पंढरीच्या वारीत भेटलेला खरा विठ्ठल : इरफान मुजावर
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 17/06/2026 :
पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या यात्रेकरूंवर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात असलेल्या तांदुळवाडी येथे काळाने घाला घातला. यात्रेकरूंनी भरलेले वाहन पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत कोसळले आणि क्षणार्धात या आनंदयात्रेचे रूपांतर आक्रोशात झाले. या भीषण दुर्घटनेत १४ निरपराध भाविकांचा मृत्यू झाला. अनेक कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
मात्र अशा काळ्याकुट्ट क्षणी एक माणूस आशेचा किरण बनून उभा राहिला आणि त्याचे नाव होते इरफान मुजावर!
अपघात झाला, तेव्हा ते तेथूनच मोटारसायलवरून जात होते. अपघात होताच त्यांनी कोणत्याही आदेशाची, कोणत्याही मदतीची वाट न पाहता स्वतःच्या जीवाची पर्वा न करता थेट विहिरीत उडी घेतली. मृत्यूशी झुंज देणाऱ्या यात्रेकरूंना वाचवण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले. त्यांच्या धाडसामुळे एका चार वर्षांच्या चिमुकल्यासह चार जणांचे प्राण वाचले.
आज समाजात धर्म, जात, पंथ, भाषा यांच्या नावाने भिंती उभ्या केल्या जात आहेत. द्वेषाचे राजकारण करून माणसाला माणसापासून दूर नेण्याचा प्रयत्न होत आहे, पण तांदुळवाडीच्या त्या विहिरीत इरफान मुजावर यांनी दाखवून दिले, की संकटात माणसाचा धर्म एकच असतो आणि तो म्हणजे मानवता!
बुडणाऱ्या यात्रेकरूंचे प्राण वाचवतांना त्यांनी त्यांचा धर्म विचारला नाही, जात विचारली नाही, नाव विचारले नाही. त्यांनी फक्त एवढेच पाहिले, की काही जीव मदतीसाठी हाक मारत आहेत आणि ते करून दृश्य पाहून ते धावून गेले.
आपल्या समाजाला आज अशाच माणसांची गरज आहे. मंदिर, मशिद, चर्च किंवा गुरुद्वारा यांपेक्षा मोठे जर काही असेल, तर ते म्हणजे दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालण्याची वृत्ती. इरफान मुजावर यांनी ही बाब कृतीतून सिद्ध करून दाखवली.
तांदुळवाडी दुर्घटनेतील या निष्पाप मृतांना भावपूर्ण आदरांजली!
आणि मानवतेचा झेंडा उंच फडकवणाऱ्या इरफान मुजावर यांना मानाचा मुजरा..!
मित्रांनो, जगद्गुरु तुकोबाराय यांचा एक अभंग आहे..
जे का रंजले गांजले l त्यासी म्हणे जो आपुले l
तोचि साधू ओळखावा l देव तेथेची जाणावा ll
याचा अर्थ इतकाच. की देव मंदिरातील दगडात वास करत नाही; तर इरफान मुजावर यांच्यासारख्या मानवतावादी आणि धाडसी व्यक्तींच्या रूपात वावरत असतो. संत गाडगेबाबा म्हणतात, ’मंदिरात देव राहत नाही, तर भटाचे पोट राहते. खरा देव तर समाजातील सद्गुणी माणसात राहतो’, तेव्हा या मानवतारूपी जनता जनार्धनाला ओळखायला शिका.. त्याचे स्तवन करा..
मानव समाजाचे उत्थान करण्यासाठी तेच आवश्यक आहे.
जय भारत..!
✍️ बाळासाहेब गरुड (BG)

0 टिप्पण्या