विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 15/06/2026 :
जून महिना म्हणजे आपले नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणारा काळ! दीड ते दोन महिन्यांची उन्हाळी सुट्टी संपते आणि आपली लाडकी शाळा पुन्हा सुरू होते. या काळात काहींना आपली सुट्टी कधी संपूच नये असे वाटत असते, तर काही मुलांना नवीन वर्गात जाण्यासाठी शाळा कधी सुरू होते, याची प्रचंड घाई झालेली असते.
नवे वर्ग, नवे शिक्षक, पाठीवरचे नवे दप्तर आणि नवीन पुस्तकांचा तो सुवास... हे सगळे किती छान वाटते ना! जरी सर्व गोष्टी नव्या असल्या तरी आपले मित्र मात्र तेच जुने आणि हक्काचे असतात. शाळा सुरू झाल्यावर ते मित्र भेटल्याचा आनंद, जुन्या गप्पा आणि सुट्टीत केलेली मजा, हे सगळे अनुभवण्याची गंमत काही औरच असते! मात्र या आनंदासोबतच शाळेतील नियमित अभ्यास आणि शिस्त पाळणे हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे, बरे का!
मुलांनो, शाळेत आपण फक्त पुस्तकी ज्ञान मिळवत नाही, तर जीवनात उपयोगी पडणाऱ्या अनेक चांगल्या गोष्टी शिकतो; ज्यामधून आपले संपूर्ण व्यक्तिमत्त्व घडत असते. सुट्टीच्या काळात तुमचे लाडके शिक्षक देखील शाळेत तुमची आतुरतेने वाट पाहत असतात आणि तुमच्यातील सुप्त गुणांना योग्य आकार देण्याचे मोलाचे काम करत असतात.
चला तर, आपल्याला आयुष्यात एक उत्तम माणूस म्हणून घडवणाऱ्या आपल्या गुरुजनांच्या प्रती नेहमी मनात नितांत आदर ठेवूया आणि त्यांच्या आज्ञांचे मनापासून पालन करूया!
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या