सोलापूरच्या शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा; आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विधानमंडळात मांडला मुद्दा

 

सोलापूरच्या शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा; आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विधानमंडळात मांडला मुद्दा 

वृत्त एकसत्ता न्यूज 

मुंबई : सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा भरूनही अनेकांना अद्याप नुकसान भरपाई मिळत नसल्याचा गंभीर प्रश्न आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विधानमंडळात उपस्थित करून पीक विम्याच्या नुकसानभरपाईस होत असलेल्या विलंबावर लक्ष वेधले.

खरीप हंगाम २०२५ मध्ये सोलापूर जिल्ह्यात सुमारे ३ लाख ३२ हजार ३११ शेतकऱ्यांनी सुमारे २ लाख ५१ हजार हेक्टर क्षेत्रासाठी पीक विमा घेतला आहे. मात्र अतिवृष्टी, पूर, पाणी साचणे तसेच पिके वाहून जाणे यामुळे नुकसान झालेल्या अनेक शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळाली नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून होत असल्याचे आमदार मोहिते पाटील यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

यावर उत्तर देताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील निकषांनुसार पीक कापणी प्रयोगावर आधारित उत्पादन घट लक्षात घेऊन नुकसानभरपाई दिली जाते. सोलापूर जिल्ह्यात खरीप २०२५ हंगामात ३.३२ लाख विमा अर्जदार शेतकऱ्यांनी सुमारे २.५१ लाख हेक्टर क्षेत्रासाठी विमा घेतला असून केंद्र व राज्य शासनाकडून सुमारे १५१.१७ कोटी रुपये विमा हप्ता भारतीय कृषी विमा कंपनीला उपलब्ध करून देण्यात आला आहे. सध्या योजनेंतर्गत पीक उत्पादनाची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू असून उत्पादनातील घट लक्षात घेऊन नुकसानभरपाई दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान,सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष झालेल्या नुकसानाच्या आधारे न्याय मिळावा आणि विमा कंपन्यांनी जबाबदारीने नुकसानभरपाई द्यावी यासाठी शासनाने ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सभागृहात केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या