग लेका हे काय करू राह्यलाहेस? बैठका आणि स्कॉट व्हणार हुतं ना रे आज विसरलास की काय? चल अशोकसोबत बैठकांना उभा रहा. साल्यांना बॉडी बिल्डर व्हायचंय. आरं सहा-सहा तास घाम गाळावा लागतो तवा कुठं वाईच बेटकुळं येतात. चल उभा रहा, हजार बैठका झाल्याच पाहिजे नि मंग स्कॉट प्रेस' रोहिदास सर कडाडले.

चिनू गुमान अशोकच्या बाजूला जाऊन उभा राहिला. अशोकच्या बैठका झपाझप होताहेत. चिन्याला मध्येच तिचा चेहरा दिसतोय. मध्येच चिन्याचा तोल जातोय, कंटीन्युटी तुटतेय. त्याच्या तीनशे होता होता अशोकच्या सातशे झाल्या पण.

चिनूने मान झटकून स्वत:ला भानावर आणले. नजरेसमोर आलेला तिचा चेहरा त्याने झटकला कारण त्याला हजार बैठका पूर्ण करून अशोकला स्कॉटची पार्टनरशिप देणं भाग होतं नाहीतर अशोकच्या पण शिव्या त्याला खायला लागल्या असत्या. 

स्कॉट संपल्या संपल्या चिनू रोहिदास सरांकडे धावला 'सर आज जरा लवकर शाळेत जायचं आहे. क्लास आहे.' म्हणाला

'निघा निघा' म्हणत सरांनी परवानगी दिली.

कपडे बदलून, बॅग घेऊन चिनू घराच्या दिशेने धावत सुटला. घरी पोचल्यावर आईने त्याला खायला वाढलं. अभ्यासाला बसला. मन लागेना. अकरा वाजले. आंघोळ आटोपली. युनिफॉर्म चढवला. बॅग घेतली आणि बारा वाजताच तो घराबाहेर पडला.

'अरे एवढ्या लवकर?' आईने विचारलं.

‘अरुणकडे चाल्लोय' म्हणत चिन्या आईकडे न बघता सावकाश आऱ्याच्या घराकडे निघाला.

त्याला पुन्हा तिला बघायचं होतं. तशी ती त्याला त्याच्या घराच्या बाकड्यावरूनही दिसली असती; पण मग आईनं किरकिर लावली असती. अरुणचे बाकडे बेस्ट फिल्डिंग लावायला.

शाळा साडे बाराला सुटणार होती आणि चिनूची तिकडे एकला भरणार होती. घराकडून शाळेत पायी जायला पाऊण तास लागायचा. थोडं लेट गेलो तर येवलेकर सर उभे असायचे पटांगणात हातात वेताची छडी घेऊन. ते मारतील त्याचं भय नव्हतं. पण वाढलेले केस नेमके त्यांच्या नजरेस यायचे नि मग केसांवर त्यांचा भयानक राग निघायचा. तेवढ्याने प्रकरण संपायचं नाही. ते वर्गाबाहेर कोंबडा करून ठेवायचे. ती खूप जीवघेणी गोष्ट होती. पार इज्जतचा भाजीपाला व्हायचा. चिन्याला ह्या गोष्टीची धाकधूक होती. आता हा मॅटर कसा सॉल्व्ह करायचा? इतक्यात त्याला समोर पासकीन मामाची सायकल दिसली. चिन्या स्वतःशी हसला.

चिनू बाकड्यावर बसला. त्याने बॅग खिडकीला अडकवली. नेहमीची शीळ घातली. शिळेसरशी अरुण लगबगीने घराबाहेर आला.

शाळेत जाताना चिन्या अख्ख्या चाळभर शीळ घालत निघायचा. त्याची विशिष्ट शीळ ऐकून त्याचे यार-दोस्त घराबाहेर पडून त्याला टाटा बाय बाय करत. 

शीळ ऐकून बाहेर आलेला अरुण चिन्याला बाकड्यावर बसलेला बघून चक्रावला 'काय रे, शाळेला नाय आज?'

‘चाल्लोय यार, थोडंसं काम आहे. बस इथं' म्हणत त्याने आऱ्याला हाताने ओढत खाली बसवलं.

साडे बाराला पाच मिनिटे उरलेली. सगळे खाऊवाले जमा झाले. दुपारच्या शाळेच्या विद्यार्थ्यांची हळूहळू रहदारी सुरू झालेली.

अचानक दोघांचं लक्ष एके ठिकाणी गेलं. त्यांनी पाहिलं फेफ्टी फेरीवाल्यांकडून हफ्ता वसूल करत होता.

'आय हा बघ काय करतोय?' चिनूने विचारलं

‘रोजचं हाय यार. पैसे घेतो ह्या लोकांकडून.. हफ्ता वसुली... भाई झालाय तो आता' अरुणला फेफ्टीत इंटरेस्ट नव्हता 'तू गांडू का नाय जात शाळेत?... काय लोच्यालबाच्या नाय ना?' त्याला चिनू का थांबलाय ह्यात इंटरेस्ट होता.

