कामाठीपुरा प्रकरण1️⃣5️⃣

 


कामाठीपुरा प्रकरण1️⃣5️⃣ 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 5/8/2026 :

*शहाणा माणूस होता. त्याला प्रकरण गोड बोलून मिटवायचे होते. पंगा घेऊ शकत नव्हता तो.*

‘अगर ऐसी बात है तो लडकी हमारे घर आकर भी पढ सकती है, मुश्कील क्या है?' दादा ने तोडगा काढला.

‘नही दादा. हमारा समाज, हमारी संस्कृती इस बात की इजाजत नही देती. ये दोनो भाई है उसके... इनको कोई लडकी नही देगा. उसकी छोटी बहन उम्रभर कुवारी रह जाएगी. बात को समझीये.' चौहान गंभीर होत म्हणाले.

‘आप बात को समझीये...’ चिनू पटकन बोलला 'प्यार करते है हम एक दुसरे से... मै पढाउंगा, मै पालुंगा उसे.'

चिनू म्हणाला अन् पूर्ण सीन बदलला.

'अरे क्या प्यार करते है, प्यार करते हैं लावलंय... साल्या घरात खायचे वांदे आहेत. मी एकटा कमवतोय नि दहा जण खायला. भोसडीच्या ऐपत आहे काय तुझी... काय पोसणार आहेस त्या पोरीला? आरे पिव्वर तुपाचे खाणारे लोक आहेत हे. इथं साला बोटभर तेलाचे वांदे. म्हणे मै पालुंगा. अरे विकत घेतील तुला लावतील दुकान झाडायला. औकात बघ आपली' चिनूचा बाप घसरला.

'देखो चौहान साब आप बेफिकर रहो. आगे ऐसा नहीं होगा. मै समझाऊंगा इस गधे को आप जाव. अपनी बेटी संभालो. उसको भी समझावो कि ऐसे भिकारी के नाद मे ना लगे. कुछ हासील नही होंगा. जाव आप...' चिन्याच्या बापाने हात जोडले. 

चिनूच्या बापाच्या वक्तव्यावर लाला आणि दादा दोघेही हैराण झाले. चिनू सुन्न झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.

'बहोत मेहेरबानी आप सब की' म्हणत चौहान आणि त्याची दोन मुले उभी राहिली.

चौहानचा मुलगा चिनूकडे वळला, 'आयंदा गली में दिखा ना तो टांगे तोड दुंगा, गणेश विसर्जन के दिन छोड दिया तेरेको.' असलं काहीतरी तो चिनूच्या तोंडाशी पुटपुटला. झटक्यात चिनूने त्याची कॉलर पकडली.

तेवढ्यात दादा उठला. चिनूच्या हातून त्या मुलाला सोडवून चौहानच्या अंगावर ढकलत म्हणाला. 'अपने लौंडे को संभालो चौहान, हात पैर तोडने की बात कर रहा है. चैलेंज देगा तो ये जो खडा है ना वो तुम्हारी लडकी को तुम्हारे सामने, तुम्हारे घरसे अभी, इसी वक्त उठाके लेके जायेगा. तुम कुछ नही उखाड सकते. आजमाना चाहते हो तो बोलो.'

फाडकन चौहानने मुलाच्या थोबाडीत दिली. शिवी सुद्धा हासडली मारवाडी भाषेत.

'नही नही दादा इन बच्चे के बात पर ध्यान मत दो. नालायक, नासमझ है ये. मैं, मैं माफी चाहता हु दादा' म्हणत पुन्हा त्याने मुलाला फटकावलं. चौहान आणि त्याची मुलं निघून गेली.

लालाची वेळ झालेली. त्याच्या मागून अरुण आणि कफनी रामदास चालू लागले.

चिनूचा बाप निघाला.

सगळे जण आपापल्या बाकड्यावरून हा सीन बघत होते. भयाण शांतता पसरली होती.

चिनू हतबल अवस्थेत उभा होता. दादाने त्याला हाताने खेचत जवळ बसवलं. इतका वेळ राग, अपमान गिळून गप्प बसलेला चिनू धाय मोकलून रडू लागला.

मागे जे काही घडलेलं ते सर्व काही त्याच्या अश्रू ओघळणाऱ्या डोळ्यात तरळून गेलं.

 

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या' म्हणत ट्रक मध्ये मूर्ती चढवली की चिनू आणि कंपनी सुताराच्या वखारीत पटापटा जमा व्हायची. खटाखटा बाटल्या फुटायच्या, सटासटा ग्लास भरले जायचे नि घटाघटा घशात चोंदले जायचे. 

