'ऑनलाइन'ला मराठी पर्याय; मोहोळच्या विजयकुमार मोटे यांची 'आंतरजालस्पर्शी' शब्दनिर्मिती


'ऑनलाइन'ला मराठी पर्याय; मोहोळच्या विजयकुमार मोटे यांची 'आंतरजालस्पर्शी' शब्दनिर्मिती

वृत्त एकसत्ता न्यूज

मोहोळ | प्रतिनिधी दि. 05/07/2026 : मराठी भाषेतील शब्दसंपदा समृद्ध करण्याच्या उद्देशाने मोहोळ येथील पत्रकार विजयकुमार कुबेर मोटे यांनी इंग्रजीतील 'Online' (ऑनलाइन) या शब्दासाठी 'आंतरजालस्पर्शी' हा मराठी प्रतिशब्द तयार केला आहे. हा शब्द व्याकरणदृष्ट्या शुद्ध, अर्थपूर्ण आणि व्यवहार्य असल्याचा त्यांचा दावा असून, या शब्दाला अधिकृत मान्यता मिळावी यासाठी त्यांनी संबंधित शासकीय विभागाकडे प्रस्तावही सादर केला आहे.

'आंतरजालस्पर्शी' हा शब्द 'आंतरजाल' आणि 'स्पर्शी' या दोन शब्दांच्या संयोगातून तयार करण्यात आला आहे. 'आंतरजाल' म्हणजे इंटरनेट, तर 'स्पर्शी' म्हणजे संपर्कात असलेला किंवा जोडलेला. त्यामुळे आंतरजालाच्या माध्यमातून कार्यरत किंवा संपर्कात असलेला असा या शब्दाचा अर्थ अभिप्रेत आहे.

दैनंदिन वापरात 'ऑनलाइन' हा इंग्रजी शब्द मोठ्या प्रमाणावर वापरला जात असला, तरी त्याला समर्पक मराठी पर्याय उपलब्ध व्हावा या हेतूने ही शब्दनिर्मिती केल्याचे विजयकुमार मोटे यांनी सांगितले. आंतरजालस्पर्शी अर्ज, आंतरजालस्पर्शी शिक्षण, आंतरजालस्पर्शी परीक्षा, आंतरजालस्पर्शी बैठक, आंतरजालस्पर्शी सेवा अशा विविध ठिकाणी या शब्दाचा वापर करता येऊ शकतो.

या शब्दाच्या प्रसारासाठी त्यांनी सामाजिक माध्यमे, ब्लॉग तसेच विकिपीडियाच्या चर्चा पानावरही माहिती प्रकाशित केली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाकडे या शब्दाचा विचार करून अधिकृत शब्दसंग्रहात समावेश करण्यासाठी ई-मेलद्वारे प्रस्ताव पाठविल्याचे त्यांनी सांगितले.

मराठी भाषेत नव्या संकल्पनांसाठी स्वदेशी प्रतिशब्द निर्माण करण्याची परंपरा कायम ठेवत 'आंतरजालस्पर्शी' हा शब्द भविष्यात सर्वसामान्य वापरात येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

 अकलूज वैभव आणि वृत्त एकसताचे संस्थापक संपादक, सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांनी "आंतरजालस्पर्शी" शब्दाचे निर्माते पत्रकार विजयकुमार कुबेर मोटे यांचे, "आम्हाला आपला अभिमान वाटतो. लवकरात लवकर आपल्या प्रस्तावास मान्यता मिळावी अशी सदिच्छा व्यक्त करीत आहे" अशा प्रेरक शब्दात भ्रमणध्वनीवरून विशेष अभिनंदन केले आहे.

> टीप : या वृत्तातील 'आंतरजालस्पर्शी' शब्दाचे निर्माते असल्याचा उल्लेख विजयकुमार कुबेर मोटे यांनी केलेल्या दाव्यावर आधारित आहे. या दाव्याची अधिकृत किंवा स्वतंत्र शैक्षणिक पुष्टी झाल्यानंतर त्यानुसार नोंद अद्ययावत केली जाऊ शकते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या