कामाठीपुरा प्रकरण1️⃣6️⃣

 


कामाठीपुरा  प्रकरण1️⃣6️⃣

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 5/8/2026 :

*फेफ्टी, येडा राजू, नितीन काण्या, काळ्या मोहन, बाब्या, पक्या सारे जण तिथे टपकलेले.*

‘सूर्या मार ना यार.. पुरा गेम कर.. कलर लगा है इसको.. पैचाना नै तुने ना... चिन्या है अपना' फेफ्टी चिनूला किंचित मागे सारून त्याच्या बाजूला येऊन उभा राहिला.

‘देखते है तेरेमे कितना दम है' म्हणत त्याने सूर्याचा चॉपर पुन्हा चिनूच्या छातीशी लावला. चिनू हसतोय. त्याची सैरभैर नजर अजूनही राधेला शोधतेय.

सूर्याभायचा चिनूच्या छातीशी लगटलेला चॉपर खाली उतरला.

‘मेरी भैन है वो’ सूर्या नाक फेन्दारीत म्हणाला.

'हा तो ये भी मेरा भाई है बढाना है क्या मॅटर बोल.' फेफ्टी त्याच्या डोळ्यात डोळे भिडवीत म्हणाला.

आता चिनूची सगळी गँग जमा झालेली. तिसऱ्या गल्लीला त्यांच्या बरोबर पंगा घेणं परवडणारं नव्हतं.

वरिष्ठ कार्यकर्ते मध्ये पडले. सूर्याच्या हातातला चॉपर काढून त्याला ट्रकमध्ये कोंबण्यात आलं. चिनू कंपनीला पण त्यांनी तिथून निघण्याची विनंती केली.

सूर्या काही राधाचा सख्खा भाऊ नव्हता. तिसऱ्या गल्लीत चालायची त्याची. गल्लीतल्या मुलींना आपली बहीण मानायची रीत त्याने पाळली होती.

चिनू सुन्न झाला. चंग्याने बियरची बाटली उघडून चिनूच्या हातात टेकवली. चिनू वळला तसे सगळे वळले, सातव्या गल्लीच्या ट्रककडे.

चिनूच्या छातीवर कुणी चॉपर ठेवतंय नि पोरं निमूटपणे बघत उभी राहिलीत असं कधी होणार नव्हतं. पण राधा प्रकरण माहित असलेले सारे मुद्दाम गप्प बसलेले.

वाजंत्री पुन्हा वाजवू लागले. विसर्जनाची मिरवणूक पुढे चालू लागली. चिनू हतबल, नुसता बघत बसला. राधा दूरवर त्याला कुठेच दिसत नव्हती. पुन्हा दिसणार नव्हती कदाचित.

लगोलग तिसऱ्या दिवशी राधेच्या बापानं सूर्यामार्फत खबर काढून हणम्या दादा आणि चिनूच्या बापाची मिटिंग घेऊन चिनूच्या प्रेमपतंगाचा डोर कायमचा कापून टाकलेला.

त्या दिवसापासून राधा चिनूला कधीच दिसली नाही. ना शाळेत, ना कामाठीपुऱ्यात, ना राजस्थानमध्ये.

चीनूने तिला खूप शोधण्याचा प्रयत्न केला. राधेला रातोरात गायब करण्यात आलं. तिच्या कुटुंबाने पण कामाठीपुऱ्यातलं दुकान, राहते घर विकून हळूहळू कामाठीपुऱ्याचा निरोप घेतला.

'काय...?' अरुणने आवाक होऊन विचारलं.

‘पागल झालाय हा.. एकटा चाललेला तिसऱ्या गल्लीकडं. ते बरं झालं मला नाक्यावरच दिसला. अबे एन्ट्री मारायची तर आधीच सांग ना माहीत हाय काय त्या पोरीच्या बापाने सूर्या, बबल्या कंपनीला नोटा देऊन ठेवल्यात चिनू आला तर त्याला खपवायला... सांगतोय तरी ऐकत नाय... राधाला भेटायचंय... राधाला भेटायचंय बोलत होता... कसाबसा हातापाया पडून आणला. तुम्ही लोक पण लक्ष देत नाय यार... काय पण धोका होऊ शकतो.' येडा राजू अत्यंत संतापलेला.

