✍️ दिल्लीचे आंदोलन क्रांतीची नांदी ठरु शकते?
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 22/7/2026 :
आज देशात अराजकतेचे माहौल दिसत आहे. तरुणांना देशाचे भविष्य मानले जाते. त्याच तरुणांच्या आंदोलनाला दिल्लीच्या सरकारने ज्याप्रमाणे हाताळले ते निषेधार्थ आहे. शांतपणे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला. तरुणाई नेमकी का चिताळली याकडे सरकारने लक्ष दिले नाही. लोकशाहीत घटनेने प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. अन्याया विरुध्द आवाज उठविण्याचा हक्क दिला आहे. न्याय मिळत नसेल तर उपोषण, आंदोलन करुन न्याय पदरात पाडू शकतो. त्याच अनुषंगाने समाजसेवक सोनम वागचुंग हे NEET पेपर फुटी नंतर उपोषणाला बसले होते. तब्बल 20 दिवस झाले तरी सरकारचा एकही प्रतिनिधी उपोषण स्थळी फिरकले नाही. सोनम वागचुंग यांनी दोन दिवसात उपोषण सोडले नाही तर त्यांचा मृत्यू होऊ शकतो असा अंतिम इशारा डॉक्टरांनी दिला होता. त्यामुळे सरकारने जबरदस्ती सोनम यांना उचलून रुग्णालयात नेले. त्यामुळे आंदोलनातील तरुणाई भडकली.
सरकारने अशाप्रकारे जोर जबरदस्ती करण्यापेक्षा उपोषणकर्त्यांला भेटून त्यांची मनधरणी करुन चौकशीचे आश्वासन देऊन गोडीने , प्रेमाने उपोषण सोडवता आले असते. पण, आपल्या भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालण्यासाठी हुकुमशाही सरकारने उपोषणकर्त्याला उचलल्यामुळे तरुण भडकले. आणि त्यांनी न्याय मागण्यासाठी संसदेच्या दिशेने कुच केले. अशावेळी त्यांना अडवून एखादा मंत्री त्यांना सामोरे गेला असता तर लाठीचार्ज करण्याची गरजच पडली नसती. पण सरकारने ते विद्यार्थी नसून अतिरेकी आहेत आणि ते संसदेवर चालून येत आहेत या उद्देशाने पोलिसांसह भाड्याने खाजगी माणसे आणून आंदोलनकर्त्या तरुणांना अक्षरशः झोडपून काढले, त्यांची डोकी फोडली, शेकडो तरुण, तरुणी रक्तबंबाळ झाले. आम्हाला अजून मारा असे तरुण बोलताना आणि पोलिस मारताना व्हिडीओ व्हायरल झाले. तरुणींनाही बेदम मारण्यात आले. सर्व व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसिध्द झाल्याने याची भिषण गंभीरता देशातील तरुणांसह जनतेच्या लक्षात आली. त्यामुळे आता देशातील तरुण भडकला असून त्यांनी दिल्लीकडे कूच केले, तर देशात पुन्हा क्रांती घडू शकते. आणि ही क्रांती रक्तरंजीत असण्याची चिन्हे दिसत आहेत.
✍️महेंद्र कुंभारे,
संपादक तथा कामगार नेते, भिवंडी.
मो नं. 8888182324.

0 टिप्पण्या