कपाळाला केसरी टिळा. डोक्याला भगवी पट्टी पट्टीवर 'कामाठीपुरा सातवी गल्ली गणेशोत्सव मंडळ' लिहिलेलं.

सगळ्यांचं थोबाड गुलालाने माखलेलं. सगळे कार्यकर्ते पोटात यथेच्छ पेट्रोल भरून झाल्यावर नाचायला, रमदळायला तयार.

जो तो ट्रकमध्ये आपली छावी कुठे बसली आहे ते बघायचा. दोन ट्रक असायचे. एक मूर्तीसाठी आणि दुसरा बायका-मुलांसाठी.

गणपती उत्सव साजरा करणाऱ्या कामाठीपुऱ्यात एकूण चौदा गल्ल्या. प्रत्येक गल्लीचे तीन भाग. प्रत्येक गल्लीत एक सार्वजनिक गणपती. एका गल्लीचे दोन ट्रक. म्हणजे चौऱ्याऐंशी ट्रक. एवढे ट्रक एका पाठोपाठ एक निघायचे.

प्रत्येक गल्लीत एक भाई. जो तो आपल्या गल्लीचा राजा.

कामाठीपुऱ्याचा 'एक' असा कुणीच भाई नव्हता. प्रत्येकाचं आपलं स्वतःचं राज्य होतं. पण एकमेकांशी मैत्री घट्ट कोण कुणाच्यात ढवळाढवळ करीत नसे. एकमेकांशी दुष्मनी तर नव्हतीच. उलट आगन्तुकांच्या दंगलीत, राड्यात एकमेकांना मदत करायला प्रत्येक जण हजर.

चिनू, चंग्या, अरुण, फेफ्टी, काळ्या मोहन, अशोक, बाब्या ही लांबड्या चाळीतली पोरं, ही खरंतर बौद्ध समाजाची जयभीम पोरं, ही नुसतीच लांबड्या चाळीची नव्हती तर अख्ख्या कामाठीपुऱ्याची होती. चिन्यासकट सगळीच दणकट, उंच, धिप्पाड अगदी तारुण्याने मुसमुसलेली. व्यायामशाळेत कसलेलं शरीर, अंगात असलेली रग, कुणालाही भिडायची तयारी, रांगडी जबान, मदतीला धावून येण्याची नियत असलेले हे सगळे जण संपूर्ण कामाठीपुयाच्या गळ्यातले तावीज होते.

कामाठीपुऱ्यात जात, पात, धर्म, असला कुठलाही भेदभाव नव्हता. ह्या सगळ्यांचा बिनधास्त कुणाच्याही घरी कधीही थेट किचनमध्ये राबता असायचा. इथे ‘बाप’ नावाच्या प्राण्याला कुणीच घाबरत नसे. 'हा येतोय बोल्लो ना’ म्हणून बापाची बोळवण करत. मग बापही स्वतःची शोभा नको म्हणून सुमडीत कल्टी घेत असे. पण ‘आई’ ला ज्याम रिस्पेक्ट माँ के लिये साला कुछ भी करेगा. आई बोलवायला आली की प्रत्येक जण चुपचाप सटकायचा.

लांबड्या चाळीला लागून सातवी क्रॉस गल्ली. चंद्रमणी बुद्ध विहार मार्गात असलेल्या शाळेत जायचा हा चांगला शॉर्टकट. पोलीस म्हणा किंवा अपोझिट साईटचे आले तर ह्या गल्लीला लागून असलेल्या चोर गल्ल्यातून गायब होण्याचा अल्टीमेट मार्ग.

लांबड्या चाळीचं अन सातव्या गल्लीचं जाम सख्य. ह्याला कारण शिरीदादा आणि हणम्यादादाची दोस्ती.

सातव्या गल्लीच्या गणपती उत्सवासाठी लांबड्या चाळीतली पोरंच वर्गणी गोळा करायला फिरत असत. रांडगल्ल्या नंबरवाले बंगले, तवायफखाना, दारूचे अड्डे, चरसचे अड्डे, मटका, पताडा ह्या सगळ्या जागेत चिनू आणि गँग उभी राहिली की पटापट पावत्या फाडल्या जायच्या.

ह्यांना अॅक्च्युली फंड रेझिंगसाठी युज केलं जायचं. पण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतोय कोण?

तर.. 

चौऱ्याऐंशी ट्रक एका मागोमाग एक धीम्या चालीने निघायचे. ट्रकला त्या त्या गल्लीचे बॅनर लटकलेले. ट्रकमध्ये मोक्याच्या जागी हत्यारं, दारू, सिगारेट, मावा, चरस, गांज्या ह्यांचा खच्चून स्टॉक भरलेला.