त्याने चिनूची बखोटी पकडलेली. सगळे अरुणच्या घरासमोर जमलेले.

संध्याकाळची सहाची वेळ असेल. व्यायामाच्या निमित्ताने गेलेला चिन्या पाचव्या गल्लीतून तिसऱ्या गल्लीच्या दिशेने वळला. पाणी, टॉवेल वगैरे असलेली बॅग घेऊन चालत असताना देव्याने त्याला पाहिलं. तारेत, त्वेषाने चालणाऱ्या चिन्याला बघून त्याला काहीतरी भलतंच जाणवलं. धावत जाऊन त्याने बकरी पक्याला खबर दिली. बकरी पक्याला माहीत होतं चिनू त्याचं ऐकणार नाही, तो वळला ताडी-माडी केंद्रावर.

तिथे नुकत्याच पोचलेल्या येड्याच्या कानावर बकरीने ही बातमी टाकली. ‘क्या बात कर रैला है' म्हणत येडा बकरी पक्याला घेऊन पळत सुटला. तिसऱ्या गल्लीत एन्ट्री करत असताना त्यांना चिनू दिसला नि दोघांनी त्याला थांबवलं.

अरुणच्या बाकड्यावर बसलेले चार-पाच जण.

‘चल वखारीत जाऊया' बाहेर आलेल्या आईला बघून अने राजूला डोळा मारत म्हटले. अशी पण चिन्या आणि येडा आल्याचे बघून पोरांची गर्दी वाढू लागलेली.

वखारीत.. भयानक गर्दी जमलीय.

‘क्या दिमाग कि मा भेन कर रहेले हो यार... भेंचो ये मेरा मॅटर है. मै संभाल लुंगा' चिन्या डोकं गच्च पकडून म्हणाला.

‘तेरा मॅटर च्युत्या... तेरा मॅटर... और हम लोग कौन है...' फेफ्टी वैतागला.

चिनूला च्युत्या म्हणण्याचा हक्क फक्त त्याला आणि अरुणला होता.

‘चलो अभी एन्ट्री मारते है... मेरेको इसकी हालत नै देखी जाती' अरुणच्या डोळ्यात पाणी जमा झालं.

‘घ्या आपापलं सामान... निघूया.' चंग्या डोळे पुसत म्हणाला. 

चिनू ताडकन उठला.

मागचा-पुढचा विचार न करता निघाले दहा-बारा जण तिसऱ्या गल्लीच्या दिशेने. प्रत्येकाने खिशात, कमरेला काही ना काही खोचलेलं.

बकरी पक्या आणि संत्या चटईत गुंडाळलेलं साहित्य घेऊन त्यांच्या मागून लगबगीने निघाले.

सातवी गल्ली क्रॉस करून झाल्यावर ह्या सगळ्यांना बघून सहाव्या आणि चौथ्या गल्लीतले पंटर त्यांच्यात सामील झाले.

मॅटर बहुतेक सगळ्यांना माहीत होते.

तिसरी गल्ली आली. तिच्या नाक्याशी न थबकता सगळे बिनधास्त आत शिरले. 

शिरले आत... सगळ्यात पुढे चिनू होता.

सूर्या आणि बबल्याला ह्याची आधीच खबर लागली असावी. 

चिनू, फेफ्टी, आऱ्या, चंग्या, काळ्या मोहन, येडा राजू वगैरेंना बघून ते दोघे आणि त्यांची पोरं एका बोळातून समोर येऊन ठाकले.

'क्या हुवा भाऊ' सूर्याने नाक्यावर थांबवत चिनूला सवाल केला.

‘लडकी लेने आए है सूर्या ... बहन बोलता है ना तू उसको तो तू हमारा साला हुवा... बता तुझे मुह दिखाई क्या चाहिए?’ अरुण पुढं येऊन सूर्याची हनुवटी पकडून म्हणाला तसा मागून हशा पिकला.

