राज ठाकरे..
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 13/06/2026 : महाराष्ट्रातील माझ्या टॉप पाच ऑल टाइम फेव्हरेट नेत्यांच्या यादीत राज ठाकरे हे नाव सदैव असेल. बाळासाहेब ठाकरे ह्या आमच्या दैवताचा आक्रमकपणा, हिम्मत, फटकळपणाकडे झुकणारा स्पष्टवक्तेपणा, उपहास, विनोद बुद्धी हे सर्व गुण उपजत असलेला नेता म्हणजे राज ठाकरे! जे भाषणाला फक्त उभे राहिले की घोषणा, टाळ्या आणि फटाक्यांनी वातावरण दुमदुमून जातं असा नेता. राजकारणात असले तरी राज ठाकरे आधी अप्रतिम कलाकार आहेत. त्यांना कलाकार आणि साहित्यिकांबद्दल आदर आहे. त्यांचं वाचन अफाट आहे. त्यांची उठबस राजकीय वर्तुळाबरोबरच सांस्कृतिक वर्तुळातही असते आणि ती नुसती दाखवायला नसून त्यात ते रमतात.
उद्धव ठाकरे सक्रिय राजकारणात उतरायच्या आधी शिवसैनिक आणि इतर सर्वांनाच राज ठाकरे हेच बाळासाहेबांचे उत्तराधिकारी असतील आणि त्यांच्या नंतर शिवसेनेचे सर्वोच्च नेते असतील असं वाटत होतं. पण नियती आणि बाळासाहेबांच्या मनात काहीतरी वेगळं होतं. हरकत नाही. बाळासाहेबांच्या त्या निर्णयाचा आदरच आहे! पण काही कारणाने एक सुस्थापित पक्ष, त्यातील सुस्थापित स्थान एका रात्रीत सोडून, इतर पक्षात प्रवेश न करता स्वतःचा पक्ष काढून तो इतकी वर्षे सुरू ठेवण्याची धमक असलेला शरद पवारांच्या व्यतिरिक्त राज ठाकरे हा एकमेव नेता महाराष्ट्रात आहे असं मला वाटतं. दोघेही वृत्तीने राजे. दुसऱ्या राजाचं, पक्षाचं मंडलीकत्व त्यांना कधीच मान्य होणार नाही. आपल्या लहान मोठ्या कश्याही राज्याचे ते राजेच राहिले आणि राहतील!
मनसे चा स्थापनेपासूनचा राजकीय प्रवास हा चर्चेचा विषय असू शकेल. त्यावर लोकांची दोन विरुद्ध टोकाची मते असतील. तिच्या यशापयशावर रकाने भरून आणि स्पेशल बुलेटिन लावून वृत्तपत्र आणि वाहिन्या खप आणि टीआरपी मिळवत असतील. पण जसं इंग्रजीत म्हणतात "You can love him, you can hate him but you can't ignore him" तसे राज ठाकरे महाराष्ट्रातील राजकारणात आपलं महत्वाचं स्थान राखून आहेत, सदैव चर्चेत राहिले आहेत, त्यांच्याशिवाय महाराष्ट्रातील राजकारण अपूर्ण आहे! राज ठाकरे ह्यांनी हाती घेतलेली आंदोलने, मोर्चे, चळवळी हे ज्या ज्या कारणांनी घेतले त्यावर त्या त्या वेळी बोलायला सुद्धा प्रस्थापित मोठ्या पक्ष आणि नेत्यांची फाटत होती. आता त्या आंदोलनांबद्दलही मत मंतांतरे आहेत. पण बाळासाहेब आणि शिवसेनेच्या बाबतीत सुद्धा काही राजकीय विरोधकांकडून अश्या नकारात्मक चर्चा घडत होत्या सेना सत्तेत येईपर्यंत.
दुर्दैवाने नाशिक वगळता मनसेला म्हणजेच राज ठाकरे ह्यांना त्यांची कार्यक्षमता दाखवायला सत्ताच मिळाली नाहीये. आपली धोरणे राबवायला खरी आणि व्यवस्थित संधीच मिळाली नाहीये! त्यांनी हाती घेतलेली आंदोलने, चळवळी ह्यांचा लोकांनी फायदा करून घेतल. राज ठाकरे ह्यांच्या पुढाकाराने टोल माफ झाल्यावर टेचात टोल नाक्यावरून गाडी हाणणाऱ्यांनी मतदान करताना मात्र त्यांना संधी द्यायचा विचार केला नाही ह्याचं वाईट वाटतं! लोकांचं प्रेम मतपेटीतून व्यक्त झालं नाहीये. राज ठाकरे आणि मनसे ह्यांच्या अमराठी विरोधाच्या धोरणामुळेच फडणवीस साहेबांची कितीही इच्छा असली तरी मुख्यत्वे उत्तर भारतीय नेतृत्व, प्राबल्य आणि नियंत्रण असलेल्या भाजपा बरोबर मनसेची युती होऊ शकली नाहीये. देशाचं भवितव्य असलेल्या तरुणाईचा प्रचंड सहभाग हे आज मनसेचं बलस्थान आहे! राज ठाकरे स्वतः कमी वयात आजोबा झाले असले तरी आजही ते "युथ आयकॉन" आहेत. कोणत्याही मराठी पोराला आज विचारलं की तुझा आवडता डॅशिंग नेता कोण तर बहुतांश पक्षातील तरुण मुलं राज ठाकरे ह्यांच नाव घेतात.
