छत्रपती शिवरायांचे औरंगजेबास पत्र
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 20/02/2026 :
हे औरंगजेब बादशहा , अनेक वर्षापासून बोलायचे होते पण माझी व फुरसतीची दुश्मनीच आहे.निवांतपण असं कधी लाभलंच नाही.मानवी देहात होतो तेव्हाही नाही व मानवी देहाचे ,व्यवहाराचे बंधन सुटून उणीपुरी साडेतीनशे वर्षे लोटली आहेत तरीही फुरसत नाहीच.चहू बाजूंनी गनिमांनी वेढलेला भूप्रदेश व मनातून खच्ची झालेले मराठी मन उभं करताना वायुवेगाने धावपळ झाली.मानवी देहाची मर्यादा सांभाळून कमाल कार्य घडून आणताना मागे वळून पाहताना तमाम दुनियेला शिव चरित्र म्हणजे पराक्रमाचे चमत्कारिक , जादुई अवतरणं वाटतं.पण या यशामागची मानवी पराकाष्ठा मलाच माहीत आहे.आता आचंद्रसूर्यपावेतो आसेतूहिमाचल व समुद्रापलीकडे शिव नामाचा डंका ऐकताना मन भरून येतं आहे.
हे औरंगजेब बादशहा, माझा जन्मदिवस 19 फेब्रुवारी रोजी असतो अन् लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे वीस फेब्रुवारी रोजी तुझा मृत्युदिन असतो. हर हर महादेव,जय भवानी,जय शिवराय,जय जिजाऊ अशा गगनभेदी घोषणात तू कुठेही नसतोस .शिवनामाने पुलकित झालेल्या शरीरमनात तू असणं शक्यही नाही पण मी मात्र तुला विसरलो नाही.तुझ्या स्मरणदिनी थोडं बोलायचेच आहे.
हे औरंगजेब बादशहा, तू खरोखरीच भाग्यवान आहेस.आमचे थोरले महाराज शहाजीराजे ,मी स्वतः,आमचे पुत्र संभाजीराजे,राजारामराजे व माझा नातू शाहू अशा आमच्या भोसले कुळातल्या चार पिढ्यांना तू जवळून पाहिलंस.राजगादी प्राप्त करताना स्वकीयांच्या रक्ताचे पाट वाहून त्या रक्त धारेत पोहून तू तख्त हाशील केलेस.पण तरीही श्रद्धापूर्वक कुराण पठण व आल्लाहाची सेवा यांमुळे सारे गुन्हे माफ करून तुला अल्लाहाने लंबी उमर अदा केली.मोगल बादशाहीचा चॉंदतारा ऐन वैभवात असताना,पृथ्वीवर सर्व शक्तीमान तुझी राजवट असताना मराठेशाहीच्या मुलुखात तुझी वणवण भटकंती व्हावी ,तुझा मृत्यू दगडधोंड्याच्या प्रांतात व्हावा अन् तुझ्या मागेच मोगलशाही लयाला जावी.हे खरेतर प्रचंड विस्मयकारी आहे.तुझ्या नाशाची सूत्रे तुझ्याच कारभारात दडलेली होती.तुझ्या पणजोबाच्या काळात मोगल सत्ता चौदा सुभ्यात विस्तारलेली होती.आजोबा जहांगीर व वडील शहाजहान यांच्या काळातही मोगलाईची इंचभरही जमीन कमी न होता ती वाढतच राहिली.तुझ्या काळापर्यंत तर मोगल साम्राज्य 21 सुभ्यांचे झाले.काबुल कंदहार ते आसाम ,बंगाल ,गुजराथ, औरंगाबाद नगर पर्यंत तुझीच सत्ता.आदिलशाही व कुतुबशाही नामशेष करण्याचे श्रेय सुद्धा तुझेच.जिजाऊ शहाजीराजे यांच्या स्वप्नातील स्वराज्य साकारणारा मी मात्र तुला भीक घालत नव्हतो अन् इथेच आपल्यातील शत्रूत्वाची ठिणगी होती.लहाणपणी अगदी जेमतेम पंधरा सोळा वर्षांचा युवराज असताना तू मोकळ्या मैदानात हत्तीशी लढला होतास.शौर्य ,धीर संयम ,कुशल सेनापती यांबाबत तुझी प्रशंसा करायलाच हवी.पण त्याच वयात मी माझ्याच वयाची पोरं गोळा करत सह्याद्री गर्भात स्वराज्याचे बीज रोवत होतो.युवराज म्हणून तू अश्वारूढ होताना तुझ्या पदरी प्रचंड मोठा लवाजमा होता.भावांना,पुतण्यांना कंठस्नान घालून तू जेव्हा राजा झालास तेव्हा तू अक्षरशः अर्ध्या पृथ्वीचा मालक होतास.तब्बल साडेचौदा हजार मनसबदार तुझ्याकडे होते.घोडदळ,पायदळ फौज,अंकित राजे कितीतरी....
पण तरीही तुझा चौरंगी पराभव आमच्यात भूमीत घडला व माझ्याच राजकुटुंबाकडून घडला.तुझ्या आयुष्याची फलश्रुती प्रचंड गोंधळात व अपयशात घडली याचं वाईट वाटत नाही कारण ही आपत्ती तू स्वतःहून ओढून घेतली होतीस पण याची बीजे मात्र मीच रोवली होती.