'देख सूर्या प्यार का मामला है. प्यार से निपटाते है... बाकी तेरी मर्जी...' फेफ्टीने सूर्याच्या खांद्यावर हात टाकत अल्टीमेटम दिलं.

मागे पोरांच्या हातातल्या नंग्या तलवारींनी घट्ट पकड घेतलेली.

सूर्या नाही मानला तर रक्तपात निश्चित होता.

चिनूने डाव्या बाजूला मान वर करून पाहिलं. राधाच्या घराची बंद खिडकी दिसत होती.

चिनूकडे डायलॉगबाजी करण्यासाठी वेळ नव्हता. त्याने पुढ्यात उभ्या असलेल्या सूर्या, बबल्या आणि त्यांच्या पोरांना हाताने बाजूला सारून त्याने राधेच्या बिल्डींगच्या दिशेने धाव घेतली.

चिनूला अडवायाची कुणाच्यात हिम्मत नव्हती.

चिनू सरसर जिन्यावरून चढत दुसऱ्या माळ्यावरच्या राधेच्या घरासमोर पोहोचला. त्याला धाप लागलेली. त्याने दरवाजा ठोठावायला सुरुवात केली. ‘राधा दरवाजा खोलो... दरवाजा खोलो राधा... देखो मै आ गया हु तुम्हे लेनेके लिये... दरवाजा खोलो राधा...' म्हणत तो दार बडवू लागला. त्याचं कडीकडे लक्ष गेलं. बघतो तर त्या दरवाजाला कुलूप.

चिनू हतबल होऊन खाली बसला. त्याच्या मागून सगळी पोरं जमा झाली. त्याचं रडणं कुणाला बघवेना.

त्याच्या खांद्यावर सूर्याचा हात विसावला.

'भाऊ बहोत दिन हुवे वो लोग एरिया छोडके गये. मुझे मालूम नही था तू इतना प्यार करता है उस लडकीसे. अपने यहां सिर्फ लडकी इस्तेमाल करके छोड देते है... तेरे बारे मे मैं भी यही समझ बैठा...' सूर्या भावूक होऊन चिनूशी बोलत होता.

'सूर्या कहा गये वो लोग... कुछ तो पता होगा ना यार' चंग्या गयावया करून सूर्याला विचारू लागला.

'नै ना भाया... आपन क्या किसका ख्याल रखते है क्या... अच्छी फेमिली थी... बेपारी लोग थे... रातोरात निकल गये... बस इतना पता है कि वो राजस्थान से थे.. भाऊको तो बताया होगा लडकीने.' सूर्या म्हणाला.

चिनू उठला अन् चालू लागला... शुन्यात..सारं सारं आठवत होतं त्याला.....

चंद्रमणी बुद्ध विहार मार्ग, लंब्या बैठ्या चाळीत म्युनिसिपालिटीची मोठी शाळा झालेली. दहावीपर्यंतची कोरी कचकचीत नवीन इमारत. सात मजली, अगदी भव्य. तशी पुढच्या सातव्या गल्लीत पालिकेची शाळा होती पण ती फक्त सातवीपर्यंतच. फेफ्टी, नितीन, काळ्या मोहन, अशोक ही सगळी मुलं त्याच शाळेतली.

चिन्या आणि अरुण भायखळ्याच्या ह्यूम हायस्कूलमधले. अरुणने नंतर शाळा सोडली. त्यानं फ्रीज आणि एअरकंडिशन मेकॅनिकचा कोर्स केलेला अन त्याला जॉब ही लागलेला नागपाड्याला थॉमसकडे.

चिनू ह्यूम हायस्कूलमध्ये शिकला पार दहावीपर्यंत. शाळा सुरु झालेली. चिन्या तेव्हा दहावीला असेल.

सकाळी सात ते एक आणि दुपारी दीड ते साडे पाच अशी पालिकेच्या शाळेची वेळ होती. चिनूची शाळा दुपारची.

