रामचंद्र कह गये सिया से, ऐसा कलयुग आयेगा !
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 08/03/2026 :
श्रीकृष्णाच्या निधनानंतर कलियुगाचा प्रभाव सुरु झाला असता परीक्षित राजाने धर्म आणि पृथ्वीला पिडा देणाऱ्या कलीला रोखले. कलीला जुगार, मद्यपान, वेश्या व्यवसाय, हत्या आणि सोने या पाच ठिकाणी राहण्याची परवानगी दिली कलियुगात दुष्टपणा, अभिमानाचा त्याग करुन मी कर्ता नाही (अहंकार विरहित) हे जाणून कर्म केल्यास कलीचा मानवावर परिणाम होत नाही. असे मानले जाते की, कलीच्या प्रभावामुळेच परीक्षित राजाची बुद्धी फिरली आणि शमिक ऋषीच्या गळ्यात मृत साप टाकल्यामुळे त्यांना शृंगीने शाप दिला की, तुला सात दिवसांनी तक्षक साप दंश करुन मृत्यू येईल. तेव्हा सुखदेवांनी परीक्षित राजाला श्रीमद् भागवतातील ज्ञान सांगितले. "कलियुग केवल नाम अधारा, सुमर सुमर नर उतरहिं पारा" कलियुग अंतिम युग असून यात धर्म, नितीमत्ता, शारीरिक क्षमता चवथ्या भागाने कमी होते. या काळात अनाचार, खोटे बोलणे व हिंसेचे प्रमाण वाढते. तर केवळ भगवंताच्या नामस्मरणाने मुक्ती मिळते, हा भवसागर पार होतो. कलियुगातून वाचण्यासाठी श्रीकृष्ण म्हणतात, जेव्हा जेव्हा धर्माचे पतन होते तेव्हा मी अवतार घेतो. कलियुगात निस्वार्थ कर्म करणे, भक्ती योग, ज्ञानातून मुक्ती शक्य आहे.
रामचंद्र कह गये सिया से,
ऐसा कलयुग आयेगा |
हंस चुगेगा दाना-दुनका,
कौआ मोती खायेगा ||टेक||
एकदा श्री रामचंद्रानी सितेला समजावून सांगितले की, कलियुगात असा एक काळ येईल. जेव्हा मूल्यांमध्ये इतका उलटापालट होईल की, कावळ्या सारख्या माणसांना हंस सारख्या माणसापेक्षा जास्त महत्व दिले जाईल. म्हणजेच चांगल्या आणि वाईट व्यक्तीमधील फरक नष्ट होईल. योग्य व्यक्तीला फळ न मिळता अयोग्य व्यक्तीला यश मिळेल. भगवान विष्णू म्हणतात, कलियुगाची सुरुवात स्त्रीच्या केंसापासून होईल. स्त्री केंसाचा शृंगार करतात. कलियुगात स्त्री केंस कापायला सुरुवात करील.
सच्चाई भूखी सोएगी,
झूठ महल बनायेगा |
नेकी सिसकेगी कोने में,
पाप सरे आम मुस्कायेगा ||1||
सत्य बोलणाऱ्या आणि प्रामाणिक माणसाला अनेकदा गरिबी किंवा अडचणींचा सामना करावा लागतो तर खोटे बोलून आणि कपट करून जगणारे लोक श्रीमंत होतात. सुख सुविधा मिळवतात. कलियुगात अधर्म, पाप, अन्याय, अत्याचाराने भरलेले मानले जाते. जिथे माणुसकीचा ऱ्हास आणि स्वार्थ वाढतो, समाजात चुकीचे आचरण, भ्रष्टाचारामुळे पाप वाढत आहे. कलियुगात अधर्माच्या काळात चांगुलपणा, सज्जनता कोपऱ्यात लपून रडत बसेल. तिला कोणी विचारणार नाही आणि पाप, वाईट कृत्य उघडपणे, गर्वाने हसतील. कलियुगात सत्याची उपेक्षा होईल. तर पाप उघडपणे हसू लागेल. पाप करणाऱ्यांना मान, प्रतिष्ठा मिळेल.
