ड्रायव्हरलेस टॅक्सी आली म्हणे... आता किचनलेस बायको कधी येणार?

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 16/06/2026 :

काल मोबाईलवर ड्रायव्हरशिवाय चालणाऱ्या गाडीचा व्हिडिओ पाहिला आणि नेमकी कामवाली बाई सुट्टीवर गेल्यामुळे सिंकभर भांडी, न तापवलेलं दूध आणि कुकरच्या टेन्शनमध्ये स्वयंपाकघरात पोळपाट-लाटणं घेऊन उभ्या असलेल्या माझ्या मनात दिवसाढवळ्या स्वप्न रंगू लागली! गाडीत ना ड्रायव्हर, ना हॉर्न वाजवणारा काका... सगळं ते नवीन मशीन म्हणजे AI स्वतः करत होतं. विज्ञानाने एवढी प्रगती केलीये तर देवा, हे तंत्रज्ञान आमच्या किचनमध्ये आधी पाठव! आणि जो माणूस हे किचनचं मशीन शोधेल, त्याच्या पायाचं तीर्थ मी रोज सकाळी घेईन; कारण रस्त्यापेक्षा याची खरी गरज आमच्या भारतीय किचनमध्येच आहे.

सकाळी सव्वा सहा वाजल्यापासून मी त्या मशीनपेक्षा जास्त अपडेटेड असते. डोळे उघडायच्या आधीच प्रोसेसर सुरू होतो– मुलाचा डबा, नवऱ्याचा नाश्ता, सासूबाईंचा चहा, गॅसवर दूध आणि फ्रिजमधल्या उरलेल्या भाज्या कशा संपवायच्या या विचारात मी गाढ झोपेतून उठते. मी स्वतः अजून पूर्ण जागी नसते, तोच हॉलमधून नवरोबांचा पहिला प्रश्न येतो, "चहा झाला का?" अहो, मी काय रोबोट आहे? पण त्यांना चहा मात्र वेळेवर हवा असतो!

जरा कल्पना करा, उद्या जर हे मशीन किचनमध्ये आलं तर काय होईल? सकाळी नवरा म्हणाला, "चहा दे," तर मशीन उत्तर देईल, "तुम्ही काल चहाचा कप सिंकमध्ये ठेवला नव्हता, आज तुमची सेवा तात्पुरती बंद आहे!" तिथेच मुलगा तोंड वेडंवाकडं करून म्हणाला, "आई, तू रोजच काय पोहे करतेस?" तर मशीन म्हणेल, "बाळा, मागच्या आठवड्यात दोनदा सँडविच आणि तीनदा पास्ता खाल्लाय, विसरलास का? गपचूप पोहे खा, नाहीतर आजचा डबा कॅन्सल!" इतक्यात त्याने मोजे विचारले तर मशीन सांगेल, "जिथे काल फेकून दिले होते, तिथेच आहेत, स्वतः जाऊन उचल!" दुपारच्या जेवताना सासूबाई म्हणाल्या, "आज भाजीत मीठ जास्त झालंय," तर मशीन लगेच रेकॉर्ड दाखवेल, "हो सासूबाई, मागच्या १७ वर्षांत तुमच्याकडून हीच कमेंट तब्बल ३,४२८ वेळा आली आहे!" एवढ्यावरच त्या थांबणार नाहीत, ऐनवेळी म्हणतील, "पोळ्या कमी कर, आज भात जास्त खाणार!" तेव्हा मशीन डोक्याला हात लावून म्हणेल, "सकाळी तीन पोळ्या सांगितल्या होत्या, त्यानुसार पीठ मळलंय. आता सिस्टीम बदलणार नाही, भातातच ॲडजस्ट करा!"

खरी मजा संध्याकाळी येईल. मी सोफ्यावर निवांत चहा पित बसेन आणि नवरा पाऊस बघून म्हणतील, "गरम गरम भजे कर ना गं!" मी म्हणेन, "मला काय विचारता? जा मशीनला विचारा, आज मी फक्त युझर आहे!" नवरा किचनमध्ये जाताच मशीन ओरडेल, "तुमचे वजन दोन किलो वाढले आहे आणि घरात बेसनही संपले आहे. भज्यांचा विचार सोडा आणि गुपचूप शेपूची भाजी खा!"

इतक्यात दाराची बेल वाजते आणि कोणतेही 'नोटीफिकेशन' न देता दोन पाहुणे हसत-हसत अवतरतात– "म्हटलं चहा-पाणी करून जावं." नवरा सांगतो, "पटकन चहा आणि काजूचा शिरा बनव!" तेव्हा ते मशीन फ्रिज उघडून डबे तपासेल आणि वायर हायव्होल्टेज होऊन ओरडेल, "अलर्ट! घरात चहाची पत्ती एकच चमचा आहे आणि शिऱ्यासाठी दूधच नाहीये! पाहुण्यांनो, येताना व्हॉट्सॲप का नाही केलं? माझी सिस्टीम क्रॅश होत आहे!" शेवटी पाहुण्यांचा पाहुणचार करून रात्री सिंकमधला डोंगराएवढा भांड्यांचा पसारा पाहून बिचारं मशीन हँग होईल आणि स्क्रीनवर मेसेज येईल, "सिस्टम एरर! भारतीय कुटुंबाचा पसारा, नखरे आणि बिनबोलावलेले पाहुणे सांभाळण्याची माझी क्षमता नाही!"

अमेरिकेच्या रस्त्यावर गाडी चालवणं सोपं आहे हो, पण भारतीय घरात चार लोकांच्या वेगवेगळ्या आवडी आणि ऐनवेळचे नखरे सांभाळणं कठीण आहे! एकाला तिखट नको, दुसऱ्याला भेंडी नको, नवऱ्याला रोज नवीन हवं, सासूबाईंना ऐनवेळी भात हवा आणि फ्रिजमध्ये फक्त दोन सुकलेल्या सिमला मिरची नि टोपलीत दोन बटाटे! अशा वेळी त्या दोन बटाट्यांमध्ये पाहुण्यांसह अख्ख्या घराला खुश ठेवणं, हे कोणत्याही मशीनच्या बापालाही जमणार नाही! म्हणूनच, ज्या दिवशी ते मशीन स्वतः फ्रिज बघून काय बनवायचं याचं उत्तर शोधेल, त्या दिवशी जगातल्या सर्व बायका टाळ्या वाजवून म्हणतील, "आता खरंच विज्ञान प्रगत झालं!" काय मग गृहिणींनो, पटतंय ना?

"बाईशिवाय चालणारं भारतीय किचन' बनवणं विज्ञानाला कधीच जमणार नाही! कारण मशीनमध्ये फक्त डेटा आणि कोडिंग असतं... पण भारतीय किचनमध्ये लागणारा अचूक 'अंदाज', चवीची 'जादू' आणि कुटुंबासाठी असणारं 'प्रेम' कोणत्याही कम्प्युटरमध्ये डाऊनलोड करता येत नाही. गृहिणीचा २४ तास चालणारा प्रोसेसर आणि तिची माया... या तोडीचं तंत्रज्ञान जगात कुठेच तयार होऊ शकत नाही!"

सौ. तृप्ती देव 

भिलाई, छत्तीसगड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या