शंकरनगर-अकलूज येथे महाशिवरात्र यात्रेचे आयोजन
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे, अकलूज.
दिनांक 05/02/2026 : महाशिवरात्र यात्रा महोत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्ट, शंकरनगर-अकलूज यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी महाशिवरात्र यात्रेचे आयोजन बुधवार दिनांक ११/०२/२०२६ ते सोमवार दिनांक १६/०२/२०२६ या कालावधीमध्ये केले आहे. यामध्ये महाशिवरात्र यात्रा, कृषी व औद्योगिक प्रदर्शन, पीक प्रदर्शन व स्पर्धा, दुग्ध स्पर्धा, जनावरांचा बाजार तसेच जंगी कुस्त्यांच्या फडाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाशिवरात्र यात्रा महोत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांनी दिली.
यात्रा नियोजनामध्ये बुधवार दि.११/०२/२०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता यात्रा व प्रदर्शनाचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे शुभहस्ते व कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील, (संचालिका-स. म. शंकरराव मोहिते-पाटील स. सा. का. लि., शंकरनगर-अकलूज) तसेच इतर मान्यवरांचे उपस्थितीत संपन्न होणार आहे.
शनिवार १४/०२/२०२६ रोजी सकाळी १०.०० वा. पीक स्पर्धेमध्ये आलेल्या शेती मालाचे उत्कृष्ट नमुन्यांचे परीक्षकांकडून निरिक्षण व बक्षीसपात्र नमुन्यांची निवड तसेच दुपारी ४.०० वा. जातीवंत जनावरांची निवड होणार आहे.
रविवार दि.१५/०२/२०२६ रोजी पहाटे ५.३० वा. महाशिवरात्री निमित्त श्रीशिवपार्वती अभिषेक व महापूजा विश्वतेजसिंह रणजितसिंह मोहिते-पाटील(अध्यक्ष-ग्रीनफिंगर्स आयुर्वेदिक हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटर, शंकरनगर) व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. शिवांशिका विश्वतेजसिंह मोहिते-पाटील या उभयतांचे शुभहस्ते आयोजित केली आहे. सदर दिवशी सकाळी ६.३० ते ७.०० या वेळेत दुग्ध स्पर्धेचे आयोजन केले असून यात्रेमध्ये होणा-या सर्व स्पर्धेतील विजेत्याना बक्षीस वाटप करणेचा कार्यक्रम सदर दिवशी सायं. ५.०० वा. यात्रा ऑफिस समोर होणार आहे.
सोमवार दि.१६/०२/२०२६ रोजी दुपारी ३.०० वा. मल्लांच्या जंगी कुस्त्याच्या फडाचे उद्घाटन विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील(माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) व कार्याध्यक्ष मदनसिंह शंकरराव मोहिते-पाटील, तसेच चि. सयाजिराजे संग्रामसिंह मोहिते-पाटील(नगरसेवक नगरपरिषद, अकलूज) यांचे शुभहस्ते संपन्न होणार आहे.
महाशिवरात्र यात्रेमध्ये लहान मुलांकरिता खेळणी स्टॉल, विविध पाळणे, अल्पोपाहार व रसपाणगृह स्टॉल येणार असून यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात रेलचेल होणार असून यात्रा कालावधीमध्ये चोवीस तास पाणी, वीज, पर्यायी रस्ते तसेच आरोग्याच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व त्या सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.
तसेच रविवार दि.१५/०२/२०२६ रोजी रात्री ८.०० वा. यात्रा व पंचक्रोशीतील रसिक प्रेक्षकांकरिता मंगला बनसोडे लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी, पंचक्रोशीतील भाविकांनी व नागरिकांनी यात्रेचा व विविध प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


0 टिप्पण्या