मनाची शुद्धता

 

मनाची शुद्धता

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 15/06/2026 :

पूर्वीची आपली एकत्र कुटुंब व्यवस्था अत्यंत बळकट होती. घरात तीन-चार पिढ्या एकत्र गुण्यागोविंदाने राहत होत्या. साहजिकच घरातील मोठ्यांचे राहणीमान, त्यांचे वागणे-बोलणे आणि सुसंस्कृत संस्कार या गोष्टींचे पुढील पिढी नकळत अनुकरण करत असे. त्यावेळी घरातील मोठ्या माणसांचा एक आदरयुक्त धाक असायचा.

परंतु, काळानुरूप हल्ली समाजात हे कौटुंबिक वातावरण थोडे बिघडत चालले आहे असे प्रकर्षाने जाणवते. सध्याच्या काळात विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरात एक किंवा दोनच मुले असतात. त्यात आई-वडील दोघेही कामानिमित्त दिवसभर घराबाहेर असतील, तर मुले खूप लवकर स्वतंत्र विचारांची होतात आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ लागतात. काही अंशी ही स्वावलंबिता ठीक असली, तरी योग्य मार्गदर्शनाअभावी काही मुले चुकीच्या दिशेने जाण्याची भीती असते; म्हणूनच त्यांच्यावर पालकांचे योग्य नियंत्रण असणे अत्यंत आवश्यक आहे.

आज समाजात बेपर्वाईने वागणारे, रस्त्यावर बेफाम वाहने चालवणारे, विविध व्यसनांच्या आहारी गेलेले आणि आपल्या पालकांची अजिबात पर्वा न करणारे काही तरुण-तरुणी पाहिले की, त्यांच्या पाठीशी उभे असलेले त्यांचे हतबल पालक डोळ्यांसमोर येतात. समाजात बदल घडवण्यासाठी हे अस्वस्थ करणारे चित्र बदलणे आता खूप गरजेचे आहे.

आजचा संकल्प

समाजातील एक जबाबदार घटक म्हणून आपल्या पाल्यांना लहान वयातच योग्य सवयी लावण्याची आणि त्यांच्यावर उत्तम संस्कार करण्याची पालक म्हणून आपली भूमिका आपण चोख पार पाडूया. याद्वारे एक सुसंस्कृत आणि सुजाण पिढी घडवूया.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या