युद्धाच्या झळा बांधापर्यंत

 युद्धाच्या झळा बांधापर्यंत

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत  नायकुडे 

अकलूज दिनांक 04/03/2026 :

अमेरिका-इस्त्रायल आणि इराण युद्धाचे चटके आता पश्चिम आशियाबरोबरच जगला बसताना दिसून येत आहेत. मध्यपूर्वेतील या विनाशकारी तणावाचे भारतासारख्या कृषिप्रधान देशाच्या बांधापर्यंत परिणाम जाणवू लागले आहेत. हे युद्ध ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार दीर्घकाळ चालले तर या संघर्षाशी संबंध नसणारे देश या युद्धात आपोआप ओढले जाऊ शकतात. तिसर्‍या महायुद्धासारखी परस्थिती निर्माण होऊ शकते. या युद्धाला तोंड फुटून चारच दिवस झाले असताना त्याची झळ आता शेतमालाल पर्यायाने शेतकरी व व्यापार्‍यांना बसताना दिसत आहे. दुबईमार्गे आखाती देशांमध्ये नाशिकचा कांदा निर्यात होतो. परंतु युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबई येथील मार्केट पूर्णपणे बंद झाले आहे. त्यामुळे कांद्याची निर्यात थांबली आहे. मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट (जेएनपीटी) बंदरावर नाशिक आणि महाराष्ट्रातील दीडशेहून अधिक कांद्याने भरलेले कंटेनर्स निर्यातीच्या प्रतीक्षेत आहेत. दुबई येथे माल स्वीकारला जात नसल्याने हजारो टन कांदा कंटेनरमध्ये अडकून पडण्याची शक्यता आहे. कांदा निर्यात थांबल्याने देशांतर्गत कांद्याचे भाव पुन्हा कोसळण्याची शयता आहे. हा कांदा कंटेनरमध्ये दीर्घकाळ पडून राहिल्यास शेतकर्‍यांवर पुन्हा शिमगा करण्याची वेळ येऊ शकते. एकट्या नाशिकचा ५४०० टन कांदा निर्यातीच्या प्रतीक्षेत आहे. सरकारने यावर तत्काळ उपाययोजना न केल्यास शेतकरी संघटनेने राज्यव्यापी चक्का जामचा इशारा दिला आहे. रमजानच्या महिन्यात भारतातील द्राक्षांना पश्चिम आशियातून मोठी मागणी असते. त्यामुळे द्राक्ष निर्यातीवरदेखील परिणाम होणार आहे. यावर्षी द्राक्षाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकर्‍यांना आपली आर्थिक विवंचनेतून सुटका होईल असे वाटत असताना त्यांचा हिरमोड होताना दिसत आहे. जळगाव जिल्ह्यामधून पश्चिम आशियात बारा कंटेनर्सद्वारे केळी आखाती देशात निर्यात केली जात आहेत. ती निर्यातदेखील आता थांबली आहे. युद्धापूर्वी केळीला २५०० रुपये प्रतिक्विंटल भाव होता, आता तो १५०० रुपयांवर आला आहे. इराणमध्ये भारतातील बासमती तांदळाला मोठी मागणी आहे. युद्धामुळे पंजाब आणि हरयाणातील बासमती उत्पादक शेतकर्‍यांना याचा मोठा फटका बसला आहे. बासमती तांदळाचा ७,१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर ५,९०० प्रतिक्विंटलपर्यंत घसरला आहे. शेतमाल घेऊन गेलेले महाराष्ट्रातील ३७० कंटेनर्स सध्या दुबईमध्ये अडकले आहेत. यात कांदा, मका, मिरची, टोमॅटो या नाशवंत मालांचा समावेश आहे. इराणमधून भारतात सुकामेवा, खजूर, काजू, बदाम, पिस्ता आयात केला जातो. युद्धामुळे आयात होणार्‍या सुकामेव्याच्या किमतीत मुंबईतील क्रॉफर्ड आणि वाशी मार्केटमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. युद्धापूर्वी इराणी पिस्ता १६५० रुपये प्रतिकिलो होता तो २४०० रुपयांवर पोहोचला आहे. मामरा बदाम १८०० रुपयांवरून २८०० रुपये प्रतिकिलो झाला आहे. इराण हा रासायनिक खतांचा मोठा उत्पादक देश असल्याने खतांच्या किमतीतदेखील ३० ते ४० टक्के वाढ होण्याची शयता आहे. भारताचा पश्चिम आशियाशी होणारा मोठा व्यापार हा हॉर्मुजच्या सामुद्रधुनीमार्गे होतो. इराणने ही सामुद्रधुनी बंद केली आहे. परिणामी भारताचा जवळपास ५० टक्के व्यापार प्रभावित होण्याची शयता आहे. तसेच गॅस व पेट्रोलियम पदार्थांचा आयातीवर परिणाम होऊ शकतो. युद्ध लांबल्यास पेट्रोल आणि डिझेलची गरज भागवण्यासाठी भारताला रशियासारखे नवे पर्याय शोधावे लागतील. भारताला प्रतिबॅलर ८० रुपये डॉलरनी मिळणार्‍या कच्च्या तेलाचे भाव शंभर रुपये प्रतिडॉलरपर्यंत गेले आहेत. इराणच्या हल्ल्यानंतर कतार एनर्जी कंपनीने एलएनजीचे उत्पादन थांबवले आहे. कतार जगातील एलएनजी उत्पादन करणारा पाचवा देश आहे. त्यांनीच उत्पादन थांबवल्याने गॅसच्या दरात वाढ झाली आहे. भारत आखाती देशातून ८० ते ८५ टक्के एलपीजीची आयात करतो. भारताकडे कच्च्या तेलाप्रमाणे गॅसचा राखीव साठा नाही. सध्या भारत ६० टक्के एलएनजी होर्मुझच्या सामुद्रधुनीमार्गे मागवतो. यामुळे एलपीजी आणि एलएनजीसाठी भारताला नवे पर्याय शोधावे लागतील. भारताकडे सध्या तीन महिने पुरेल एवढा तेलाचा साठा आहे. या युद्धामुळे सोने-चांदीचे दरदेखील वाढले आहेत. शेअर बाजारामध्ये रोज पडझड सुरू आहे. युद्ध संपेपर्यंत आणि त्यानंतर काही महिने ही स्थिती पूर्वपदावर येण्यास वेळ लागणार आहे. परदेशात अडकलेल्या नागरिकांबरोबरच आखाती देशात अडकलेल्या शेतमालाबाबत तसेच गॅस, तेल आयातीबाबत भारताला प्रभावी उपाय योजावे लागणार आहेत.

चंद्रशेखर शिंपी

वृत्त संपादक दै. देशदूत 

9689535738

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या