प्रशांत लोखंडे सीबीएसईचे नवे अध्यक्ष; महाराष्ट्रातील अधिकाऱ्याकडे कोट्यवधी विद्यार्थ्यांची जबाबदारी
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 02/06/2026 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ला नवा अध्यक्ष मिळाला असून वरिष्ठ आयएएस अधिकारी प्रशांत सीताराम लोखंडे यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाने (DoPT) यासंदर्भातील आदेश जारी केला असून मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (ACC) त्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. ते विद्यमान अध्यक्ष राहुल सिंह यांची जागा घेणार आहेत. याआधी काही तासांपूर्वीच विद्यमान अध्यक्ष राहुल सिंह आणि सचिव हिमांशू गुप्ता यांची बदली करण्यात आली होती. बोर्डाच्या नव्या डिजिटल मूल्यांकन प्रणालीवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.प्रशांत लोखंडे हे एजीएमयूटी (अरुणाचल प्रदेश, गोवा, मिझोराम आणि केंद्रशासित प्रदेश) कॅडरचे 2001 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. सीबीएसईचे अध्यक्षपद स्वीकारण्यापूर्वी ते केंद्रीय गृह मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत होते. त्यांची नियुक्ती अतिरिक्त सचिव दर्जा आणि वेतनमानातच करण्यात आली आहे. मूळचे महाराष्ट्रातील असलेले प्रशांत लोखंडे हे प्रशासकीय क्षेत्रातील अनुभवी अधिकारी म्हणून ओळखले जातात. शिस्तबद्ध कामकाज, धोरणात्मक विषयांवरील सखोल आकलन आणि प्रभावी प्रशासन यासाठी त्यांची विशेष ख्याती आहे. त्यामुळे देशातील सर्वात मोठ्या शैक्षणिक मंडळाच्या नेतृत्वासाठी त्यांची निवड महत्त्वाची मानली जात आहे.

0 टिप्पण्या