पॅलेट इंडस्ट्रीत भारताने आत्मनिर्भर होण्याची गरज
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 16/03/2026 :
अमेरिका, इस्राईल, आणि इराण यांच्यातील युद्ध, तीन देशांचे आपसातील युद्ध नसून जगावर परिणाम करणारे ठरले आहे. जागतिक अर्थकारण सध्या या युद्धाभोवती फिरताना दिसत आहे.
जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा तऱ्हेने दोन-तीन देशांचे युद्ध हे जागतिक अर्थकारणावर विपरीत परिणाम करणारे ठरत आहे याचे प्रमुख कारण, जगातील सर्वच देश या ना त्या कारणासाठी, निरनिराळ्या देशांवर अवलंबून आहेत. आखाती देश जगाला तेल पुरवतात, काही देश इलेक्ट्रॉन वस्तू पाठवतात, भारतासारखे देश शेती प्रधान असल्याने इथून धान्य, फळ फळावळ, मांस, कापड वगैरे जगातील इतर देशांना पुरवले जाते या सर्वच व्यापारांवर खूप मोठे संकट आल्याने भारतातील फळ विक्री मंदावली आहे, त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना परकीय चलनात मिळणारा फायदा नाहीसा झाला आहे, तसेच अनेक बंदरात त्यांचे सामान अडकल्याने, तसेच फळे नाशिवंत असल्याने जागेवरच सडून खराब होण्याची स्थिती अनुभव उद्भवली आहे.
आखाती देशातून आपल्याला मिळणारे कच्चे तेल आणि गॅस मिळणे बंद झाल्याने स्थानिक पातळीवर गॅस पुरवठा खंडित होण्याच्या मार्गावर आलेला आहे. युद्ध अजून काही दिवस सुरु राहिल्यास, येणाऱ्या काही दिवसात कदाचित पंपावर पेट्रोल आणि डिझेल मिळणे कठीण होणार आहे.
भारतीय वृत्तवाहिन्यांवर गॅस टंचाईमुळे हॉटेल व्यवसायावर परिणाम झालेला नित्य दाखवण्यात येत आहे, अजून घरगुती गॅस मात्र विनाअडचण मिळत आहे पण तेही किती दिवस शक्य होईल हे सांगणे कठीण आहे. गॅस सिलेंडर मिळण्यासाठी 25 दिवसांचा वेळ सांगण्यात येत आहे.
आता आपण खरोखर आत्मनिर्भर होणे अत्यंत आवश्यक आहे. या युद्धांने आपल्याला एक चांगला धडा शिकवलेला आहे. इंधनासाठी इतर देशांवर अवलंबून राहणे आता आपल्याला सोडले पाहिजे यासाठी आपल्याजवळ विविध ऊर्जेचे जे स्त्रोत आहेत त्याचा योग्य विनियोग करणे आवश्यक आहे.
आजही भारतात पॅलेट इंडस्ट्री चांगले बस्तान बसवू शकली नाही, म्हणूनच कदाचित या युद्धामुळे निश्चितच आपले डोळे उघडतील. यापुढे मोठ्या प्रमाणात शेतातील कचऱ्यापासून पॅलेट बनवून त्याचा वापर हॉटेलमध्ये आणि इतर ठिकाणी इंधन म्हणून करता येऊ शकतो. धूर विरहित चुली बाजारात अल्प किमतीला मिळतात त्यात इंधन म्हणून पॅलेट वापरून हॉटेल व्यवसायीक, बेकरी मालक, आपला व्यवसाय व्यवस्थित चालू ठेवू शकतात. आजही मोठ्या प्रमाणात भारतीय शेतकरी, शेता कचरा जाळून टाकतात, आणि अमूल्य अक्षय ऊर्जा विनाउपयोग नष्ट होत आहे.
करोना काळात यूपीआय पेमेंट पद्धत अगदी 99% लोकांना माहीत नव्हती, मात्र दोन-तीन महिन्यातच सर्व लोक यूपीआय पेमेंट मध्ये पारंगत होऊन प्रत्यक्ष चलनाला हात न लावता व्यवहार पूर्ण करू लागले, हे केवळ कोरोना या रोगामुळेच शक्य झाले कदाचित अशीच शिकवण हे युद्ध आपल्याला करून देत असेल असे नाही का वाटत?
आत्मनिर्भरतेकडे एक मजबूत पाऊल उचलूया, पॅलेट वापरून हॉटेल व्यवसायिक, बेकरी व्यवसायीक, अगदी समोसा, वडापाव बनवणारे पुन्हा आपला व्यवसाय जोमाने करू शकतील अशी मी आशा बाळगतो. आतातरी सुजाण होऊया, पॅलेटरुपी अक्षय ऊर्जेला आपलंस करूया.
✍️विजय लिमये (9326040204)


0 टिप्पण्या