सकाळी व्यायामशाळेत जात असताना सातव्या चोर गल्लीच्या अरुंद वळणावरच्या झोपडीकडून वळताना अचानक समोरून आलेल्या मुलींच्या झुंडीतील एकीला ह्याचा जोरदार धक्का बसला.

रांगड्या चिन्याचा धक्का. मुलगी कळवळली. तिच्या नाकावर ह्याचा खांदा आदळलेला. मुलगी नाक धरत 'अव्वा अव्वा' करत खाली बसली. त्या सहा-सात जणी असतील.

'सॉरी सॉरी' करत चिनू तिला सावरायला सरसावलेला, इतक्यात चौघींनी तिला धरलं.

‘दिखाई नही देता है क्या?' शाळेतल्या पांढऱ्याशुभ्र टापटीप युनिफॉर्ममधल्या एका मुलीनं चिन्याला हटकलं.

मुलीच्या नाकातून रक्त येत होतं. चिनूने पटकन बॅगेत हात घालून त्या मुलीसमोर पाण्याची बाटली धरली.

'रहने दो रहने दो... जान बुझकर धक्का देनेका बादमे सॉरी बोलनेका... मालूम है स्टाईल हमको' तीच त्या सगळ्या मुलींत उठून दिसणारी चिनूशी त्वेषानं भांडत होती. चिनू सगळं विसरून तिच्याकडे पहात बसला.

सुवर्ण गौर रंगाची, मासोळ्या डोळ्यांची. ती मुलगी त्या कुपोषित ग्रुपमध्ये खात्यापित्या घरातली वाटत होती. शुभ्र दंतपंक्ती, गुलाबी ओठ, गडद काळ्याभोर वळणदार भुवया, अगदी टापटीप इस्त्री केलेला ड्रेस, पायात व्हाईट चॉक केलेले कॅनव्हासचे पांढरे शूज, त्यावर व्यवस्थित वर खेचलेले गुढग्यापर्यंतचे पांढरे मोजे, नवंकोरं वाटणारं खाकी दप्तर. चोपून बांधलेल्या दोन वेण्यांपैकी एका वेणीवर ती चिन्याचा राग काढत त्याच्याशी भांडतेय. चिनू तिला न्याहाळण्यात गुंग झालाय. शुद्ध हरपलेय त्याची.

‘देख देख कैसा देख रहा है' म्हणत त्यातल्या एकीनं तेलुगूत शिवी हासडली आणि चिन्या शुद्धीवर आला.

'वो पिला गाली नै देनेका हा... कैसा दिखेगा, क्या हॉर्न बजाते चलू क्या पॉम पॉम संभालो इधर टर्न है और देखो कितनी कम जगह है. तुम लोगोंको समझता नही है क्या लाईन से आने को ऐसा सब एकसाथ आयेगा तो टक्कर लगेगा ही ना?' चिनू मुलींना समजावू लागला.

‘ये लो पानी पियो' त्याने मुलीच्या नाकातले गळणारे रक्त पाहून बॅगेतून टॉवेल आणि पाण्याची बाटली काढून मुलीसमोर धरली. तेवढ्यात त्या भांडणाऱ्या मुलीने चिनूच्या हाताला जोरदार हिसडा देवून स्वतःच्या दप्तरातली पाण्याची बाटली काढून मुलीच्या तोंडाशी लावली. मुलीनं स्वतःचा रुमाल नाकाशी धरलेला. ती पाणी प्यायली. रक्त थांबलेलं.

चिनू घाबरल्या स्थितीत उभा होता.

‘अब ठीक हो ना' त्याने भीत भीत विचारले.

'हा हा ठीक है ठीक है... जाव अभी इधरसे, बडा आया है ठीक है ना पुछनेवाला. ऐसे गुंडे लोगोंको तो पुलीसमे देना चाहिये... ठीक होना ठीक होना' वेडावत आणि हातवारे करत तीच ती सुंदरी म्हणाली.

