कामाठीपुरा प्रकरण 1️⃣4️⃣

 


कामाठीपुरा प्रकरण 1️⃣4️⃣

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 5/8/2026 :

*साऱ्या गोविंदांनी झटक्यात साखळी केली. हातात गदा घेऊन ठसक्यात खालुबाज्याच्या तालावर उजवा पाय पुढे टाकत आपल्या मांडीचे दमदार स्नायू फुलवीत नाचायला सुरुवात केली*

'गोयंदा आला रे आला तो पाचवे गल्लीवाला... अरे एक दोन तीन चार चिन्या भाऊची पोरं हुश्यार... ए गोयंदा आला रे आला तो पाचवे गल्लीवाला' 

गोयंदा पुढे निघाला. चिनू हालेनासा बघून पक्याने त्याच्या बखोटीला ओढून स्वतः बरोबर चालायला लावलं

तो आणि राधा एकमेकांना दिसेनासे होईपर्यंत बघत होते.

दोन टाकीतल्या मोहल्ल्याची हंडी फोडताना 'हाय अल्ला' चे सुस्कारे. 

गिरगाव, भुलेश्वरच्या हंड्या फोडताना छावी आणि भाभींच्या नजरेतलं मार्दव मनात साठवून सकाळी नऊ वाजता सुरू झालेला गोयंदा संध्याकाळी सात वाजता संपायचा.

गोयंदा संपायचा... सालपटलेले, रक्ताळलेले खांदे घेऊन जो तो आपापल्या घरी जाऊन आई-बापाला तो जिवंत असल्याचा पुरावा द्यायचा.

आंघोळ वगैरे करून, टकाटक तयार होऊन सगळे जण सातव्या गल्लीतल्या वखारीत जमायचे.

 वखार....

वीस बाय दहाच्या दोन लाकडाच्या वखारी होत्या सातव्या गल्लीच्या चोर वाटेवर. एकात त्यांचा माल भरलेला असायचा दुसऱ्यात सुतार लोकं काम करायचे.

संध्याकाळ झाली कि कामगार माल असलेल्या वखारीत शिफ्ट व्हायचे. काम करणारी मोकळी वखार ह्या पोरांना मिळायची.

का मिळायची ह्याला कारण होतं. काही लुक्के ह्यांची किमती लाकडं चोरीत. मग काय गब्बर का इलाज खुद गब्बर ह्या तत्वावर वखार मालकाने एक जागा ह्या पोरांना देऊन टाकलेली.

त्यात त्याचा प्रचंड फायदा झालेला. सागवानी लाकूड वगैरे चोरी होण्यापासून वाचलं अन सायंकाळची वखार ह्या सगळ्यांची हक्काची सोबतीण झाली.

तर अशी हि वखार आंदण होती. अगदी हणम्या दादाच्या काळा पासून. आता तर चिनू कंपनी बसु लागल्यामुळे वखारीकडे पहाण्याची कुणाची टाप नव्हती.

 

वखारीत सगळी सोय केलेली असायची. व्हिस्की, रम, बियर, देशी, हातभट्टी, ताडी, माडी, सोडा, कोल्ड ड्रिंक्स, पाणी, चखणा, सिगरेट, विडी सगळ्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मांडून ठेवलेल्या. सगळे आले की नाही याची खात्री व्हायची. जो आला नाही त्याला तातडीनं बोलावणं धाडलं जायचं.

पटापटा ग्लासावर ग्लास आदळून चीयर्सचा गडगडाट व्हायचा. पहिले दोन शॉट भसाभसा व्हायचे. सालपटलेले, ठसठसणारे खांदे बधीर व्हायला तीन पेग काफी होते.

मग खऱ्या मैफिलीला सुरुवात होई.

हालेपर्यंत दारू झाल्यावर प्रत्येकाला प्रेमाच्या उकळ्या फुटू लागत. एकमेकांवर शिव्यांचा, आलिंगनाचा, चुंबनाचा वर्षाव होई. कुणीतरी अगदी भावनाविवश होऊन रडु लागे, कारण नसताना. मग मध्येच कुणाचा तरी बारका भाऊ येई, घरी लवकर बोलावलंय म्हणून सांगायला किंवा कुणाची तरी आई लांबून कोपऱ्यातून हाक मारी.

हाकेसरशी सगळे ठस्सी होत. त्यातलाच एक जण शुद्धीवर असल्याचा आव आणीत लांब कोपऱ्यावर काळोखात उभ्या असलेल्या म्हातारीला मोठ्याने तिचा लेक इथे नाही म्हणून सांगण्याचा प्रयत्न करी

'काऽऽकू... आरुण नाइय्यय हितं... तो तर व्यायाम शाळेत हाये काऽऽऽकू.. त्याला पाठवतो हा पाठवतो... तू जा घरी.'

