शिवरायांची प्रगतीशील धोरणे आणि जलव्यवस्थापन स्वराज्याच्या समृद्धीचा पाया: डॉ. दत्तात्रय मगर
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 20/02/2026 :
छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ युद्धे जिंकली नाहीत, तर शेती, व्यापार आणि पायाभूत सुविधांना प्राधान्य देणारी प्रगतीशील धोरणे राबवून स्वराज्याला आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध केले. किल्ले, रस्ते आणि सिंचन व्यवस्थेवर त्यांनी दिलेला भर हा आधुनिक विकासाचा पाया ठरला, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास विश्लेषक डॉ. दत्तात्रय मगर यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवरत्न नॉलेज सिटी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा अकलूज, सिंहगर्जना ग्रुप, जाणीव मैत्री ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने खासदार धैर्यशील मोहिते-पाटील व सौ.शितलदेवी मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वैचारिक परिसंवाद व व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी आयोजित व्याख्यानात डॉ.मगर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विजयसिंह मोहिते-पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगच्या सभापती इशिता मोहिते-पाटील, व्याख्याते प्रा.सुहास उरवणे, डॉ.पांडुरंग नलवडे, प्रा.अनिल लोंढे, विक्रम वैद्य, डॉ.अमोल माने शेंडगे, अनिल जाधव, डॉ. विश्वनाथ आवड यांच्यासह इतिहासप्रेमी उपस्थित होते.
डॉ. मगर म्हणाले, "विभाजित भूमीत धार्मिक सहिष्णुतेचे राज्य स्थापन करणे हे महाराजांचे मोठे यश होते. त्यांनी मुघल आणि आदिलशाहीसारख्या बलाढ्य सत्तांविरुद्ध लढा देतानाच, परकीय आक्रमणांपासून सागरी सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी शक्तिशाली नौदलाची उभारणी केली. त्यांच्या लष्करी कौशल्याने आणि रणनीतीने रयतेच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण केली. शिवाजी महाराजांच्या राजवटीत, मराठा साम्राज्य आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या भरभराटीला आले. त्यांनी व्यापार, वाणिज्य आणि शेतीला चालना देण्यासाठी प्रगतीशील धोरणे राबवली, ज्यामुळे समृद्धी आणि विकासाचे वातावरण निर्माण झाले. किल्ले, रस्ते आणि सिंचन व्यवस्था बांधण्यासह पायाभूत सुविधांच्या विकासावर शिवाजी महाराजांचा भर असल्याने साम्राज्याची लवचिकता आणि बाह्य धोक्यांना तोंड देण्याची क्षमता आणखी वाढली."
डॉ.अनिल लोंढे म्हणाले, १८७० मध्ये महात्मा जोतिराव फुले यांनी शिवरायांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी शिवजयंतीची सुरुवात केली. आज हा एक राष्ट्रीय उत्सव बनला असून, तो समाजाला शौर्य आणि लवचिकतेचे महत्त्व पटवून देतो. महात्मा फुले हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.
प्रा.सुहास उरवणे म्हणाले, महात्मा बसवेश्वरांनी मंगळवेढा येथे “लोकशाही संसद म्हणजेच ‘अनुभव मंटपाची’ स्थापना केली. या अनुभव मंटपात सर्व धर्मातील लोक एकत्र येऊन सामाजिक अडचणींवर कशी मात करावी यावर चर्चा करण्याचे कार्य चालत असे. बसवण्णांनी समाजातील रूढीपरंपरा, वाईट चालीरीती यांना विरोध करून समाजाच्या हितकारक गोष्टींची अंमलबजावणी करणारी नवीन यंत्रणा तयार केली. बाराव्या शतकातील आदर्श प्रशासक ,समतेचे प्रणेते म्हणून महात्मा बसवेश्वरांना ओळखले जाते. सर्व प्रथम लोकशाही मूल्याची सुरूवात ही म.बसवेश्वरांनी 12 व्या शतकात अनूभव मंटपाच्या माध्यमातून केल्याचे वचनसाहित्यातून दिसून येते. एकूणच त्यांनी वचनसाहित्यात समता, मूल्य, न्याय, बंधूता, एकात्मता तसेच स्वातंत्र्य, अधिकार, नियंत्रण व शिस्त, सूशासन आणि प्रशासन आदी बाबींवर सखोल विवेचन केले आहेत. सद्यस्थितीत शासन व प्रशासनाला या विचारांचा अवलंब केल्यास निश्चितच देशात निर्माण होणारी विषमता, हिंसा, भेदभाव व जातीय राजकारण इ.समस्यावर आळा घालता येईल. परिणामतः चांगले सुशासन व प्रशासन व्यवस्था निर्माण होइल.
डॉ.विश्वनाथ आवड म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना लहानपणापासूनच अस्पृश्यतेचे दुःख होते. त्यांना केवळ जातीव्यवस्था आणि उच्च आणि नीच दर्जाच्या भेदभावाचा अनुभव आला नाही तर त्यामुळे त्यांना अनेक वेळा अपमानाचा सामना करावा लागला. त्यांनी आयुष्यभर या अन्यायाविरुद्ध लढा दिला. अस्पृश्यतेसारख्या अमानवी प्रथांपासून खालच्या जातींना मुक्त करणे आणि त्यांना समाजात समान हक्क आणि आदर प्रदान करणे हे त्यांचे उद्दिष्ट होते.
विक्रम वैद्य म्हणाले, गड-किल्ले संवर्धन ही काळाची गरज आहे. आपण जंगल पाहायला नक्की जातो, पण दुर्दैवाने आपले 'शहर' मात्र मागे सोडून जात नाही. ऐतिहासिक वास्तूंचे आणि त्या जागेचे पावित्र्य राखणे आपले कर्तव्य आहे. गड-किल्ले हे केवळ मोबाईल किंवा सोशल मीडियावर बघून अनुभवण्याच्या गोष्टी नाहीत, तर तिथे प्रत्यक्ष जाऊन तो इतिहास अनुभवला पाहिजे.
अनिल जाधव म्हणाले, तरुणाईला सोशल मीडियाच्या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना इतिहासाशी जोडण्यासाठी 'वैचारिक परिसंवादांचे' आयोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. अशा परिसंवादातून महापुरूषांचे आचार आणि विचार अनुभवणे महत्वाचे आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन नागनाथ साळवे यांनी केले.

0 टिप्पण्या