‘ओय गुंडा दिख रहा हूं क्या. सून रहा हु तो बोले हि जा रही है. सॉरी बोला ना चार-पांच बार और क्या चाहिये? जान बुझकर थोडी ना धक्का मारा था? अगर ज्यादा लगा है तो चलो डॉक्टर के पास' आता चिनुची सटकलेली. 'और आयंदा झुंड में मत आना और आते समय हॉर्न बजाना समझी... पॉम पॉम' म्हणत चिन्याने जिमची बॅग उचलली. टॉवेल आणि पाण्याची बाटली बॅगेत भरली, बॅग खांद्याला लावत तो पुन्हा त्या धक्का लागलेल्या मुलीला म्हणाला ‘सॉरी अगेन... गलतीसे लग गया था' आणि तिथून तो पाचव्या गल्लीतल्या व्यायाम शाळेकडे वळला.

चिनूचा आज जिममध्ये मूड लागत नव्हता. आल्या आल्या तो दहा मिनिटे नुसता बसून राहिला.

‘काय रे काय झालं?' दाढी अशोक त्याचा बेंचचा पार्टनर त्याला विचारतोय. 'अरे ये भैसाटा काय झालं? तब्येत बरी नाही का?' दाढीने त्याला पुन्हा हलवत विचारलं.

‘नाय रे यार आज मूड नाय... तुम्ही करा, मी बघत बसतो. आला तर आला मूड' चिनूनं रिप्लाय दिला.

चिनूच्या डोळ्यासमोर तिचाच चेहरा पिंगा घालत होता. किती सुंदर होती ती. चिडल्यावर जर इतकी सुंदर दिसते तर हसत असताना किती सुंदर दिसत असेल! असं काहीबाही त्याच्या मनात यायला लागलं.

आजवरच्या त्याच्या जिन्दगानीत हे असलं कधी घडलं नव्हतं. चिनू इतका 

कधी कासावीस झाला नव्हता. मुलीसाठी तर नाहीच नाही. पहिली ते दहावीपर्यंत तो एकाच शाळेत शिकला. बालपण ते जवानी त्याची मित्र-मैत्रिणींच्यात पहिलीपासून ते दहावीपर्यंतच्या पायऱ्या चढत आली. मधल्या सुट्टीत खेळता खेळता एकमेकांना 'टाइम प्लीज', म्हणत बाजूबाजूला लघवीसाठी रांगा लावणारे हे सवंगडी यौवनात कधी शिरले ते कुणालाच कळले नाही. त्यातले बरेचसे शाळा सोडून गेले सुद्धा. ह्यांच्या कोवळ्या मनाला प्रेमाची पालवी अजून फुटलीच नव्हती आणि ना ह्यांच्यातल्या भ्रमराने कुणा फुलाला हुंगण्याचा प्रयत्न केला होता. सगळे जण अभ्यास आणि खेळात दंग. निदान चिनूच्या बाबतीत तरी हे सत्य होतं. आपला अभ्यास बरा नि आपली जिम बरी. बाकी दुनियादारी करायची ऐपत नव्हती.

अठरा विश्वे दारिद्र्य घरात. बाप पिणारा, मागे चार बहिणी, रोज रात्री बाप आईला मारायचा. रोजची भांडणं घरात. काय करणार मुलगी पटवून, पैसे तरी आहेत का खिशात तिला फिरवायला? खिसा फाटका. लहानपणापासून बोच्याला ठिगळ लावलेली शाळेची खाकी हाफ पँट, काखेत उसवलेलं शर्ट, जागोजागी शिवलेलं दप्तर आणि अनवाणी शाळा निभावून न्यायची सवय. दिवाळीला एक जोड मिळायचा तो पण सण संपल्यानंतरच्या झालेल्या बापाच्या पगारात अंगावर यायचा. छ्या.. नकोच ते लफडं, म्हणत चिन्याने हे सगळं टाळलं होतं.

गाडी, फ्लॅट, बहिणीचं लग्न, आयुष्यभर मार खात आलेल्या आईला बापापासून कायमची फारकत घेऊन सुखात ठेवायचं ही त्याची स्वप्नं होती.

✍️ सुधीर जाधव

💠 क्रमश. पुढे.... प्रकरण १७

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या