ज्ञानी बैठा मौन रहेगा,
मूर्ख शोर मचायेगा |
धर्म खड़ा बाजार में बिकने,
अधर्म सिंहासन पायेगा ||2||
असा काळ येईल की, जेव्हा सत्य, नितीमत्ता (धर्म) बाजारात विकाऊ वस्तूप्रमाणे विकली जाईल आणि अन्याय, असत्य (अधर्म) सत्तेच्या सर्वोच सिंहासनावर बसेल. पाप, अन्याय, चुकीचे काम करणारे सत्तेत विराजमान होईल. त्यांना मान, प्रतिष्ठा मिळेल. खऱ्या आणि प्रामाणिक लोकांना समाजात कोणी कदर करणार नाही. खरोखरच ज्ञानी, समजदार किंवा शहाणा माणूस नेहमी शांत राहतो आणि गरजेनुसारच बोलतो तर अज्ञानी किंवा मूर्ख माणूस स्वतःला सिद्ध करण्यासाठी अनावश्यक बडेजाव आणि जास्त आवाज करतो. ज्याच्याकडे ज्ञान कमी असते, तो आपल्या उणिवा लपवण्यासाठी जास्त बडबड, भांडण करतो. राजा आणि त्यांची प्रजा रात्रदिवस एकमेकांशी भांडत राहतील. कायद्याचे पालन करण्यास नकार देतील.
अपने होंगे बेगाने,
पराया अपना बन जायेगा |
स्वार्थ की इस आँधी में,
प्रेम कही छिप जायेगा ||3||
कलियुगात स्वार्थ इतका वाढेल की आपले नातेवाईक परके होतील आणि परके लोक स्वार्थापोटी जवळचे बनतील. स्वार्थाच्या या वादळात प्रेम कुठेतरी लपून जाईल किंवा नष्ट होईल. आपले परके होतील आणि परके आपले होतील. स्वार्थाच्या या वादळात प्रेम कुठेतरी लुप्त होईल.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या मते कलियुग हा विपरीत बुद्धीचा आणि नैतिक अध:पतनाचा काळ असेल. यात खरा खोटा भेदभाव न समजणे, आत्मकेंद्री वृत्ती, निसर्ग कोपणे, मानवी संबंधात प्रेम कमी होऊन स्वार्थ वाढणे आणि आध्यात्मिक मूल्याकडे दुर्लक्ष होऊन केवळ बाह्य देखावा वाढणे असे स्वरुप कलियुगाचे असेल. महाराजांनी या काळात साधेपणा, भक्ती, खऱ्या मानवतेचा मार्ग सोडला नाही, तरच या काळाचा सामना करता येईल. "प्रेम भक्तीविण कलियुगात नाही साध्य काही" हे भजन कलियुगात ईश्वरी प्राप्तीसाठी केवळ निस्सीम प्रेम आणि भक्तीचा मार्ग असल्याचे सांगते. महाराज म्हणतात, "हरिनाम जपा मन लावूनिया, मग मोक्ष सुखा किती वेळ असे" या कलियुगात प्रेममय भक्ती, हरिनामच मोक्ष मिळविण्यासाठी पुरेसे आहे.
संत तुकाराम महाराज कलियुगाला अधर्माचे आणि दांभिकतेचे युग मानतात. कलियुगात लोक गुणीजनांना छळतील आणि समाजात सत्य-शुद्धतेचा अभाव असेल असे त्यांनी नमूद केले आहे. तरीही संकटाच्या या काळातही केवळ नामस्मरण हाच देवापर्यंत पोहोचण्याचा आणि उद्धाराचा एकमेव सोपा मार्ग आहे असा मौलिक संदेश तुकोबारायांनी दिला.
संत एकनाथ महाराज म्हणतात, कलियुगात धर्माचे आचरण कमी होऊन सत्तेचा आणि संपत्तीचा माज वाढेल. लोक सत्य विसरुन खोट्या मार्गांवर चालतील. दुष्ट अभिमान, मानवामानवात द्वेष, मत्सर, संघर्ष दिसून येईल. अनितीची भरभराट होईल. चांगल्या गुणाला महत्व नसेल तर कपटाचे महत्व वाढेल. या कठीण काळातही नामस्मरण हाच मुक्तीचा सोपा मार्ग आहे.
पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
श्री गुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन- 9970404180


0 टिप्पण्या