अवघड आहे सारं .....

 


अवघड आहे सारं ..... 

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 23/7/2026 :

सर्वोच्च संस्था वेळ नाही म्हणते तेव्हा खरंच अंधारून येते.सत्तेच्या व प्रशासकीय व्यवस्थेच्या कामकाज विकेंद्रीकरणात मा पंतप्रधान,मा मुख्यमंत्री,मा न्यायालय,मा सचिवालय , सुपरक्लासवन मुख्य सचिव यांचा दर्जा,पद,प्रतिष्ठा,अधिकार सुप्रिम आहे.घटनात्मक चौकटीत ही यंत्रणा सामान्यांसाठी अंतिम असते.

   सर्व कामे नियमानुसार झाली तर कोणीही वरच्या यंत्रणेचे दार ठोठावणार नाही.पण वरिष्ठ यंत्रणेसारखीच अधिकार संपन्न असलेली जिल्हा पातळीवरील,तालुकापातळीवरील,गाव पातळीवरील यंत्रणा जेव्हा अधिकार,पदाचा गैरवापर करते तेव्हा साहजिकच पिडीत वरिष्ठांकडे जात असतो.

  अन् न्याय मिळण्याचा अंश दाखविणारी जागा जेव्हा म्हणते की तुमच्या समस्या ऐकायला आम्हाला वेळच नाही तेव्हा खालच्या यंत्रणेला अनागोंदीचा अंधुकसा अंधार अधिकच गडद करण्याची शासनमान्य संधीच दिली आहे असं समजावं.

  अशा वेळी समजून चलावं की प्रकाशयुग संपून अमर्याद अंधाराची सत्ता येत आहे.तो अंधार स्वीकारून भावनिक कोंडमारा सहन फक्त देहाने जीवीत राहणं आपण स्वीकारावं.स्वप्नांचा पडलेला खून वारंवार आठवत राहिलो तर देहास जिवंत ठेवणे अवघड होईल.

  शिल्लक असलेल्या अंधुकशा प्रकाशातच चला,पावलापुरता प्रकाश देण्याची ताकद अंधुकशा अंधारातच आहे.पूर्ण उजेडाची अपेक्षा करणं म्हणजे देह दाह व मन दाह स्वीकारणे आहे.

  महानायकांच्या चरित्रात स्फूर्तीचे धडे आहेत,प्रेरणेच्या कथा आहेत पण आता ही पुस्तके उघडणेच नको कारण राजेशाही राजवटीत जुलमी राजा दिसत असतो म्हणून दिसत्या बाजूवर लढता येते.लोकशाहीत अन्याय करणारा अदृश्य असतो म्हणून कोणाशीच लढाई नसते,लढाई असते फक्त स्वतःशीच की मझा जन्म नेमका यावेळी का झाला असेल ?  

काही दिवसापूर्वी नांदेड जिल्ह्यातील एका शिक्षकाने वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. 

अत्यंतिक दुःखद व दुर्दैवी घटना आहे. आत्महत्या वाईटच,तिचं कुणीच समर्थन करणार नाही पण खुनी व्यवस्थेवर काय परिणाम होईल का ? स्वतः च्या जीवाइतकं,मुलाबाळाइतकं काहीच प्रिय नसतं मग हे सर्व संपविण्याचे मनात येते याचा अर्थच असा आहे की होणारा जाच जिवित जीवनापेक्षा मोठा असला पाहिजे.भावनिक कोंडमाऱ्याचे उत्तर निकाली काढताना माणुस आत्महत्या स्वीकारतो.कारण स्वतः चा जीव हीच त्याच्याजवळ असलेली त्याची सर्वोच्च  मालकी असते ‌.मोरे सरांच्या साच्यात डोकावून पाहिलं तर कदाचित त्यांच्या दृष्टीने आत्महत्या योग्यही असेल पण मुलांचे काय ? बरं मुलांचा त्यांनी विचार केला नसेल का ? निश्चितच हजारोवेळा ,एक एक क्षण विचार केलाच असेल.पण बाह्य जगाला उजेड दिसत असला तरी मोरे सरांना अंधार दिसत असेल.त्यामुळे आत्महत्या करणारा सुखासुखी हे पाऊल उचलत नसतो,व्यवस्थेचा किंवा त्रास देणारांचा तो खून करू शकत नाही मग एकच पर्याय उरतो तो म्हणजे स्वतःच स्वतःचा खून करून घेणे,ज्याला बाह्य जग आत्महत्या म्हणतं.

  मोरे सर जिवंत असताना समस्येकडे कुणीही पाहिले नाही पण कालपासून सारे जण व्यवस्थेविरूद्ध बोलत आहेत.हे बोलणंही अल्पकाळाची उबळ आहे, उबळेची उर्मी संपली की पुन्हा सारं काही थंड होईल.नव्या आत्महत्येपर्यंत संदेशवीर सुरक्षाकोश अवस्थेत स्वतः ला कोंडून घेतील. 

जिवंत मोरे जे बोलू शकला नाही,ते आता त्याचा मृतदेह बोलत आहे. समस्येवर बोलायला लक्षवेधी गोष्ट आत्महत्या आहे,हेच तेवढे आत्महत्येचे यश आहे.

कचरू चांभारे बीड 9421384434

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या