तुला आठवत असेल माझा पुरता बीमोड करण्यासाठी तू मिर्झा राजे जयसिंगाला आमच्या स्वराज्यावर चाल करून पाठवलं होतंस. अनेक लढायांत विजयीश्री खेचून आणणारा हा मिर्झा राजे जयसिंग म्हणजे कमालीचा प्रामाणिक व बादशहाशी एकनिष्ठ माणुस.अफजलखान,सिद्धी अन् शाहिस्तेखानास आम्ही दिलेली शिकस्त जयसिंगाने चांगली अभ्यासली होती.त्यामुळे योग्य बांधणी करत त्याने चहू बाजूने स्वराज्य असं कोंडलं की आम्ही शेवटच्या घटकाच मोजाव्यात पण पुढचा दीर्घ विचार करत आम्ही सपशेल शरणागती पत्करली.बेल शिवाची आण वाहणारा ,खूप मोठी उमर रणांगणात घालवणारा हा म्हातारा स्वराज्य गिळूनच दिल्लीला परतणार होता.त्याचाच एक भाग म्हणून तहात आमचे किल्ले तर त्याने घेतलेच पण बाळ शंभूसह मलाही मृत्यूच्या जबड्यात आणून उभे केले.
हे औरंगजेब,तुझ्या मगरमीठीतून सुटण्यासाठी मी जी अकल्पित बुद्धी वापरली त्याचे मला आजही आश्चर्य वाटते.तुझ्या दाढेतून सुटका ही स्वराज्यासाठी गरूडझेप ठरली.मला जिवंत सोडून तू चूक केलीस असं तुला वाटतं असेल तर तू अजूनही चुकीचाच विचार करतो आहेस.कारण राजगडावरून आग्राकडे येतानाच माझ्या मनात तुझ्या कटकारस्थानाची कल्पना होतीच.मुगल दरबाराचे रिवाज ध्यानी न घेता ,मी थोडा वेगळाच वागलो.दरबाराची अदब पाळली नाही.असंही तुला व तुझ्या आश्रयींना वाटलं असेल पण दरबारी रीतीरिवाजाचा यासाठी मुलाहिजा ठेवला नव्हता की त्यातून मला तुझ्याकडे पराक्रम गहान टाकलेले आमचे राजपूत बांधव जागे करायचे होते.
आग्राहून निसटणं ही आमची गरूडझेप होतीच.तिथून पुढच्या दहा वर्षांत आमच्या स्वराज्याची घौडदौड कमाल वेगाने झाली.आग्रा भेटीत माझी सुटका ही तुझी चूक होती की माझा वरचष्मा होता या विषय आपण आजही पृथ्वीतलावरच्या इतिहास अभ्यासकांसाठी सोडू पण माझ्या शंभूरायाला अत्यंतिक वेदना देऊन ठार करणं.ही तुझी चूक होती .हे मी ठामपणे सांगतो.तुला नेमकं स्वराज्य मांडणीतलं सूत्र कळलं नाही म्हणून तुझी फसगत झाली. तीन चार पिढ्यांचा वारसा असलेली स्वधर्माची आदिलशाही व कुतुबशाही बुडविताना तुला वेळ लागला नाही पण कमी मनुष्यबळाचं स्वराज्य बुडविताना तू स्वतः पूर्णतः पैशानिशी व जीवानीशी बुडालास.याचं कारण इथं गवतालाही भाले फुटण्याचा विचार मी पेरला होता.संगमेश्वर ते तुळापूर या मार्गावर शंभूराजाच्या सांडलेल्या रक्ताने मराठी मन पेटून उठले.राजारामराजे व ताराराणी यांच्या पराक्रमाला तर तोड नाही.ही दोघंही इवली इवली पोर होती तेव्हा माझा देह पसारा आवरलेला होता.माझ्या पश्चात त्यांनी तुला नुसतं जेरीस आणलं असं नव्हं तर अक्षरशः लोळविले आहे.जन्म ते मृत्यू असं मला पन्नास वर्षांचे आयुष्य लाभले पण तुला तर यापेक्षा जास्त आयुष्य निव्वळ राजा म्हणून लाभलं.वैभवसंपन्न राजभोगाचा विरह तुझ्या भाळी मी लिहिला.
हे औरंगजेब बादशहा,मी नुसती गडकोटांची डागडुजी व उभारणी केली असे नव्हे तर मी रयतेसाठी उभा राहताना प्रत्येक माणुस एक गडकोट म्हणून आम्ही उभा केला.हाच अभेद्य मावळा मर्द गडी तुला पुरून उरला.
आम्ही स्वराज्यात असलो नसलो तरी ते रयतेचे राज्य होते म्हणून रयतेनेच ते तेव्हाही राखलं व आजही रयत शिव स्वराज्य राखते आहे.तब्बल सव्वीस वर्ष इथली रयत राजाविना व राजासह तुझ्याशी भिडली.
राज्याचे व राजांचे अमरत्व राजाने दिलेल्या ध्येयधोरणात असते.माझे अनेक पुतळे भूतलावर आहेत पण मला सर्वात जास्त पुतळा आवडतो तो म्हणजे आग्रा किल्ला समोरील पुतळा.जणू तुला कायमचा बंदी ठेवण्यासाठी मी आग्रा किल्ला मुख्य दाराकडे डोळे रोखून उभा आहे.
जेव्हा जेव्हा माझे नाव निघेल तेव्हा तेव्हा इथलं मराठी मन तुझीही आठवण काढेल कारण वर्तमान व भविष्याला आम्हाला हे ऐकवायचे आहे की मराठेशाहीचा कट्टर वैरी महाबलाढ्य होता अन् त्याला गाडूनच पुढच्या मराठा सरदारांनी काबुल अटकपर्यंत धडक मारली होती.
कचरू चांभारे
बीड 9421384434

0 टिप्पण्या