"आपल्या वर्तनातूनच खरा धर्म दिसून येतो. प्रत्येकाने आपल्या जीवनात संयम आणि सहनशीलता ठेवली पाहिजे.”- अनंतलाल दोशी

 

"आपल्या वर्तनातूनच खरा धर्म दिसून येतो. प्रत्येकाने आपल्या जीवनात संयम आणि सहनशीलता ठेवली पाहिजे.”- अनंतलाल  दोशी

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 31/03/2026 :  सत्य, अहिंसा आणि अपरिग्रह ही केवळ तत्त्वे नसून ती जीवन जगण्याची दिशा आहे. महावीरांनी दिलेला संदेश आजच्या काळात अधिक महत्त्वाचा आहे. मन शुद्ध असेल तर समाज आपोआप सुदृढ होतो. "आपल्या वर्तनातूनच खरा धर्म दिसून येतो. प्रत्येकाने आपल्या जीवनात संयम आणि सहनशीलता ठेवली पाहिजे.” असे मौलिक विचार रत्नतय परिवाराचे संस्थापक अनंतलाल  रतनचंद दोशी यांनी व्यक्त केले. रत्नत्रय शैक्षणिक संकुल, मांडवे (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथे भगवान वर्धमान महावीर यांची २६२५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी  ते मार्गदर्शनपर बोलत होते. तत्पूर्वी मान्यवरांच्या शुभहस्ते भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सत्य, अहिंसा, प्रामाणिकपणा आणि नैतिक मूल्यांची जाणीव निर्माण करणे हा होता. महावीरांच्या विचारांद्वारे विद्यार्थ्यांना योग्य जीवनमार्गाची प्रेरणा देणे, हा या कार्यक्रमामागील हेतू होता. 

प्रमुख पाहुणे प्रशांत सरूडकर म्हणाले, “भगवान महावीर हे तल्लख बुद्धीचे आणि विचारशील व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी सांगितलेली सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह ही पंचतत्त्वे आजच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक आहेत. स्पर्धेच्या युगातही माणुसकी जपणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकातील ज्ञान न घेता जीवनमूल्येही आत्मसात केली पाहिजेत. योग्य विचार आणि चांगले आचरण यामुळेच खरे यश मिळते.”

रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचे सचिव  प्रमोद अनंतलाल दोशी यांनी विद्यार्थ्यांना मौलिक सल्ला देताना सांगितले, “खरा श्रीमंत तोच जो मनाने आणि बुद्धीने समृद्ध आहे. जीवनात प्रामाणिकपणा आणि सकारात्मक विचार ठेवणे आवश्यक आहे.”

रत्नत्रय प्रि स्कूल व अकॅडमी दहीगाव चे मुख्याध्यापक  सतीश हांगे म्हणाले की “महावीरांचे विचार आपल्या दैनंदिन जीवनात उतरवले तरच त्यांची जयंती साजरी करण्याला खरा अर्थ प्राप्त होईल. विद्यार्थ्यांनी चांगले संस्कार अंगीकारावेत.”

या प्रसंगी सदाशिवनगरचे सरपंच वीरकुमार अनंतलाल दोशी, देविदास ढोपे, अजय गांधी, अजित दोशी, श्रेणिक दोशी, सनतकुमार दोशी, संजय वाघमोडे, ज्ञानेश राऊत, रामदास गोफणे, सुरेश धाईंजे, तानाजी गोरे, आलोक गांधी तसेच सीबीएससी स्कूलच्या चेअरपर्सन सौ. पूनम दोशी, भाग्यश्री दोशी, निधी गांधी, निकिता दोशी, पर्वती जाधव,  उपमुख्यध्यापक माने, पर्यवेक्षक  पठाण, सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दुधाळ  यांनी केले, तर आभार  शेंडे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या