✍️ सम्यक व्यायाम : जीवनाला योग्य दिशा देणारा जागरूक प्रयत्न

✍️ सम्यक व्यायाम : जीवनाला योग्य दिशा देणारा जागरूक प्रयत्न

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 31/05/2026 :

एखाद्या राष्ट्राची उन्नती केवळ आर्थिक विकासाने होत नाही, तर नागरिकांच्या नैतिक आणि मानसिक विकासानेच होते. संपत्ती वाढली म्हणजे देशाचा खूप विकास झाला, असे समजणे योग्य नाही. देश म्हणजे इमारती किंवा महामार्ग नसून देश म्हणजे देशातील नागरिक असतात. म्हणून देशातील नागरिकांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, त्याला खरा समजावे. त्यासाठी प्रामाणिक, जबाबदार आणि संयमी नागरिक घडवण्यासाठी सम्यक व्यायाम अत्यंत आवश्यक आहे. भ्रष्टाचार, हिंसा, गुन्हेगारी आणि असहिष्णुता कमी करण्यासाठी कायद्याबरोबरच मानसिक परिवर्तन आवश्यक असते. बुद्धांचा सम्यक व्यायाम हा अंतर्मन बदलण्याचा मार्ग आहे.    

आजचा माणूस धकाधकीच्या जीवनात जगतो, त्यामुळे अंतर्मनाने अधिक गॉधळलेला आहे. ताणतणाव, स्पर्धा, नैराश्य, असुरक्षितता, हिंसा, व्यसनाधीनता यांसारख्या समस्या वाढत आहेत. त्यामुळे त्याला उच्च, निम्न रक्तदाब, शुगर, जीव घाबरणे, अचानक दरदरून घाम येणे, अचानक छातीत दुखणे यासारख्या आजारांना सामोरे जावे लागते. यातून सुटका करून घेण्यासाठी सम्यक व्यायामाचे महत्त्व अधिक आहे. आपले शरीर मजबूत होण्याकरिता, बळकट होण्याकरिता, धष्टपुष्ट होण्याकरिता आपण शरीराचा व्यायाम करतो मग आपले मन बळकट होण्याकरिता, धष्टपुष्ट होण्याकरिता, मजबूत होण्याकरिता आपल्याला मनाचा व्यायाम करायला नको का? ज्याप्रमाणे शारीरिक व्यायामामुळे आपले बळ वाढते त्याचप्रमाणे मनाचा व्यायाम केला तर मानसिक बळ वाढते. हा मनाचा व्यायाम करायला तथागत बुद्धांनी शिकविले. त्यांनी मनाला सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. म्हणूनच त्यांनी सम्यक व्यायामाला आर्य अष्टांगिक मार्गात महत्वाचे स्थान दिलेले आहे.  

मानसिक आरोग्य हा आज जागतिक चिंतेचा विषय बनला आहे. नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवून सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे हे सम्यक व्यायामाचे मुख्य कार्य आहे. ध्यान, सजगता आणि स्वनियंत्रण यांच्या मदतीने मन शांत राहते. गौतम बुद्धांनी मानवाच्या दुःख मुक्तीसाठी सांगितलेला आर्य अष्टांगिक मार्ग हा केवळ धार्मिक मार्ग नव्हे तर व्यावहारिक जीवनाचा मार्ग आहे. या मार्गातील आठ अंगांपैकी सम्यक व्यायाम हे अत्यंत महत्त्वाचे अंग मानले जाते. पाली भाषेत याला सम्मा वायाम असे म्हणतात. येथे व्यायाम म्हणजे केवळ शारीरिक कसरत नसून मन, विचार, भावना आणि आचरण यांना योग्य दिशेने नेण्यासाठी केलेला सातत्यपूर्ण प्रयत्न होय. थोडक्यात व्यायाम म्हणजे सहजगतापूर्वक केलेले परिश्रम, प्रयत्न, कार्य म्हणजे सम्यक व्यायाम होय.    