म्हातारी पण 'व्हय व्हय मुडद्या कळालं त्यालाव पाठव अन तू बी जा घरी. नायतर पाठवते तुझ्या बापसाला पट्टा घेऊन' असला खतरनाक राग देऊन म्हातारी निघून जायची. बोलणारा जीभ चावून ठस्सी व्हायचा.. म्हातारी गेल्यावर सगळे हसत सुटत. 

पावणे बारा होत आलेत. ग्लास-बाटल्या रिकाम्या झाल्यात. मैफिलीची सांगता होतेय. हळूहळू एकेक जण कल्टी मारतोय.

सिनियर्सचे एकमेकांना इशारे झाले.

किशोर गायवाला टॅक्सी आणायला पळाला. दाढी अशोक, हिरामण दादा, दिलीप मानकर, बाबू, चिंट्या हालत डुलत उभे राह्यले.

ते जायला निघाले तेवढ्यात चिनूपण त्यांच्यासोबत बाहेर आला. हिरामणची त्याच्यावर नजर गेली

‘ये चिन्या, भेंचो तू कुठं येतोय?' हिरामणने चिनूला थांबवत म्हटलं. ‘आम्ही खालच्या वाडीत चाललोय... तू निघ घरी' धक्का देत हिरामणदादा पुन्हा त्याला म्हणाला.

चिन्याला ‘खालची वाडी’ समजेना. फेफ्टीने नाकपुडीवर बोट ठेवून खालची वाडी म्हणजे काय ते चिनूला समजवलं. इतक्यात अरुण डुलत डुलत चिनूजवळ आला. त्याला स्वत:कडे ओढत हिरामणदादा आणि बाकीच्यांना म्हणाला 'ये तुम्ही जा बे रांडा हेपलायला... चल चिन्या, आपुन बच्चू भायच्या वाडीत जाऊया... चल सिक-पराठा खायेंगे.'

ग्लास, बाटल्या, पुडकी तिथंच ठेवून सगळी पांगापांग झाली. 

वखार... मघाशी गजबजलेली वखार क्षणात शांत झोपली.सायंकाळची नीरव शांतता. एरवी चाळीत उजाडल्यापासून ते झोपेपर्यंत धमालच चालू असे. पण आज काहीसं विचित्र वाटतंय.

हणम्यादाच्या अंगणात माणसं जमलीत.

हणम्यादा... हनुमंत कांबळे. चाळीतला दमदार माणूस. पिळदार शरीराचा, महाराष्ट्र आणि सेन्ट्रल रेल्वेचा नावाजलेला कबड्डीपट्टू दादांचा पूर्ण एरियात वचक. चाळीतलेच काय, कामाठीपुऱ्यातले पण टरकायचे दादाला. दादा नंगी हातात घेऊन उभा असताना पंधरा-वीस जण मागच्या मागे पळताना लहानपणी चिनूने पाहिले होते.

मुर्तीमंत वाघाच्या काळजाचं उदाहरण. चाळीचा आधार. त्यांच्या नजरेला नजर देण्याची कुणाची टाप नाही.

दादा बाकड्यावर बसून शांतपणे कॅप्स्टन सिगारेटचे झरके घेताहेत. अंगणात मांडलेल्या स्टुलांवर आणखीन पाच जण बसले आहेत. त्यात 'खान साब' म्हणजे लाला ह्या उंचपुऱ्या, लालबुंद, अजस्र पठाणाचाही समावेश आहे.

खानसाब म्हणजे लाला हे अमीरजादाचे वडील.

हणम्या दादाची आणि लालाची खास दोस्ती. अगदी जिगरी दोस्त दोघे. खानसाब पूर्वी खूप दारू प्यायचे. सकाळी लालबुंद लाला कडक इस्त्रीच्या भडक कपड्यात चाळीतून मान खाली घालून जायचा.

एक वैशिष्ट्य होतं ह्या लोकांचं, एरियातले एवढे मोठे नामचीन भाई आलमजेब आणि आमीरजादा चाळीतून त्यांच्या गँगसोबत जायचे ते पण अगदी मान खाली घालून. चाळीतल्या कुठल्याच बायका-मुलींवर ह्याची वाकडी नजर नसे. एखाद्याने सलाम केला तर हसून स्वीकारत. कुणी मदत मागितली तर हे सदैव तत्पर. त्यांच्या क्षेत्रातले हे किंग, पण सामान्य माणसांना त्यांची कधीच दहशत वाटली नाही. त्यांनी कधीच गरिबावर अन्याय अत्याचार केला नाही.