इतक्यात शाळा सुटल्याची कर्कश्श बेल वाजली. आनंदाने धावत लहान मुले आधी गेटमधून बाहेर पडून आपापल्या पालकांच्या कुशीत शिरली.

आता चिनूच्या हृदयाची धडधड वाढली. ती अजून बाहेर येईना. चिनूने अरुणचा हात घट्ट धरलेला. अरुणला कळेना नेमकं काय चाललंय.

तेवढ्यात मोठ्या मुला-मुलींच्या ग्रुपमधून चिन्याला ती येताना दिसली. 

उंच बांधा, लखलखणारी त्वचा, शुभ्र दन्तपंक्तींतून मोहरणारे निखळ हास्य, गालावरची खळी. सकाळी दिसलेली तेवढीच फ्रेश दिसतेय ही आताही ... चिनू मनातल्या मनात पुटपुटला. उन्हात तिची सुवर्णगौर कांती अजूनच चकाकत होती.

त्या सगळ्या जणी खाऊवाल्याकडे उभ्या राहिल्या. चिनू दुरून तिला न्याहाळत होता.

स्वच्छ पांढरा उत्कृष्ट कापडाचा युनिफॉर्म, केस नीट विंचरून लाल रिबिनीने बांधलेल्या दोन वेण्या, पांढरेशुभ्र मोजे आणि तितकेच शुभ्र कॅनव्हासचे शूज. त्या ग्रुपमधली ती राजकन्याच जणू.

हिच्या चेहऱ्यात आणि 'संगम' मधल्या वैजयंतीमालाच्या चेहऱ्यात किती साम्य आहे नाही! डिट्टो तिच्यासारखीच दिसतेय. हिचं पण नाव राधा असावं का? चिनू वेगळ्या दुनियेत गेलेला.

अचानक त्या ग्रुपमधल्या एकीचं लक्ष चिनूकडे गेलं. त्यांच्यात खुणवाखुणवी झाली. ते सगळे शांत झाले. ती रागीट नजरेने चिनूकडे बघू लागली. चिनूने मंद हसत तिला रिप्लाय दिला तसं तिनं नाक मुरडलं. त्या साऱ्या आपापली पुडकी घेऊन निघाल्याबरोबर चिन्याने अरुणचा हात सोडून बाकड्यावरून त्यांच्या दिशेन धाव घेतली. लट्याच्या झोपडीला गिरकी घालून चिन्या त्यांच्यासमोर उभा राहिला.

‘रुको रुको सुनो... सिस्टर, बहनजी, कैसी है आप... दर्द थम गया ना आपका? बापरे मै इतना डर गया. देखो इसकी वजहसे मै स्कूल भी नही गया. अब ठीक तो हो ना आप?’ चिनू हृदयावर हात ठेवून चेहऱ्यावर अगदी आर्ततेचे भाव आणून सकाळी धक्का लागलेल्या मुलीशी संवाद साधण्याची कोशिश करतोय.

सगळ्या जणी चिनूकडे रागाने बघताहेत. अरुण ही येऊन उभा राहिलाय आता. तो गोंधळलाय, त्याला मॅटर माहीत नव्हतं.

‘चिन्या आरे काय झालं?' मुलींच्या मॅटरला अरुण ज्याम घाबरायचा? त्यानं चिनूला दबकत विचारलं.

'अरे, सकाळी जिमला जाताना हिला माझा धक्का लागला. रक्त निघालं बिचारीच्या नाकातून त्याची विचारपूस करतोय' चिनूने उत्तर दिलं. तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं. ती रागाने लालेलाल होऊन चिनूकडे बघत होती.

'ठीक है, ठीक है... ज्यादा मस्का मारनेकी जरुरत नही. देखो तो इसकी हिम्मत... सुबह धक्का मारा और अब रास्ता रोकके छेडखानी भी कर रहा है' ती फणकारली.

'वो मॅडम छेड़खानी कर रहा हूं क्या? ये तो मेरे छोटे बहन जैसी है बस हाल पूछ रहा हु इसका' चिन्या आता चिडला.

त्याच्या एका वाक्याने मात्र चमत्कार झालेला. तो धक्का लागलेल्या मुलीला बहीण म्हणालेला.

'नही अब ठीक है. तू भी गुस्सा मत होना राधा इन्होने सॉरी भी तो बोला तू था' धक्का लागलेली मुलगी हेलावून बोलत होती.

चिनू चमकला ‘क्काय... आयला हिचं नाव राधा आहे.' तो मनात खुश झाला.

'अरे व्वा, इसने बहन क्या बोला दिया, तू तो एकदम आईसक्रीम की तरह पिघल गयी, ठीक है मरो तुम लोग... मै चली' म्हणत ती दोघींना दूर सारत निघाली तशा साऱ्याजणी तिच्यामागे तुरुतुरु धावत्या झाल्या.

तिचं खळाळत बोलणं, हसणं, मुरडणं, चालणं, रागावून बघणं सगळंच चिनूचा जीव घेऊन गेलेलं.

त्या गल्लीतून दिसेनाशा झाल्या.

