मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 01/06/2026 :
आज '१ जून' आपल्या समाजातील बहुतांश ज्येष्ठ व्यक्तींचा कागदोपत्री जन्मदिवस! जुन्या काळात जेव्हा आजच्यासारखी अचूक जन्मतारीख नोंदवण्याची सोय किंवा पद्धत नव्हती, तेव्हा शाळेत नाव घालताना शिक्षकांनी किंवा पालकांनी अंदाजाने बहुतेक मुलांची जन्मतारीख '१ जून' अशीच नोंदवली. आज ही पिढी सत्तरीच्या आसपास आहे. या पिढीत जन्माची अचूक तारीख, वेळ नोंदवून ठेवण्याची किंवा दरवर्षी वाढदिवस साजरा करण्याची पाश्चात्त्य प्रथा नव्हती; तरी देखील ही माणसे अंतःकरणातून एका दृढ आणि आत्मीय नात्याने परस्परांशी जोडलेली होती.
आजच्या आधुनिक काळात आपण जन्माचे आकडे, तिथी आणि भव्य सोहळे यामध्ये इतके अडकलो आहोत की, नात्यांमधील तो जुना ओलावा कुठेतरी हरवत चालला आहे. त्या पिढीकडे आजच्यासारखे 'बर्थडे स्टेटस' किंवा महागड्या भेटीवस्तू नव्हत्या, पण एकमेकांच्या सुख-दुःखात धावून जाण्याची निखळ माणुसकी होती.
तारीख कोणतीही असो, आत्मियता आणि एकमेकांबद्दलचा आदर हीच त्यांची खरी ओळख होती. कागदावरची एकच जन्मतारीख शेअर करणाऱ्या या संपूर्ण पिढीचा साधेपणा आजच्या काळाला खूप मोठा धडा देऊन जातो.
आजचा संकल्प
आपल्या जन्मतारखेचा सोहळा करण्यापेक्षा, आपल्या आयुष्याचा प्रत्येक दिवस इतरांसाठी कसा आनंददायी करता येईल, याचा विचार करूया. बाह्य भपक्यापेक्षा जुन्या पिढीसारखी अंतर्मनाची शुद्धता आणि आत्मीयता जपत, नात्यांमधील ओलावा टिकवून ठेवण्याचा प्रामाणिक निश्चय करूया.
सौ. स्नेहलता स. जगताप.
==========/==========

0 टिप्पण्या