मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 02/06/2026 :
आपल्या वर्तनाने जर दुसरी व्यक्ती आनंदित होत असेल, तर ते आपल्यासाठी खूप मोठे आत्मिक सुख आहे. आपले विचार आणि आपले वागणे-बोलणे जेव्हा इतरांच्या चेहऱ्यावर हसू उमलवते, तेव्हा आपण एक सुजाण व्यक्ती म्हणून यशस्वी झालो आहोत, असे समजण्यास हरकत नाही.
आनंद देणारे शब्द असोत किंवा वेदना देणारे, मनाला थेट लागणारे शब्द असोत; हे सगळे ज्यांच्यापासून तयार होतात, ती अक्षरांची बाराखडी मात्र एकच असते. 'अ' पासून 'ज्ञ' पर्यंतची सर्व अक्षरे तीच असतात; आपण ती कोणत्या भावनेने आणि कारणाने वापरतो, त्यावरच सर्व काही अवलंबून असते.
मनातील विचारच शब्दरूपाने बाहेर पडतात; म्हणूनच ते नेहमी चांगले असावेत. इतरांना टोचणारे किंवा त्यांचे मन दुखावणारे शब्द जर आपल्या मुखातून बाहेर पडत असतील, तर आपल्याला स्वतःला अंतर्मनातून बदलण्याची अत्यंत आवश्यकता आहे.
आजचा संकल्प
आपल्या बोलण्याने इतरांना आनंद देता आला नाही तरी चालेल, पण निदान कोणाचे मन दुखावले जाणार नाही आणि कोणाला दुःख होणार नाही, याची आपण पूर्ण काळजी घेऊया आणि आपले संभाषण नेहमी सुसंस्कृत ठेवूया.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या