आधी स्वतःला पारखा, मग जगाला ओळखा.



आधी स्वतःला पारखा, मग जगाला ओळखा.

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 02/07/2026 :

​पहाटेच्या शांततेत एक सुंदर विचार मनाला स्पर्श करून गेला “कधीतरी स्वतःलाही पारखता आलं पाहिजे, ज्या अपेक्षा आपण दुसऱ्याकडून करतो त्या स्वतःला पूर्ण करता येतील का हे ही पहावं.”

या ओळीने मला माझ्याच आयुष्यातील काही अनमोल अनुभवांच्या पानात डोकावून पाहायला भाग पाडले. 

​आपण आयुष्यभर एक गोष्ट खूप सहज करत असतो, ती म्हणजे दुसऱ्यांचे मूल्यमापन, समोरचा कसा वागतो, त्याचे कर्तव्य काय, त्याने आपल्यासाठी काय करायला हवे होते, यावर आपण अगदी सहज भाष्य करतो. आपण कौटुंबिक नातेसंबंधात किंवा कामाच्या ठिकाणी इतरांकडून नेहमीच परफेक्ट वागण्याची अपेक्षा करतो. त्याने मला समजून घ्यायला हवे होते किंवा मित्रांनी संकटात धावून यायलाच हवे, असे आपल्याला सतत वाटते. पण अपेक्षांचा हा डोंगर दुसऱ्यांवर रचण्यापूर्वी, आपण कधी शांतपणे स्वतःच्या आत डोकावून पाहिले आहे का?

​माझ्या वैयक्तिक आणि व्यवहारिक प्रवासातून मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आहे, दुसऱ्याला पारखण्याआधी स्वतःची क्षमता तपासणे हेच खऱ्या परिपक्वतेचे लक्षण आहे. स्वतःला पारखणे म्हणजे स्वतःला दोष देणे नव्हे, तर स्वतःचा आरसा स्वतः बनणे.

दुसऱ्याने दिलेला शब्द पाळला पाहिजे म्हणणारे आपण, स्वतः दिलेले शब्द किती पाळतो? किंवा दुसऱ्याने आपल्याला समजून घ्यावे अशी इच्छा असणारे आपण, समोरच्याच्या मनःस्थितीचा कधी विचार करतो का? या प्रश्नांची उत्तरे शोधणे म्हणजेच आत्मपरीक्षण. जर आपण स्वतः एखाद्याच्या अपेक्षेला शंभर टक्के उतरू शकत नाही, तर दुसऱ्याला त्याच तराजूत तोलणे हा अन्याय आहे.

​ज्या दिवशी आपण अपेक्षांची सुई दुसऱ्यांवरवरून वळवून स्वतःच्या कर्तव्याकडे नेतो, त्या दिवशी आयुष्यात एक वेगळीच शांतता लाभते. दुसऱ्याला बदलण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल घडवणे अधिक आनंददायी असते.

आपण नेहमीच दुसऱ्यांच्या आयुष्याचे परीक्षक बनून त्यांना गुण देतो; पण आयुष्याचा खरा आनंद मिळवायचा असेल, तर कधीतरी स्वतःच्या उत्तरपत्रिकेकडेही नजर टाकावी. कारण जेव्हा आपण स्वतःचे प्रामाणिक परीक्षक बनू, तेव्हा अपेक्षांचे ओझे हलके होईल आणि हे जग अधिक सुंदर वाटू लागेल.

©️ShradDhanesh's Dairies 

संकलन : प्रविण सरवदे, कराड,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या