मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
(श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान, करंजे येथून)
संकलक : भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे
दिनांक 07/06/2026 :
बालपणी जोपर्यंत जगाची फारशी समज नसते, तोपर्यंत मनाला कोणतीही काळजी किंवा चिंता नसते; आपण अगदी निखळ आनंदात जगत असतो. पण जसजसे आपण मोठे होत जातो, तसतशी अभ्यासाची, परीक्षांची आणि पुढे नोकरी-व्यवसायाची चिंता मनाला लागून राहते.
"पेपर चांगले जातील का? गुण किती मिळतील? नोकरी मिळेल का? पगार किती मिळेल? त्याने आपले भागेल का?" असे एक ना अनेक प्रश्न सतत डोक्यात घोळत असतात. भविष्याची हीच नाहक चिंता लागून राहिल्याने मन सतत अस्वस्थ राहते आणि पर्यायाने वर्तमानकाळाचा निखळ आनंद घेण्याचे पार राहूनच जाते.
वास्तविक पाहता, आपण आपल्या वर्तमानकाळातच अतिशय काळजीपूर्वक आपले भविष्य घडवत असतो. आयुष्यात बरे-वाईट जे काही घडेल, त्याला बहुतांश वेळा आपली आजची कृतीच जबाबदार असते. म्हणूनच, भविष्याच्या दृष्टीने वर्तमानात जर आपण योग्य पावले उचलत असू, तर मग उगीचच चिंता कशाची करायची?
आजचा संकल्प
आपले भविष्य जसे उज्ज्वल असावे असे आपल्याला वाटते, ते घडवण्यासाठी आपण आपला वर्तमानकाळातील प्रत्येक दिवस योग्य कारणासाठी उपयोगी आणूया. वेळेचे अचूक नियोजन करूया आणि आपले सुंदर भविष्य स्वतःच घडवूया.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या