प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या कामाठीपुरकराला एक तरी घोट घ्यावा लागे. तो मान असायचा. रीत होती ती. पूर्वीच्या भाई लोकांनी जपलेली, तिचं कसोशीने पालन केलं जायचं. 

रस्त्याच्या दुतर्फा असलेली बघ्यांची गर्दी म्हणजे शायनिंग मारण्याची संधीच जणू. जो तो स्वतः हीरो असल्याच्या आविर्भावात.

प्रत्येक गल्लीच्या गाडीभोवती जाड दोरखंड बांधलेला. कुणी परका घुसू नये म्हणून गाडीच्या सुरुवातीला आणि एन्डला उभे असलेले गल्लीचे शिलेदार. सगळ्यांची आपापल्या गल्लीतल्या बायका मुलींवर बारीक नजर. काय बिशाद कुणी बदतमिजी करायची? मेलाच म्हणून समजा.

गुलालाने रापलेल्या चेहऱ्यातून पण एकमेकांची ओळख पटे.

‘बावा... मेरी जान... अण्णा... भाय... किधर था यार... तंडेल, पटेल, कहा था भाया' म्हणत एकमेकांशी आलिंगने व्हायची. मग गार बियरची बाटली तोंडाला लागल्यावर नागीण डान्सला सुरुवात होई.

जो तो नाचायच्याच मूडमध्ये... जो तो नाचायलाच आलेला... कारण प्रत्येक गल्लीतल्या गणपतीबाप्पाच्या ट्रकच्या सोबत असणाऱ्या कच्छी बाज्या आणि सनईच्या निनादत्या बेधुंद करणाऱ्या झिंग आणणाऱ्या तालावर नाचला नाही तो पानी कम यार.

यार-दोस्ताला नाचायचा हट्ट होई अन् मग तो झिम्माड तालावर रंगून जाई. 

लॅमिंग्टन रोडच्या चाळीतल्या पहिल्या माळ्यावरचा जाड्या दरवर्षीप्रमाणे पोट हलवून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतोय. पोलिसांची व्हॅन बाजूने चाललीय.

साहेब प्रत्येकावर नजर ठेवून आहेत. शिट्ट्या फुंकताना त्यांची हवा निघतेय. ‘बढते रहो... बढते रहो' चा नारा शाळेतली आरएसपीची मुलं करताहेत. ट्रॅफिक सध्यातरी कंट्रोलमध्ये आहे.

झिंगलेल्या, न झिंगलेल्या प्रत्येकाच्या डोक्यात मात्र उन्माद, माज साचलाय. बायका-मुली नाचताहेत. गाण्यांचा कानठळ्या बसवणारा आवाज. ट्रक मधले बाप्पा शांतपणे स्मितहास्य करीत नेहमीप्रमाणे एका हाताने सगळ्यांना आशीर्वाद देताहेत. जो तो आपल्यात मग्न.

सातव्या गल्लीचा गणपती निघाला.

कार्यभाग उरकलेलं.

पुन्हा कधी प्यायला मिळणार नाही या न्यायाने किंवा श्रावण संपलेले श्रावणबाळ, अर्ध्या तासातच फुल्टू झालेले.

दोघांना ट्रकमध्ये झोपवून चिनू डुलत्या अवस्थेत अरुणच्या हाताला खेचत कॉर्नरने निघाला.

कामाठीपुरा तिसऱ्या गल्लीचा ट्रक शोधत होता चिनू. राधेला बघायला कासावीस झालेला तो.

अरुणने हात झटकला. सिगारेट शिलगावली. काडी फेकत चिनूकडे पाहिलं. 'अबे तेरेको भोत हो गयेली है' अरुण म्हणाला.

चिनू हसला. त्याच्या हास्यात आर्जव होतं. दोघांत मोठा पॉज. अरुणला चिन्याचे इरादे समजलेले.

'फक्त लांबून यार... थोडीशीच झलक.. तुझी शपथ बस... कायंच लोच्या करणार नाय’ शपथेसाठी चिनूने अरुणचा गळा धरला.

'चिन्या यार फुल्टू आहेस तू... नको, लोच्या होईल. शामको एंट्री मारेंगे ना' अरुणने समजावले.

‘आरे श्याम के माको राम... येतो की जाऊ मी एकटा... येईच यारी ना...' म्हणत चिनू निघाला पण त्याला माहीत होतं आऱ्या येणार.

'रुक बे वो मजनू की औलाद आ रहा ह मै' अरुणने त्याला धावत गाठलं.