विरोधी किंवा सत्ताधारी ह्यांनी कितीही टीका केली तरी कृष्णकुंज आणि शिवतीर्थ वर सर्वांना कधीतरी हजेरी लावावी लागते ही राज ठाकरे ह्यांची ताकद आहे. मग ती सदिच्छा भेट असो वा मूक संमती मिळवायची असो वा शांत रहा अशी विनंती करायची असो. प्रत्येकाला कधी ना कधी जावं लागतंच. अशी हजेरी पूर्वी बाळासाहेब असताना मातोश्री वर लावावी लागत असे. आजही मराठी माणसाला "आपला वाटणारा" एकमेव नेता म्हणजे राज ठाकरे साहेब आहेत हे इतर पक्षाला मतदान करणारे मराठी लोकही मान्य करतील. राज ठाकरे ह्यांच्यासारखा दुसरा परखड, हजर जबाबी, माहितगार आणि बेधडक वक्ता आज महाराष्ट्रात दुसरा कोणीही नाहीये. त्यांचं व्यक्तिमत्व, आवाज, आक्रमकता, रुबाब ह्यांचा दरारा असला तरी राज ठाकरे अनेक सामान्य लोकांना "एप्रोचेबल" नेता वाटतात. आपलं ऐकून घेऊन काहीतरी कारवाई लगेच करतील असं वाटतं. जे बाळासाहेबांबद्दल लोकांना वाटायचं तसंच फीलिंग!
शिवसेनेने स्थापनेनंतर अनेक वर्षांनी मुंबई महानगर पालिकेतून सत्ता प्रवेश केला. मला वाटतं राज ठाकरे आणि त्यांची मनसे ह्यांनाही मुंबई महानगर पालिकेच्या पुढील निवडणुकीत सत्तेत सहभागी होण्याची एक तरी संधी द्यायला हवी. सत्तेचं ब्लु प्रिंट देणारा देशातील पहिला पक्ष सत्ता मिळाल्यास मुंबईसाठी काहीतरी चांगलं नक्कीच करेल असं अनेक मुंबईकरांना वाटतं. मग भले एक हाती सत्ता नसली तरी भागीदारीत सुरुवात होऊ दे. पण ती भागीदारी आकड्यांनी नगण्य नसून सन्मानपूर्वक असावी आणि ज्यातून त्यांना त्यांच्या योजना अंमलात आणायची संधी आणि ताकद मिळेल इतकी भक्कम असावी. राज ठाकरे साहेब आणि त्यांच्या साथीदारांना ज्या मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी ते लढत आहेत तिथे सत्तेत येऊन काहीतरी करण्याची संधी अवश्य मिळायला हवी अस प्रत्येक मराठी माणसाला मनातून वाटत असतं. फक्त राजकीय गणितं तशी जुळून यायला हवी!
आज राजसाहेब ठाकरे ५८ वर्षांचे झाले. म्हणजे खरं तर निवृत्तीच्या वयाचे. पण मी म्हणेन ही सुरुवात ठरू दे. नव्या युगाची. नव्या जोमाने संघटना बांधणीची. नव्या राजकीय समीकरणाची. २०२९ मधे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सत्तेत सहभागी होण्याच्या प्रयत्नांची. बाकी जोवर राज ठाकरे हे नाव आहे तोवर महाराष्ट्रात अजूनही मराठी माणसाची मूठ वळेल आणि प्रसंगी प्रहारही करेल. त्यामागे पूर्वी बाळासाहेब ठाकरे ह्या अवलियाची ताकद होती. आता राज ठाकरे ह्या नावाची ताकद आहे आणि असेल. हिंदुत्व वगैरे आहेच. पण महाराष्ट्रात आणि मुंबईत मराठी माणसाचा आवाज, अभिमान, शान आणि दरारा कोण असेल तर तो राजसाहेब ठाकरे हेच आहेत. मित्र ज्यांना प्रेमाने राजा म्हणतात त्या राजाच्या आयुष्यात राजयोग लवकरात लवकर येवो. त्यांना उत्तम आयुरारोग्य लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करून माझे अत्यंत लाडके नेते माननीय राजसाहेब ठाकरे ह्यांना वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा देतो. जय महाराष्ट्र!
©मंदार जोग

0 टिप्पण्या