आजच्या धकाधकीच्या, स्पर्धात्मक आणि तणावपूर्ण जीवनात सम्यक व्यायाम ही संकल्पना अधिकच महत्त्वाची ठरते. कारण आज माणूस बाह्य प्रगती करत असताना अंतर्मनाने तो अस्वस्थ, असंतुलित आणि असुरक्षित होत चालला आहे. अशा वेळी बुद्धांनी सांगितलेला योग्य परिश्रमाचा, प्रयत्नांचा मार्ग माणसाला मानसिक शांती, नैतिकता आणि संतुलन प्राप्त करून देतो.    

दुसऱ्या अर्थाने सम्यक व्यायाम म्हणजे काय? हे आपण थोडक्यात पाहू सम्यक व्यायाम म्हणजे वाईट प्रवृत्तींपासून किंवा वाईट विचारापासून दूर राहून चांगल्या प्रवृत्तींची किंवा चांगल्या विचारांची वाढ करण्यासाठी केलेला सजग, जागरूक आणि सातत्यपूर्ण प्रयत्न होय. बुद्धांच्या शिकवणीनुसार मनुष्याच्या दुःखाचे मूळ त्याच्या मनात आहे. लोभ, द्वेष, मत्सर, क्रोध, मोह, अहंकार यांसारख्या अनेक विकारांमुळे मनुष्याचे मन अस्थिर झालेले आहे आणि त्यामुळेच दुःख निर्माण होते. या विकारांवर नियंत्रण मिळवून सद्‌गुणांचा विकास करणे म्हणजेच सम्यक व्यायाम होय, सम्यक व्यायामुळे मन शुद्ध होते, चित्त शुद्ध होते. चित्त शुद्ध करणे हीच बुद्धाची शिकवण आहे. बुद्धांनी मनावर खूप अभ्यास केला आहे. म्हणूनच त्यांना मानसोपचार तज्ञ मानले जाते. मन शुद्ध ठेवण्यावर तथागत बुद्धांनी फार जोर दिलेला आहे. बौद्ध तत्त्वज्ञानानुसार सम्यक व्यायामाचे चार प्रमुख भाग सांगितले आहेत. हे चार प्रयत्न मन शुद्ध करण्यासाठी आवश्यक आहेत.

१) वाईट विचार उत्पन्न होऊ न देणे :

आपल्या मनात काहीनाकाही विचार सतत सुरू असतात. ते विचार कधी वाईट असतात तर कधी चांगले असतात. चांगले विचार मनात असले तर ठीक आहे पण आपल्या मनात वाईट, हिंसक, लोभी किंवा द्वेषपूर्ण विचार असतील तर ते निर्माण होऊ नयेत यासाठी जागरूक राहणे हा पहिला प्रयत्न आहे. उदाहरणार्थ, दुसऱ्याला शिव्या द्यायच्या असतील, दुसऱ्यासोबत भांडण करायचे असेल, कोणाचे मन दुखवायचे फसवायचे असेल तर तसे विचार प्रथम आपल्या मनात निर्माण होतात. हे विचार आपल्या मनात सुरू होण्यापूर्वीच ते थांबवणे आवश्यक आहेत. मुलगा अचानक आपल्या वडिलांना शाळेची, कॉलेजची फी भरायला मागतो, परंतु वडिलांकडे पैसे नसतात, अशा वेळी वडील मुलावर एकदम रागावतात. परंतु रागावल्यामुळे प्रश्न सुटत नाही. त्यासाठी मनाला शांत करणे फारच आवश्यक असत. आज आपण बघतो की, सोशल मीडियाच्या युगात अश्लील फोटो काढून व्हायरल केले जातात, दुसऱ्याच्या खात्यातून पैसे काढून लुबाडले जाते, दुसऱ्याचे एटीएम चोरून घेतले जाते, खोटेपणा सर्वत्र दिसून येतो, अशा वातावरणात मनाला विवेकाची दिशा देणे, मनाला शांत ठेवणे, हीच सम्यक व्यायामाची सुरुवात आहे.

