माळशिरस तालुक्याच्या विकासासाठी अर्थसंकल्पात ९० कोटीहून अधिक निधीची तरतूद - आमदार रणजितसिंह मोहिते पाटील
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 08/03/2026 :
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पात माळशिरस तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी रस्ते, पूल,तलाठी कार्यालये,न्यायालय इमारत,दुय्यम निबंधक कार्यालय,शासकीय विश्रामगृह तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बंधाऱ्यांच्या दुरुस्ती आदी विविध विकासकामांसाठी ९० कोटी रुपयांहून अधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे.या निधीमुळे तालुक्यातील पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळणार असून नागरिकांना अधिक चांगल्या सेवा उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी दिली.
माळशिरस तालुक्यातील अनेक रस्ते दुरुस्ती व पूल बांधणीसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.या कामांमुळे ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित आणि सोयीची होणार आहे.तसेच महसूल प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी नवीन तलाठी कार्यालयांच्या इमारती उभारण्यास निधीची तरतूद करण्यात आली आहे. माळशिरस सत्र न्यायालयातील न्यायाधीशांच्या निवासस्थान बांधण्यासाठी निधी देण्यात आला असून नागरिकांना आवश्यक कागदपत्रे आणि व्यवहार सुलभपणे करता यावेत यासाठी अकलूज दुय्यम निबंधक कार्यालयासाठीही तरतूद करण्यात आली आहे.त्याचबरोबर सरकारी अधिकारी आणि नागरिकांच्या सोयीसाठी माळशिरस व पिलीव येथे शासकीय विश्रामगृह उभारणीसाठीही निधी मंजूर करण्यात आला आहे.मागील काळात अतिवृष्टीमुळे गणेशगांव येथील को.प. बंधाऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.त्या बंधाऱ्यांच्या दुरुस्ती आणि मजबुतीकरणासाठी देखील निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.यामुळे शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होणार आहे.
तालुक्याच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे हा निधी मंजूर झाला असल्याचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले.या निधीमुळे माळशिरस तालुक्यातील पायाभूत सुविधा अधिक मजबूत होऊन नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठा सकारात्मक बदल घडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त करून माळशिरस तालुक्याच्या विकासासाठी सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे,सुनेत्राताई पवार यांचे तसेच महायुती सरकारचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आभार मानले आहेत.

0 टिप्पण्या