सातवी, सहावी, पाचवी, चौथी गल्लीचे ट्रक पार करताना मिळणारा मान घेत घेत दोघे जण तिसऱ्या गल्लीच्या ट्रककडे पोचले.

दोन ट्रक होते. ट्रकला बांधलेल्या दोरखंडाच्या हद्दीत कच्छी बाज्याच्या तालावर तिसऱ्या गल्लीतल्या बायका-मुली नाचताहेत. थोडंसं अंतर ठेवून मुलं आणि बाप्यांचा ग्रुप धिंगाणा घालतोय. त्यात चिनू राधेला शोधतोय. त्याला जाणवलं की कुणीतरी त्याच्याकडे बघतंय. झटक्यात त्याची नजर तिथे वळली. नाचणाऱ्यातनं दोन टपोरे डोळे चिनूच्या डोळ्यांशी स्तब्ध झाले. राधा नाचायची थांबली चिनूला बघून. दोघांची नजरभेट झाली.

भोली सूरत दिलके खोटे नाम बडे और दर्शन छोटे च्या तालावर सनई आणि कच्छीबाजेवाले धडाक्यात वाजवत होते. गुलाल उद्दामपणे उधळत होता. राधा त्या टोकाला नि चिनू ह्या टोकाला दोघांच्या नजरा भिडल्या. नाचताना बिथरलेली, थांबलेली राधा चिनूला पाहिल्याबरोबर पुन्हा वर्तुळात घुसली अन् गिरक्या घेत तुफान नाचत सुटली.

चिनू पुढे जाणार इतक्यात अरुणने त्याला मागे खेचले. अऱ्याने त्याचा हात घट्ट धरलेला. वर्तुळात नाचताना राधा चिनूला आवताण देत होती.

आणि अरुण चिनूला आत घुसू देत नव्हता.

चिनूनं अरुणकडं केविलवाणे पाहिलं. अरुणने चिनूचं मनगट घट्ट धरलेलं. घट्ट अगदी घट्ट. चिनू ते सोडवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होता. चिनू येत नाहीसा बघून राधा त्याच्या जवळ येऊन एक गिरकी घेऊन गेली. नाच रंगात आलेला. चिनूच्या अंगात वारं संचारलेलं. एका हिसड्यासरशी त्याचं मनगट अरुणच्या हातून निसटलं.

दोरखंडाला लांघत चिनू रिंगणात शिरला, थेट राधेला भिडला. रिंगणात राधा अन् चिचिन्या एकमेकांना भिडले. कच्छी बाज्याने वेगळाच नूर घेतलेला. ढोलीची डांग ढोलावर रापच्याक दणाणत होती.

गर्दी सरली. सारे नाचणारे मागे झाले.

'भोली सूरत दिलके खोटे' च्या तालावर राधा - चिनू एकमेकांना भिडले.

आता त्या रिंगणात फक्त राधा आणि चिनू दोघेच नाचत होते. कच्छी बाज्या आणि सनईच्या सुरावटींनी दोघांना पुरतं वेडं करून ठेवलेलं.

राधा आणि चिनू बेफाम नाचत होते. बेफाम... अगदी जगाला विसरून नाचता नाचता राधाने चिनूचा हात हातात धरला आणि जवळ खेचुन बिलगली त्याला घट्ट. 

थोड्याच वेळात राधेला गचकन मागे खेचल्याचं चिनूला जाणवलं. ढोली बाजा वाजायचा थांबलेला.

राधेला दोघे जण फरपटत, मारत नेत असलेले चिनूला दिसले. तो तिकडे धावणार इतक्यात त्याच्या कानशिलात काहीतरी जड बसल्यासारखं झालं. चिनू सावरत सावरत खाली पडला, उठला आणि लडबडत उभा राहिला. एक हात चिनूच्या दिशेने आला तो अरुणने अलगद वरच्या वर झेलून त्याला प्रत्युत्तर दिले.

ढोल-ताश्यांचा आवाज आणि इकडे तिसऱ्या गल्लीतल्या गणपतीसमोर वेगळाच सीन.

अरुणने चिनूला सावरलं. दोघे ताठ उभे राहिले. चिनूने पाहिलं त्याच्या छाताडाजवळ काहीतरी टोकदार रुपत होतं.

चिनू हसला. त्याने समोरच्याकडे पाहिलं 'घुसा... देख क्या रहेला है' म्हणत त्याने शर्टाची बटणं खोलली. तेवढ्यात त्याला मागे सारलं गेलं.

✍️सुधीर जाधव

💠 क्रमश पुढे..... प्रकरण १६


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या