२) निर्माण झालेले वाईट विचार दूर करणे :

कधी कधी नकळत चुकीचे विचार आपल्या मनात येत असतात. ते विचार आपल्या मनात खूप वेळ टिकून असतात. आपण एकच विचार मनात घेऊन बसतो. एखादा आपल्याला उद्धट बोलला असेल तर आपण तोच विचार मनात करीत असतो. ठीक आहे. बोलला तर बोलला, असे म्हणून ते विचार सोडून दिले पाहिजेत. त्या वाईट विचारावर टिकून न राहता त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे दुसऱ्या प्रकारचा सम्यक व्यायाम आहे. जर आपल्याला एखाद्याचा राग आला तर ते आपल्याला समजले पाहिजे की मला राग आला आहे. मग त्यावर आपण शांतता स्वीकारली पाहिजे. आपल्या मनात मत्सर निर्माण झाला तर समाधानाची भावना वाढविली पाहिजे, द्वेष निर्माण झाला तर मैत्रीभाव निर्माण करणे ही मानसिक साधना आहे. हा मनाचा सम्यक व्यायाम आहे. जर एकच विचार मनात खूप वेळ राहिला तर बीपी, शुगर, मायग्रेनसारखे विकार निर्माण होतात. म्हणून असे द्वेषयुक्त विचार लगेच मनातून काढून टाकले पाहिजे व शांत झाले पाहिजे.

३) चांगले विचार निर्माण करणे पहिला व्यायाम : मनात वाईट विचार उत्पन्न न होऊ देणे, दुसरा व्यायाम म्हणजे वाईट विचार मनात आले तर ते काढून टाकणे आणि त्यापुढील तिसरा व्यायाम प्रकार म्हणजे आपल्या मनात वाईट विचाराऐवजी चांगले विचार निर्माण करणे, हा आहे. कारण आपले मन कधीच रिकामे राहत नाही. काहीना काही विचार मनात सुरू असतात. त्यामुळे वाईट विचार दूर केल्यानंतर चांगले विचार निर्माण करणे आवश्यक असते. करुणा, मैत्री, प्रामाणिकपणा, सहकार्य, संयम, प्रेम, दया यांसारख्या गुणांचा विकास करणे हा सम्यक व्यायामाचा तिसरा भाग आहे. 

बुद्धांनी बहुजन हिताय, बहुजन सुखाय असा संदेश दिलेला आहे. समाजाच्या कल्याणाचा विचार मनात निर्माण करणे म्हणजेच सम्यक प्रयत्न होय. त्यालाच सम्यक व्यायाम असे म्हणतात. म्हणून आपल्या मनात सदैव चांगलेच विचार निर्माण झाले पाहिजेत. मनात जर कुशल विचार निर्माण झाले तर शुद्ध कृती निर्माण होते. शुद्ध कर्माचे शुद्ध फळ आपल्याला मिळते.

४) चांगले विचार टिकवून ठेवणे :

एकदा सगुण निर्माण झाले तरी ते कायम टिकवून ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे. क्षणिक उत्साहापेक्षा सातत्यपूर्ण आचरण अधिक महत्त्वाचे असते. एखादी व्यक्ती काही दिवस शांत आणि संयमी राहते; पण संकट आल्यावर पुन्हा क्रोधी बनते. यावर उपाय म्हणजे आपण सतत आपले स्वपरीक्षण केले पाहिजे आणि सजग राहिलो पाहिजे. चांगल्या विचारांना आपल्या दैनंदिन जीवनात उतरविले पाहिजे.   