त्यांचीच काय कुठल्याही लोकल दादाची सुद्धा कधी मान वर उठायची नाही. स्त्रियांना खूप रिस्पेक्ट दिला जायचा म्हणूनच तर कामाठीपुरासारख्या कुप्रसिद्ध इलाख्यात बायका-मुली खूप सुरक्षित आहेत असं कामाठीपुरा अनुभवलेला प्रत्येक जण म्हणायचा.

..तर लाला कडक इस्त्रीच्या लालभडक शर्टात आणि पांढऱ्याशुभ्र विजारीत पठाणी जोडे करकर वाजवीत मनगटाला रंगीन रेशमी रुमाल गुंडाळून चाळीतनं वेगाने जायचा. जाताना फक्त तो हणम्यादादाच्या घराकडे ओझरता बघायचा. दादा घरी असेल तर थोडी हसीमजाक व्हायची.

मग तो तिथून पुढे निघायचा. आणि मग भर दुपारच्या उन्हात पिऊन तर्राट आणि लालेलाल झालेला लाला चाळीतून डुलत डुलत क्रॉस व्हायचा. मोहल्ल्यात गेल्यावर लालची काय सटकायची माहीत नाही, कुठून तरी त्याच्या हातात तळपती, धारदार तलवार यायची. दारू आणि उन्हाने लाल झालेला लाला ‘ओय खोचे... तुम्हारी माका ओय..' ओरडत तोंडाने पचाक पचाक आवाज काढीत पख्तूनी भाषेतून शिव्या देत कुणाला तरी मारण्यासाठी शोधत एखाद्या मदमस्त हत्तीप्रमाणे मोहल्ल्यात धुडगुस घालायचा.

मोहल्ल्यातलं ट्रॅफिक ज्याम व्हायचं.

हिम्मत काय कुणाची त्याला अडवायची.

त्याची दोन अगडबंब देहाची नामचीन गुंड असलेली मुलं पण दडून बसायची.

सगळी पळापळ. दहशत इतकी की कुणी पोलिसाला फोन करण्यास पण धजत नव्हते. सगळी दुकानं, घरंदारं बंद व्हायची. मग कुणीतरी चाळीत दादाच्या घराकडे धाव घेई. दुपारची झोपमोड झालेला दादा कपडे घालून पटकन निघे. मोहल्ल्यात तळपती तलवार हातात घेऊन दारूच्या नशेत पिसाटलेला लाला. त्याच्या अवतीभवती सामसूम.

खूप अंतर ठेवून लपून माणसं त्याला बघताहेत आणि लांबून हणम्या दादा हसत त्याच्या दिशेने येतोय. लाला, दादाला समोर पाहतो.

'ये हम्म्या तू बीचमे नी आनेका बोल देताय नै तो खोची तुम्हारा तुकडा तुकडा कर देगा हम' पच्चाक पच्चाक आवाज काढीत लाला दादासमोर तळपती तलवार धरतो.

हणम्यादादा लालाकडे हसत बघत हळूहळू शर्टाची बटणं काढतात. आपली कमावलेली पिळदार छाती पुढे करत दादा हसत लालाला म्हणतात. ‘चला तलवार लाला तू भी क्या याद करेगा.'

लालाच्या हातातून तलवार गळून पडते. आग ओकणाऱ्या त्याच्या डोळ्यातून अश्रू टपकतात. तो गहिवरून दादाला मिठी मारतो. हमसून हमसून रडू लागतो लाला.

दोघे वाघ एकमेकांना घट्ट बिलगलेले असतात. एरियात जल्लोष होतो. लालाला घरी पोचवून दादा घरी येतात तेव्हा काकूच्या चेहऱ्यावरची काळजी निवळलेली असते.

लाला नेहमी संध्याकाळी चाळीत येऊन दादाबरोबर गप्पा मारीत बसत असे. सात-साडे सातला तो एका हुजऱ्यासोबत सुखलाजी स्ट्रीटला मुजरा बघायला जाई. हुजऱ्याच्या हातात पैशाची लेदरची बॅग असायची. एम्ब्रॉयडरीचा पठाणी ड्रेस, डोक्यावर लाल फरची टोपी, डोळ्यात सुरमा, कुरत्याच्या खिश्यात अगदी कॉन्ट्रास्ट कलरचा मखमली रुमाल. हातात चांदीची मूठ असलेली शिशाची काठी, तीन फुटाच्या या काठीत धारदार गुप्ती लपलेली असायची. पायात पठाणी लखलखणाऱ्या रत्नजडीत सँडल, कपड्यावर शिम्पडलेलं उग्र अत्तर. अशा पारंपरिक वेशात लाला ऐटीत झपाझप चालत मुजरा गल्लीच्या दिशेने निघे.

