⭕पोलिसांनी उपोषणस्थळावरुन ताब्यात घेतल्यानंतर सोनम वांगचुक यांची पहिली पोस्ट, पत्नीमार्फत दिला मेसेज!
वृत्त एकसत्ता न्यूज
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
कोल्हापूर/अकलूज दिनांक 19/7/2026 :
Sonam wangchuk first message after police detention : दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या उपोषणस्थळावरून पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर उपोषणकर्ते सोनम वांगचुक यांचा पहिला संदेश समोर आला आहे.
हा संदेश त्यांच्या पत्नी गीतांजली यांच्या माध्यमातून जारी करण्यात आला आहे. "20 जुलै... आजादी का दूसरा आन्दोलन, भयमुक्त भारत, अन्यायमुक्त भारत" असा संदेश त्यांनी दिला आहे. "पेपरफुटीसारख्या अन्यायातून मुक्ती आणि माझ्या बेकायदेशीर अटकेतून मुक्ती" अशी भूमिका मांडत त्यांनी भारताच्या "दुसऱ्या स्वातंत्र्य आंदोलनाचा" उल्लेख केला आहे. तसेच 20 जुलै रोजी संसदेकडे काढण्यात येणारा मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. संदेशाच्या शेवटी "माझ्या बेकायदेशीर अटकेतून, सफदरजंग येथून" असा उल्लेख करण्यात आला असून तो पत्नी गीतांजली यांच्या माध्यमातून पाठविण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
Message from Sonam :
20th JULY
आज़ादी का दूसरा आन्दोलन
भय मुक्त भारत, अन्याय मुक्त भारत
Freedom from injustice (Like paper leaks)
Freedom from Fear (my illegal detention)
India’s 2nd FREEDOM MOVEMENT
March to the Parliament
Please make it a big success
Sent through… pic.twitter.com/XYeUXgUxJH
— Sonam Wangchuk (@Wangchuk66) July 19, 2026
*सोनम वांगचुक यांच्यावर सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरु*
सोनम वांगचुक 28 जूनपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे बेमुदत उपोषण करत आहेत. उपोषणादरम्यान त्यांच्यामध्ये डिहायड्रेशनची लक्षणे दिसू लागल्यानंतर शनिवारी दिल्ली पोलिसांनी त्यांना तेथून हलवून सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिल्याचे सांगण्यात आले आहे. सफदरजंग रुग्णालयाच्या डॉक्टरांनी तातडीने वैद्यकीय हस्तक्षेप न झाल्यास त्यांची प्रकृती अधिक गंभीर होऊ शकते, असा इशारा दिला आहे. रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत जारी करण्यात आलेल्या मेडिकल रिपोर्टनुसार त्यांची प्रकृती स्थिर आहेत.
मात्र, दीर्घकाळ सुरू असलेल्या उपोषणामुळे रक्तातील काही घटकांमध्ये बदल दिसून येत असून तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाच्या देखरेखीखाली त्यांच्यावर सातत्याने उपचारांची गरज असल्याचे रुग्णालयाने स्पष्ट केले आहे.
*आंदोलकर्त्यांच्या मागण्या काय आहेत?*
या आंदोलनामागील प्रमुख मागणी म्हणजे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, ही आहे. आंदोलनाशी संबंधित संघटनांचा आरोप आहे की, NEETसह विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहार आणि पेपरफुटीमुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची राजकीय जबाबदारी निश्चित करण्यात यावी, राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA)च्या कामकाजाची निष्पक्ष चौकशी व्हावी, पेपरफुटीच्या घटनांची पारदर्शक चौकशी करून संपूर्ण परीक्षा व्यवस्थेत व्यापक सुधारणा करण्यात याव्यात, अशी त्यांची मागणी आहे.
दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने शनिवारी रात्री दिलेल्या माहितीनुसार, सोनम वांगचुक शुद्धीवर असून त्यांचा रक्तदाब आणि ऑक्सिजनची पातळी सध्या नॉर्मल आहे. मात्र, सलग 21 दिवसांच्या उपोषणामुळे त्यांच्या शरीरात डिहायड्रेशनची स्पष्ट लक्षणे आढळून आली आहेत. दुसरीकडे, त्यांची पत्नी गीतांजली यांनी वांगचुक यांच्यावर पूर्वीपासून उपचार करणाऱ्या खासगी डॉक्टरांची अधिकृत संमती मिळाल्याशिवाय त्यांना कोणताही वैद्यकीय उपचार करु नये, अशी भूमिका घेतली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी दिल्ली उच्च न्यायालयात होणार असताना पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर हा संपूर्ण विषय अधिक चर्चेत आला आहे. तसेच, पोलिसांच्या कारवाईनंतर CJPचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई झाल्याचा आरोप करत ही लोकशाही हक्कांवरील गदा असल्याचे म्हटले आहे.



0 टिप्पण्या