समाजात होणाऱ्या संघर्षाचे कारण, जातीय दंगलीचे कारण आणि धार्मिक तणावाचे कारण यांचे मूळ बहुतेक वेळा चुकीच्या विचारांत असते किंवा द्वेषात असते. जर प्रत्येक व्यक्तीने आपल्या मनातील द्वेष काढून टाकला आणि मैत्रीभाव वाढविला तर समाजात शांतता निर्माण व्हायला वेळ लागत नाही. विद्यार्थी जीवनात एकाग्रता, सातत्य, शिस्त आवश्यक असते. मोबाईल, इंटरनेट आणि मनोरंजनाच्या अतिरेकामुळे विद्यार्थ्यांची मने विचलित होत आहेत. लहान लहान मुले मोबाईल पाहिल्याशिवाय जेवण करीत नाहीत. आपण म्हटले तर त्यांचे उत्तर असते, आमच्या मुलाला का उपाशी ठेवावे? एवढी मुले लहानपणापासून मोबाईलच्या आहारी जात आहेत, व्यसनाधीन होत आहेत. अशा वेळी सम्यक व्यायाम विद्यार्थ्यांना योग्य सवयी लावतो म्हणून विद्यार्थ्यांनी सम्यक व्यायामाचा अभ्यास केला पाहिजे. दारू, तंबाखू, अमली पदार्थ, ऑनलाइन व्यसन यांसारख्या गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे. त्यासाठी आपले मन आपल्या ताब्यात असले पाहिजे. मानसिक व्यायाम केला पाहिजे. त्यामुळे मनोबल वाढते. सम्यक व्यायाम व्यक्तीला संयम शिकवतो.    

मानवी जीवन सुखी बनविण्याच्या साधनेत ध्यानाला महत्त्वाचे स्थान आहे. परंतु ध्यान म्हणजे केवळ डोळे मिटून बसणे नव्हे तर मनावर योग्य प्रयत्नपूर्वक नियंत्रण ठेवणे हे ध्यानाचे मूळ आहे. विपश्यना साधनेत श्वास, भावना आणि विचार यांचे निरीक्षण केले जाते. मनात वाईट विचार आले तरी त्यांच्याशी संघर्ष न करता त्यांना ओळखून सोडून दिले जाते. ही सम्यक व्यायामाची प्रक्रिया आहे. तथागत बुद्धांनी अती भोग आणि अती तपश्चर्या हे दोन्ही टोकाचे मार्ग नाकारले. त्यांनी मध्यम मार्ग सांगितला. सम्यक व्यायाम हा मध्यम मार्गाचा एक भाग आहे. अती कठोरता किंवा पूर्ण निष्क्रियता याऐवजी संतुलित प्रयत्न करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी रात्रंदिवस जागरण करणे हे अतिरेक आहे आणि अभ्यास न करणे हेही चुकीचे आहे. योग्य प्रमाणात सातत्यपूर्ण प्रयत्न करणे, अभ्यास करणे म्हणजे सम्यक व्यायाम किंवा अभ्यास होय.  

आर्य अष्टांगिक मार्गातील सम्यक व्यायाम हे केवळ धार्मिक तत्त्वज्ञान नसून जीवन जगण्याची कला आहे. योग्य विचार, योग्य प्रयत्न आणि योग्य आचरण यांच्या साहाय्याने मनुष्य स्वतःचे आणि समाजाचे जीवन अधिक सुंदर बनवू शकतो. आजच्या अस्थिर आणि तणावग्रस्त काळात बुद्धांचा हा संदेश अत्यंत उपयुक्त ठरतो. वाईट प्रवृत्तींपासून दूर राहून सद्‌गुणांचा विकास करण्यासाठी सतत जागरूक राहणे, हेच सम्यक व्यायामाचे सारआहे. मन जिंकले तर जग जिंकले असे म्हटले जाते. बुद्धांनी सांगितलेला सम्यक व्यायाम हा मन जिंकण्याचा आणि जीवन समृद्ध करण्याचा मार्ग आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात या बुद्धतत्त्वाचा स्वीकार करणे फार आवश्यक आहे. या सम्यक व्यायामुळे प्रत्येक व्यक्तीचे जीवन सुखी होते कारण 

*सम्यक व्यायाम : जीवनाला योग्य दिशा देणारा जागरूक प्रयत्न आहे.

प्रा. डॉ. पुरुषोत्तम उपर्वट

मो.९८५०२८११५०

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या