✒️ संपादकीय............✍️
✅ जिवंत राहण्यासाठी प्रत्येकाने तुकाराम मुंढेंच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे!
✅ जिवंत राहण्यासाठी प्रत्येकाने तुकाराम मुंढेंच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे!
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 03/06/2026 :
या भेसळयुक्त जगात ओरीजनल मिळणे मुश्किल झाले आहे. वस्तूच काय तर जीवाभावाची माणसेही ड्युप्लिकेट निघू लागली आहेत. प्रवाहाच्या दिशेने जसे वारे वाहील तशी कलाटणी देणारी माणसे आज आपण पाहत आहोत. ध्येय, उद्देश बासनात गुंडाळून मनाची आणि जनाचीही लाज सोडलेल्या राजकीय नेत्यांच्या बकासूरी हव्यासापायी जनतेची पार वाट लागली आहे. या बकासूरांच्या राज्यात अस्सल चीजवस्तू मिळणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे शेतमाल पिकविण्यासाठी लागणारी खते ते खाण्याच्या सर्व वस्तूत मिलावटी करणाऱ्यांचा कब्जा आहे. अशी एकही वस्तू नाही ज्यात मिलावट होत नाही.
बरं त्यासाठी सरकारकडे अन्न व औषध प्रशासन सारखे महत्वाचे खाते आहे. पण हे खाते आजपर्यंत काय काम करते हे कोणाला जास्त माहितच नाही. परंतू नुकतेच 25 वर्षात 26 वी बदली झालेले तुकाराम मुंढे यांनी या खात्याचा पदभार स्विकारताच अवघ्या आठवड्याभरातच भेसळ करणाऱ्यांची दाणादाण उडवून दिली. 27 आस्थापने सिल, कोट्यावधींचा माल जप्त, नराधमांना अटक अशी कायदेशीर कारवाई केली. त्यात 12 वर्षापूर्वी 33 रुपये लिटर भावाने पेट्रोल मिळण्याचे स्वप्न दाखविणाऱ्या सरकारचा खास वरदहस्त लाभलेल्या पतंजलीवर कारवाई केली. न्यायालयाने पतंजली म्हणजे ड्युप्लिकेट वस्तू असा शिक्का मारुनही जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या पतंजलीवर कारवाई करण्याची हिंमत कोणी दाखवली नव्हती. ती उणीव तुकाराम मुंढेंनी भरुन काढली.
भाजी, तेल, खवा, खते, दुध, तूप, फळे, औषधे अशी जीवनावश्यक सर्वच वस्तू मध्ये भेसळ करणाऱ्यांनी परिसीमा गाठली आहे. यांच्यावर कोणाचे वचकच नव्हते. बंदी असलेला गुटखा खुलेआम विकला जाऊन तरुणाई बरबाद केली जात आहे. औषधाच्या गोळ्यात तर इतकी मिलावट आणि लुटमार आहे की, रुग्ण दोन्हीकडून मरतोच. हे माहित असूनही भ्रष्टाचारी सरकार सर्वांना पाठीशी घालत आहे. बरं या सर्वांच्या जाहिराती करणारे मोठमोठे कलाकार करोडो रुपये घेऊन लोकांना मरणाच्या दारात लोटत आहेत. कंपनी सांगेल तसे जाहिरातीत बोलणे हे कलाकाराचे काम, पण ती वस्तू खरोखरच त्या प्रतीची आहे का? त्या वस्तूला प्रयोगशाळेत तपास करुन शासकीय प्रमाणात मिळाले आहे का? हे पाहण्याची जबाबदारी कलाकाराला वाटत नाही. आपले करोडो रुपये मिळाले म्हणजे जनता गयी भाड मे. अशा कलाकारांवरही कारवाई करण्यासाठी तुकाराम मुंढेंनी पाऊल टाकले आहे.
मुंढे साहेब हाताळत असलेला विषय आपल्या सर्वसामान्य नागरीकांच्या जीवनमरणाचा आहे.* समोरची लॉबी खुप मोठी, खुँखार आणि पैसेवाली आहे. सरकारला ते करोंडो रुपयांचा निधी पुरवतात. त्यांनी तुकाराम मुंढेंची 27 वी बदली करण्यासाठी प्रयत्नही सुरु केले असतील. आता सर्वसामान्य लोकांचे जीवन तुकाराम मुंढेंच्या हातात आहे. ते 3 वर्ष अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पदावर असेच कार्यरत राहिले तर आपले भविष्य आरोग्यदायी आणि संरक्षित होईल. यासाठी शासना विरोधात लढा उभारावा लागेल. या लढाईत सहभागी झालात तर कोणी हिंदू विरोधी, संविधान विरोधी अशा उपाधी लागू शकतात. प्रश्न सर्वसामान्यांच्या जीवनमरणाचा आहे. या एकाच मुद्द्यावर सर्वांनी एकत्र येणे काळाची गरज आहे!
महेंद्र कुंभारे,
संपादक तथा कामगार नेते, भिवंडी.
मो.नं. 8007741356/8888182324
0 टिप्पण्या