☘️ रानभाजी : लोत ☘️



☘️  रानभाजी : लोत  ☘️

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 23/7/2026 :

मराठी : सुरणाचा पाला, लोत, शेवळ

इंग्रजी : Elephant Foot Yam

कालावधी : जून ते ऑगस्ट

लोत किंवा सुरणाची पाने ही मध्यम आकाराची, दातेरी कडा असलेली असतात. लांबट असलेल्या या हिरव्यागार पानांवरील शिरा ठसठशीतपणे दिसतात. पानांची वरची बाजू गुळगुळीत असून खालची बाजू त्यावर मऊ लव असल्याने मखमली असते. पानांचे देठ लांब असून वेली सारख्या नाजूक खोडाला ही पाने जोडलेली असतात.

साहित्य : १ जुडी लोतची भाजी, कांदा, ८ ते १० लसूण पाकळ्या, ४ ते ५ हिरव्या मिरच्या, २ चमचे चिंचेचा कोळ, २ चमचे फोडणीसाठी तेल, चवी नुसार मीठ, आवडी नुसार खोवलेले खोबरे.

कृती : लोतची पाने स्वच्छ धुऊन चिरावीत. चिरताना हाताला तेल लावावे म्हणजे खाजणार नाही. तेलाची फोडणी करून त्यात चिरलेल्या हिरव्या मिरच्या, ठेचलेली लसूण आणि नंतर कांदा घालून परतून घ्यावा. कांदा गुलाबी झाल्यावर त्यात भाजी घालून शिजवून घ्यावी. शेवटी चिंचेचा कोळ, मीठ आणि खोवलेले खोबरे घालून एक वाफ येऊ द्यावी.

टीप : भाजी चिरताना हाताला तेल लावून घ्यावे. तसेच भाजी करताना कोकम, चिंच यांचा वापर करावा म्हणजे घशाला खवखवणार नाही.

मानसी गावकर

☘️☘️☘️

सुरणाच्या पाल्याची वडी

साहित्य : धुवून बारीक चिरलेला दोन वाट्या सुरणाचा पाला, एक बारीक चिरलेला कांदा, एक मोठी वाटी भिजलेली चणा डाळ, दोन टीस्पून हिरवी मिरची, अर्धा टीस्पून हळद, दोन टीस्पून तांदळाची पिठी, मूठभर कोथिंबीर, एका लिंबाच्या आकाराचा गूळ, एक टीस्पून लिंबाचा रस, चवी पुरतं मीठ, तळणीसाठी तेल.

कृती : एका बाऊल मध्ये सुरणाचा पाला, कोथिंबीर, चणाडाळ, तांदळाची पिठी, मिरची, हळद, कांदा, गूळ, लिंबाचा रस, मीठ एकत्रित करून मिश्रण सरसरीत भिजवावं. नंतर एका थाळीला तेल लावून त्यात ते मिश्रण पसरवावं. नंतर इडली पात्रात ती थाळी ठेवून पंधरा ते वीस मिनिटं वाफवून घ्यावं. थंड झाल्यावर त्याच्या वड्या कापून तळून घ्याव्या. या गरमागरम वड्या टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह कराव्या.

टीप : चणाडाळ पाणी न घालता मिक्सर मधून वाटून घ्यावी.

नमिता शिंदे, मुलुंड

☘️☘️☘️



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या