🔰कोकराचा पुतळा आणि करुणा

 🔰कोकराचा पुतळा आणि करुणा     

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 07/07/ 2026 :   

मार्च १८१५ मधील एक गारठलेली  सकाळ. अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स राज्यातील स्टर्लिंग या गावात नऊ वर्षांची मेरी सॉयर आपल्या वडिलांसह गोठ्यात काम करत होती . तेव्हा त्यांच्या एका  मेंढीने रात्री जुळ्या कोकरांना जन्म दिला होता. त्यापैकी एक कोकरू निरोगी होते, पण दुसरे आईने नाकारले होते. ते थंडीने गारठून उपाशी आणि मृत्यूच्या उंबरठ्यावर असं गवतावर पडले होते .

"मी याला घरात नेऊ का?" मेरीने वडिलांना विचारले.

वडिलांनी नकार दिला.

 "याचा काही उपयोग नाही. हे वाचणार नाही."

       पण मेरीने  हट्ट धरला. अखेर वडिलांनी परवानगी दिली. मेरीने त्या कोकराला उचलून घरात आणले. जुन्या कपड्यांत गुंडाळून तिने त्याला शेकोटीजवळ उब दिली. रात्रभर ती त्याला कुशीत घेऊन बसली. कोकरू इतके अशक्त होते की सुरुवातीला ते दूधही पिऊ शकत नव्हते.

पण मेरीच्या प्रयत्नांमुळे दुसऱ्या दिवशी सकाळी ते कोकरू उभे राहिले. पुढील काही दिवस तिने त्याला दूध पाजले, उब दिली, काळजी घेतली .    

       हळूहळू त्या कोकराचे आणि मेरीचे एक नाते निर्माण झाले. ते तिचा आवाज ओळखू लागले. हाक मारली की धावत येई. आणि मेरी जिथे जाई तिथे ते तिच्या मागे जाई.

एके दिवशी मेरीचा मोठा भाऊ नेट म्हणाला, 

"आज कोकराला शाळेत घेऊन जाऊया!"

     शाळेत प्राणी नेण्यास मनाई होती. तरीही मेरीने कोकराला टोपलीत लपवून वर्गात आणले.  मेरीला धडा वाचण्यासाठी पुढे बोलावण्यात आले, तेव्हा कोकरू अचानक मोठ्याने ओरडले आणि तिच्यामागे वर्गाच्या पुढे गेले.

संपूर्ण वर्गात हशा पिकला.  शिक्षिका पॉली किंबॉल यांनाही हसू आवरले नाही. शेवटी मेरीला कोकराला बाहेर ठेवावे लागले.

          त्या दिवशी वर्गात उपस्थित असलेल्या एका तरुणाने हे दृश्य पाहिले होते. त्याचे नाव होते जॉन रुलस्टोन.

दुसऱ्या दिवशी त्याने मेरीला एक कागद दिला. त्यावर काही ओळी लिहिल्या होत्या:

"Mary had a little lamb, 

Its fleece was white as snow; 

And everywhere that Mary went, 

The lamb was sure to go..."

                       मेरीने तो कागद आयुष्यभर जपून ठेवला.

ते कोकरू चार वर्षे जगले. त्याला स्वतःची तीन कोकरे झाली. नंतर एका अपघातात त्याचा मृत्यू झाला. मेरीच्या आईने त्याच्या लोकरीपासून तिच्यासाठी मोजे विणले. ते मोजेही मेरीने आयुष्यभर जपले.

     १८३० मध्ये लेखिका आणि संपादक सॅरा जोसेफा हेल  यांनी ' पोएम्स फॉर अवर चिल्ड्रेन'  या पुस्तकात "Mary's Lamb" ही कविता प्रसिद्ध केली. ही कविता शाळांच्या पुस्तकांत छापली जाऊ लागली आणि संपूर्ण अमेरिकेत लोकप्रिय झाली.

         १८७७ मध्ये महान संशोधक एडीसन  यांनी त्यांच्या नव्या फोनोग्राफ यंत्राची चाचणी घेताना इतिहासातील पहिली ध्वनिमुद्रिका तयार केली. त्या वेळी त्यांनी उच्चारलेले शब्द होते—

"Mary had a little lamb..."

     मानवजातीच्या इतिहासातील पहिले ध्वनिमुद्रित वाक्य याच कवितेचे होते!

     १८७६ मध्ये, सत्तर वर्षांच्या मेरीने अखेर स्वतःची ओळख जाहीर केली. लोक थक्क झाले. बालगीतामागची मुलगी खरोखर अस्तित्वात होती.१८८९ मध्ये मेरी सॉयर यांचे वयाच्या ८३व्या वर्षी निधन झाले.

      आज स्टर्लिंग, मॅसेच्युसेट्स येथे तिच्या कोकराचा पुतळा उभा आहे. तो एका लहान मुलीच्या करुणेची आठवण करून देतो—जिने एका मरत असलेल्या जीवाला वाचवले आणि नकळत इतिहास घडवला.

आपल्या लहानपणी आपण ही बाल कविता शिकलो आहोत. आपल्या पुढील पिढ्याही 

"Mary Had a Little Lamb"   बालगीत   म्हणतील.मेरीने  दाखवून दिले की करुणेचे एक छोटसं कृत्य  काळाच्या पलीकडे जाऊन अमर होऊ शकते.

 - लीना पांढरे

===============

🌹✍️

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या