लालाच्या मागून त्याचे आणखी दोन बॉडीगार्ड निघत. चिनू आणि अरुण हे दोघे लालाला कोठेवालीकडे सोडून परत येत आणि पुन्हा रात्री आणायला जात. कधी चिनू, कधी आऱ्या, कधी फेफ्टी, कधी कफनी. कोणी ना कोणी येता जाताना लालाच्या सोबतीला असत. चाळीतल्या पोरांवर लालाचा विशेष जीव. ह्या मुलांच्या हिम्मतीला ओळखून होता लाला. 

मुजऱ्यात चिंब न्हालेला लाला लाल लाल गाली हसत, पच्याक पच्याक करत मोहल्ल्याच्या दिशेने निघायचा. डोळ्यात सुरमा, तोंडात लालभडक रंगलेलं पान आणि हातातला मोगरा हुंगत आजच्या बैठकीत ऐकलेली एखादी ठुमरी गुणगुणत रस्त्याने चालताना एखाद्या मदमस्त हत्तीसारखा दिसायचा.

ही पोरं फक्त त्याच्या मागे असायची, त्याच्यावर नजर ठेवायला. लाला कुठे थांबला तर त्याला 'खान साब घर चलो अम्मीजान राह देख रही है' म्हणत चलायला लावायची. समोरचा पण मग लालाला निरोप देई. ह्यांना खुद्द हणम्या दादानेच नेमलेलं.

तर... संध्याकाळचे सात वाजलेत. दादा आणि खानसाब तर बसलेत. पण चिनूचा बाप पण तिथे हजर आहे. म्हणजे एक दिवस आधीच वर्दी गेलेली. नाहीतर चिनूचा बाप, दादा किंवा लाला असे संध्याकाळचे शुद्धीत बसलेले दिसले नसते.

आणखी अनोळखी तिघंजण त्यांच्या सोबत बसलेत.

एक भरदार मिश्यांचा चेहऱ्यावर वेगळंच तेज असलेला धिप्पाड माणूस, त्याच्या सोबत वेलड्रेस्ड दोन तरुण बसलेत. तिघांच्याही हातातील सोनेरी घड्याळ, सोन्याच्या अंगठ्या, शर्ट आणि कुर्त्यातून डोकावणाऱ्या गळ्यातल्या साखळ्या त्यांच्या श्रीमंतीची साक्ष देत होत्या. 

सगळे गोलाकार बसलेत.

चिनू लालाच्या बाजूला मान खाली घालून, हाताची घडी घालून उभा आहे. सगळेच जमा झालेत अन् लोकं कोपऱ्यात गप्प बसून काय होणार आहे ते पाहताहेत.

खाडकन् काही तरी वाजल्याचा आवाज येतो. बेसावध चिनू जागच्या जागी हेलपाटतो. 'आया-बहिणी नाहीत कारे तुला?' म्हणत चिनूच्या बापाने त्याच्या कानाखाली वाजवलेली असते.

‘खोची मारो मत बच्चेको’ म्हणत लाला चिनूला सावरतो. 'ताली एक हाथ से नही बजता ओय' लाला समोर बसलेल्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालून त्वेषाने गरजतो.

कुंवरजीत चौहान आपल्या दोन तरुण मुलांसोबत त्याच्या मुलीचा आणि चिनूचा गणपती विसर्जनाच्या वेळेला झालेल्या मॅटरची तक्रार घेऊन आलेत.

'हमने कब कहा ताली एक हाथ से बजती है खानसाब... हम तो बस ये कहने आये है के आप अपने बच्चे को संभालो, हम अपनी बच्ची को संभालते है.  

अब ये यही पर अनजाने मे जो हुवा वो उसका बचपना था. अब ये यही पर रुकवा दीजिए. एक बच्ची का बाप आपसे बिनती कर रहा है. आपकी भी तो बेटीयां है दादा.' 

राधाचा बाप शांतपणे हात जोडून लाला आणि दादाशी बोलत होता.

त्याच्या प्रत्येक वाक्यात खानदानी अदब आणि रुबाब होता.

‘देखिये बच्ची पढ़ रही है. मै पढाना चाहता हुं मेरी बेटी को. हममे औरते ज्यादा पढलिखती नही... आपको तो पता होगा... हमें पढाना है बच्ची को. मै आपका सहयोग चाहता हु खानसाब, दादा' पुन्हा हात जोडत राधेच्या बापाने आपली कैफियत मांडली.

✒️ सुहास जाधव

💠 क्रमश. पुढे.... प्रकरण १५

 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या