मुखवटा हसणारा, मन थकलेलं.

 

मुखवटा हसणारा, मन थकलेलं.

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 01/07/2026 :

​"हर मुस्कुराता चेहरा खुश हो, ये जरुरी नही..." हे वाक्य माझ्या अनुभवाशी तंतोतंत जुळणारं आहे. आजच्या जगात आपण सगळेच जण नेहमी हसत राहण्याचा आणि समोरच्याला आनंद देण्याचा एक मुखवटा लावून जगत आहोत. मला प्रकर्षाने जाणवलं आहे की, जी माणसं जगाला हसवायचा प्रयत्न करतात, तीच आतून सगळ्यात जास्त थकलेली असतात. त्यांच्या आयुष्यात कितीही वादळ असलं, तरी घरातली जबाबदारी, ऑफिसचा ताण किंवा मनाची घालमेल ते एका गोड हस्यामागे लपवून ठेवतात.

 "दुसऱ्यांचे डोळे पुसणाऱ्यांकडे स्वतःचे अश्रू लपवण्याची अद्भूत कला असते." पण सगळ्यांना खुश ठेवण्याच्या या प्रवासात त्यांची स्वतःची ऊर्जा कधी संपून जाते, हे त्यांनाही कळत नाही.

​जेव्हा ही माणसं जगासमोरून बाजूला होऊन स्वतःसोबत एकटी असतात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा तो हसरा मुखवटा गळून पडतो आणि उरतो तो फक्त एक अथांग थकवा. हा थकवा शरीराचा नसतो, तर तो सतत खंबीर राहण्याचा आणि 'मी ठीक आहे' असं नाटक करण्याचा असतो. लोकांना वाटतं की ही व्यक्ती किती आनंदी आहे, पण त्या हसऱ्या चेहऱ्यामागची थकलेली शांतता वाचायला जग नेहमीच अपयशी ठरतं.

​माझ्या अनुभवावरून मी एवढंच म्हणेन की, इतरांना आनंद देणं नक्कीच पुण्य आहे, पण ते करताना स्वतःच्या अस्तित्वाची राख करू नका. जर मन दमलं असेल, तर कधीतरी खोटं हसणं थांबवून शांत बसण्याचा किंवा हक्काने रडण्याचा अधिकार स्वतःला नक्की द्या. कारण, दुसऱ्यांचे दिवे उजळण्याच्या नादात आपण स्वतःच अंधारात विरून गेलो, तर त्या उजेडाला काहीच अर्थ उरत नाही. शेवटी, जगाला सांभाळताना स्वतःला गमावू नका; कारण तुम्ही आनंदी असाल, तरच तुमच्या जगाला अर्थ आहे.

©️ShradDhanesh's Dairies

संकलन : प्रविण सरवदे, कराड

.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या