अरुणने चिनूला हलवलं. चिन्याचं लक्ष हातातील घड्याळाकडे गेलं. बापरे एक वाजायला दहा मिनिटे. त्याच्या डोळ्यासमोर येवलेकर सरांचा खुंखार चेहरा तरळला.

हात धरून त्याने अरुणला मामाच्या सायकलकडे नेलं. मामाकडून चावी घेऊन पुढ्यात अरुणला बसवलं. बॅग काखोटीला मारली. मारलं प्याडल सायकलला. अरुण हक्काबक्का. तो चिनूवर ओरडला,

‘अरे भेंचो काय चाल्लय सांगशील तरी'

‘सांगतो सगळं. एक वाजायच्या आत शाळेत नाही पोचलो तर सर जीव घेतील. शाळेला सोड मला नि ही सायकल मामाला दे' वाटेत चिनुने अरुणला सगळं सांगितलं. 'दिल आ गया है अपना भाय उसपे' हे बोलायला पण तो विसरला नाही.

दुसऱ्या दिवशी चिनूला गल्लीजवळ फिल्डिंग लावायची होती.

परफेक्ट टायमिंग साधायचा होता. पुन्हा धक्का लागता कामा नये. सगळी अॅक्टिंग नॅचरल वाटली पाहिजे.

अक्खी रात्र चिनू झोपला नाही. कधी एकदाचं उगवतंय आणि तिला पाहतोय असं झालेलं त्याला. सगळा प्लान व्यवस्थित आखला त्याने.

उगवलं एकदाचं. साडे पाच वाजता तो उठला. टॉयलेट वगैरे सगळं आवरलं. दंड मस्त पिळदार दिसावेत म्हणून त्याने आखूड हाताचं टी शर्ट घातलं. ट्रॅक पँट घालून बॅग घेऊन चिनू सज्ज झाला. गल्लीच्या बोळाशी उभा राहिला. उरात धडधड भरलेली. परफेक्ट टायमिंग, नॅचरल अभिनय वगैरे मनात थैमान घालत होतं.

गल्लीच्या बोळापाशी चिनूं कानोसा घेत उभा राहिला. थोड्याच वेळात त्याला चुळबुळ आणि मंजुळ नाद ऐकू आला. चिन्याने ठरल्याप्रमाणे स्टार्ट घेतला. वळला तो बोळातून, तसा एक मुलांचा आणि मुलींचा जत्था त्याच्या अंगावरून गेला. धक्का लागता लागता थोडक्यात वाचले सगळे.

पण तो ग्रुप नव्हता तो ज्याची चिन्या वाट बघत होता.

‘चला रंगीत तालीम तर झाली' हा स्वतःशीच पुटपुटला नि पुन्हा मागे परतून त्याने बोळाशी जाऊन पोजिशन घेतली.

पुन्हा मंजुळ चुळबुळ कानी पडली त्याच्या चिनूनं पायरवांचा अंदाज घेतला. वळला चिन्या. जिमला चालण्याचा अभिनय करत अन् मस्त समोरासमोर सगळ्यांची भेट झाली.

अरुंद जागेतून त्या सहा-सात जणी एकत्र गठ्याने न येता रांगेने येत होत्या. टायमिंग परफेक्ट जमलेलं. चिनू त्यांना सामोरा जात मस्त हसला.

दोन्ही बाजूंकडून थोडा वेळ स्तब्धता. जागा अगदी अरुंद. दोन माणसं जाऊ शकतात पण आडवी एकमेकांना घासून.

तर... दोन्ही बाजूकडून स्तब्धता.

शेवटी चिनू झोपडीच्या भिंतीला पाठ टेकवून उभा राहिला. अगदी अंग आकसून. त्यांना जागा करून देण्याच्या आविर्भावात, जे त्याच्या प्लानमध्ये होतं. चिनू भिंतीला आडवा टेकून उभा राहिला. त्याने त्यांना जागा करून दिली. त्या एकेक निघाल्या. जिला तो 'बहन' म्हणालेला ती त्याच्याकडे बघून हसली.

ह्याने पण मग 'सब ठीक है ना' ह्या अर्थाने तिच्याकडे हसून पाहिले. तिने मान हलवून प्रतिसाद दिला. ती पुढे गेली. तिच्या मागोमाग राधा राधा चिनूकडे न बघताच रागाने पुढे गेली. तेवढ्यात ह्याने आकसलेलं अंग सैल केलं. तिच्या खांद्याचा ओझरता स्पर्श ह्याच्या भरदार छातीला झाला. तिच्या गंधाने, स्पर्शाने चिनू मोहरून गेला. मागोमाग आणखी दोघी लगबगीने निघून गेल्या, त्या अगदी बारकुश्या होत्या.

सगळ्या जणी जाताच चिनूचं अंग थरथरायचं थांबलं.

त्याला आता व्यायामशाळा आठवली; पण त्याचा पाय जागचा हलेना. तरी पण तो निघाला जिमच्या दिशेने. पटकन थांबला. पळत सुटावं आणि शाळेच्या गेटवर तिला गाठून पुन्हा पाहावं

जमणार नव्हतं. 

सुधीर जाधव

💠 क्रमश. पुढे.... प्रकरण १८

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या